Wednesday, September 26, 2018

मनाची प्रार्थना

ही माझी प्रार्थना आहे.. माझी स्वतःची.प्रार्थना प्रार्थनेत कीती सामर्थ्य असतं हे मी जाणतो आणि म्हणूनच मी मनापासून ही प्रार्थना रोज करतो. या पृथ्वीवर माझे आगमन अकस्मात झालेले नाही काही निश्चित उद्देशाने माझी निर्मिती झालेली आहे माझ्यात माझी स्वतःची काही वैशिष्ट्ये आहेत जी मला पूर्णपणे माहिती आहेत माझ्या जीवनात मी माझ्या वैशिष्ट्यांचा पुरेपूर उपयोग करीत आहे काही विशिष्ट कार्य करण्यासाठी माझे ध्येय निश्चित आहे मी काय मिळवू इच्छितो आणि काय देऊ इच्छितो याची मला पूर्ण कल्पना आहे मला हेही माहीत आहे की यशामुळे सुख लाभते आणि सुखामुळे मनशांती मी रोज कुठल्या ना कुठल्या बाबतीत यशस्वी होत आहे मला रोज अनेक प्रकारे सुख मिळत आहे मला रोजच मनःशांती लाभते मला प्रसन्नतेचे वरदान असल्यामुळे मी नेहमी प्रसन्न राहतो आणि प्रसन्नता पसरवितो

Thursday, August 27, 2015

पु.ल. च एक सुंदर पत्र

या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं. त्याचंच हे उत्तर.
--------------------------------------------------------------------------------------
> १० जुलै १९५७, -
> प्रिय चंदू
> रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का? वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे.
> तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस? पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो. तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो. पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.
> तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही? तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.
> तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे! तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.
> तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.
> हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे. तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?
> जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो. तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!
> लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे. तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are justifiable?
> माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का? ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात. तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.
कळावे,
>
> भाई

Monday, June 29, 2015

किशोर पवार यांचा लेख..

कोकण युवा साहित्य परिषदेच्या अधिकृत पेज वर हा पहिला लेख प्रसिद्ध होतोय तोहि थेट दुबईतून पाठवलाय आपले युवा लेखक किशोर पवार यांनी
त्यांचे कार्यकारी मंडळा कडून मन:पुर्वक आभार.
विषय - निरीक्षण.
लिखाणाच माध्यम - मुक्त लेखन.
विशेष - पात्र आणि त्याचं हुबेहूब वर्णन
तो मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात डोक्यावर रुमाल टाकून किती तरी वेळ ताटकळत एस टी ची वाट पाहत थांबलाय पोरा बाळाना शाळेला सुट्टी लागलेय ...गावाकड मेहुनीच बहिणीच नात्यातल कुणा कुणाच लग्न निघालय म्हणून चिक्कार लोक रस्त्यावरच्या उजाड मोकळ्या ढाकळ्या बस थांब्यावर बायको पोर आणि ब्यागा सांभाळीत नेमका लाल डब्बा कधी येईल त्याची वाट पाहतात ..लांबून एस टी येताना दिसली कि घर धनी जरा पुढ होऊन बोर्ड काय डोकावतो ते पाहत परत मोबाईल काढीत टाईम पाहतो ...लहान लेकर बाळ मात्र शेट्ट उन्हाला भेत नसत्यात गावला जायचं म्हणाल्या वर एक तर रात्रभर ती झोपतच नाहीत ..सकाळी सगळ्या अगोदर उठून बस्त्यात ..त्या मूळ उन बिन त्यांना काय लागत नसत ..गावाला जायची हौस कडक रखरखीत उन्हा वर हि मात करते ...समोरून ऐटीत जाणारे कार वाले पाहून बाया बापड्या उगाचच मनात चरफडत आमची जिंदगानी एस टी ट्रक नि काळ्या पिल्या जीपड्या झालच तर सहा सीटर च्या डुगडुगीतच चाललेय म्हणून मनात बापाला शिव्या देत कुणाच्या गळ्यात बांधलेय म्हणत साडीत जास्तच उकडतंय म्हणून चरफडतेय ...तो शांत पणे तिथल्या प्रत्येक प्रवशाला न्याहाळतोय ...तितक्यात त्याला हावी ती एस टी आली एकदाशी ..आपली स्याक सांभाळीत तो एस टी त प्रवेश करता झाला ...हातातील पंच दांडी वर ठोकीत कंडक्टर पुढे चला पुढे चला चा सवई प्रमाणे जय घोष करीत होता ...तो मात्र तिथेच थांबला ...लाहान पणी तो जाळीतून ड्रायव्हरला न्याहाळत आसे ...तो जसा स्टेअरिंग फिरवेल तसा मनातून हा हि फिरवे अगदी हात फिरवत असे ...समोरून भरदाव येणारी गाडी जणू आता येऊन कोपर्याला ठोकेल असे वाटत असतनाच भुर्कन ती बाजूने निघून गेली कि ह्याच्या पोटात आलेला गोळा शांत होई ..
आता जरा जाणता झालाय पण एस टी तली वेग वेगळी माणस खेटून बसणारी जोडपी ...एखाद्या पर पुरुषाच्या बाजूला एखादी स्त्री किंवा मुलगी बसली कि असल्या जळजळीत उन्हात हि गरावा अनुभवणारी पुरुष मंडळी.. त्यात गाडी चालू असताना हि आपली चामडी पिशवी सांभाळीत तिकीट देणारा मास्तर त्याचा तो टाक टाक वाजणारा पंच ..तिकीट देऊन झाल्यावर जागेवर बसल्यावर स्क्रू फिरवून गोल खाच्यात अडकून राहिलेलं काउंटर तिकीट घडी झालेले कोपर्यात दुमडलेल्या नोटा सरळ करीत सफाईदार पणे त्या नेमक्या रीतीने लावून ५०० १०० नंतर पन्नास आसे गट्टा करून वरच्या खिश्यात लीलया कोंबण्याची पद्धत ...सगळ्यात कुतुहूल त्याला त्याच्या किलोमीटर शिट च नेहमीच मास्तर किती सुवाच्छ अक्षरात बारीक रकान्यात आकडे मोड लिहीतात त्या पेपरची घडी हि किती सुंदर असते नाही ..आयुष्याच्या पटलावर वर हि त्याची बेरीज वजाबाकी तो अशीच सुबक पणे मांडीत असेल काय जगण अधिक सोप करीत अशीच त्याची छान घडी करून संसाराचा हिशोब मांडीत असेल काय ...
तसाच तो खांबा जवळ उभा राहिला काही अंतराने मास्तर च्या बाजूचा माणूस उतरणार हे त्याच्या चुळबुळी वरून ह्यांन ताडल होत ..आणि ह्याला मास्तर जवळची सीट मिळाली
त्यान मास्तर ला उगाचच छेडायला सुरवात केली मास्तर जेवायला कुठ थांबणार मास्तर ने हि ठरल्या ठिकाणचे हॉटेल सांगितले ..मास्तर आणि ड्रायव्हर ला तिथे फुकट जेवण मिळत हि खंत त्याला नेहमी असायचीच पुन्हा ती आज जागी झाली ...तो काय मास्तर तिथे नको ह्या हॉटेल ला गाडी थांबवा तिथे मस्त भेटत ...मास्तर म्हणाला नाही आम्ही इथेच नेहमी जेवतो ....बरय ब्वा तुम्हाला फुकट मिळत ..आणि हा थट्टा करीत मिश्कील हसला
मास्तर मात्र खजील झाला राग आलाय आसा एक हि भाव त्याच्या चेहर्यावर न्हवता पण दुक्ख होत
आहो फुकट काय ते एक प्लेट मसूर ची डाळ आणि कडक रोटी ..कित्येक वर्ष हेच खातोय आणि सतत प्रवास करतोय ...
ती होती तोवर घरून डबा यायचा मला पुरण पोळी आवडते म्हणून प्रत्येक सणाला ती पुरणपोळीच बनवायची ...आता घरची साधी पोळी हि नाही भेटत हो ...मास्तर दीनवाणी पणे बोलता झाला
म्हणजे .............
वावंशा चा दिवा म्हणून एकाच मुली वर थांबायचं ठरवलं ती जास्त शिकलेली न्हवती तरी माझा निर्णय तिला मान्य होता आईन न पाठीला पाठ असावी म्हणून थोडा त्रागा केला पण मला एकाच मुलीला चांगल शिकवायचं होत ..मुलगी शिकली हि नाकी डोळी हि सरस ..पण हुंड्या शिवाय कुठे जमत न्हवत स्थळ सांगून यायची पण भरमसाठ मागणी ..मी ह्या हुंडा प्रथेच्या बिलकुल विरुद्ध पण मुलीच वय वाढत होत अश्या परिस्थितीत समाज तुम्हाला गुढगे टेकायला लावतोच प्रत्येक वेळी तुम्ही प्रवहाच्या विरोधात पोहालच असे नाही होत ना ...होती न्हवती ती मिळकत मुलीच्या लग्नात लावली कुठलीच कसर नाही ..त्या नंतर एका वर्ष्यातच बायकोला कर्करोगान पछाडल ..पैसे संपले होतेच मग राहिलेला फंड गावची जमीन तिचे काही दागिने विकून तिच्या आजारपणाची कसरत करू लागलो मी तिच्या वर खूप प्रेम करायचो खूप म्हणजे खूप तिला किमो लागला सगळे केस उडून गेले ऐन पंचेचाळीशित ती जक्ख म्हातारी वाटू लागली मला मात्र ती त्या आवस्थेत हि एखाद्या आप्सरे सरखीच दिसायची ...कर्करोगाशी झुंजत तिने अखेर प्राण सोडला...आणि मी ह्या जगात एकटा झालो पोरका ...
खूप दिवस झाले घरची पोळी भाजी नाही मुली कडे जातो कधी तरी ....पण तिच्या हातची चव कुठेच नाही ...ह्या फुकटच्या जेवणात तर ती अजिबात नाही फक्त पोट भरण ...बस्स
हा सुन्न झाला नि मास्तर बोलत होता तिकीटाची गणित लीलया मांडणारा पेपरची घडी सुरळीत पणे करणारा मास्तर खर्या जगण्यात किती विस्कटलाय ...तिकिटाचा एक रुपया जरी बाकी राहिला तरी मास्तर एक रुपया ढापू पहातोय अशी भावना जपणारा हा आज त्या मास्तर कडे नुसतच शून्यात पाहत होता ...... _/\_
- किशोर पवार
Kishor Pawar
लेखक - वक्ते
Abu Dhabi United Arab Emirates.

Thursday, May 7, 2015

समीर गायकवाड यांचा एक सुंदर लेख..गावाकडे एक बरे असते, माणसांच्या चेहरयाला कल्हई केलेली नसते. माणसे जशी असतात तशीच राहतात अन तशीच दिसतात. कपाळाला अष्टगंध लावून सकाळी घराबाहेर पडणारी ही माणसे घरी येतील की नाही म्हणून घरचे लोक त्यांचा घोर करत नाहीत. मुळात गाव ते केव्हढे असते ? शे दोनशे ते पाचशे उंबरा इतकी त्याची व्याप्ती. गावात किती भाग म्हणाल तर एक वेशीबाहेरचे जग अन वेशीच्या आतले जग. म्हणूनच गावात हाक मारताना प्रत्येकाला एकमेकाचा बाप माहिती असतो.जसे की गणा भोसलेचा किसन महणजे किसन गणपत भोसले, महादू भोसल्याचा इष्णू म्हणजे विष्णू महादेव भोसले. तेथे औपचारिकता ही औषधालाही सापडणार नाही. फॉर्मेलिटीचे आपल्याला भारी कौतुक, तर त्याना त्याचे वावडे. हाका मारताना देखील ते हात अन आवाज राखून मारणार नाहीत, जोरात आवाज असणारच. रानात ओरडायची सवय असल्याने हळुवारपणा ते जपणार नाहीत, पण मुक्या प्राण्याची माया असो व घरातल्या म्हतारया माणसाची हेकेखोरमागणी असो ते तेथे हळुवार होतील. जेंव्हा ते हाका मारतील, जवळ येतील. बसतील, आधी इकडचे तिकडचे चार शब्द बोलतील. अर्थातच त्यात पिक पाणी अन पाऊसवारा हा असणारच. सुखदुःखाची देवाण घेवाण करतील. नडलेल्या गोष्टी सांगतील.....
पण कधी कधी हे देखील बिथरतात, भावकी अन गावकीचा विषय सोडून बोल म्हणतील. कुठेतरी कधीतरी कोणी दुखावलेले असते त्याचा राग वर्षानुवर्षे मनात धरून ठेवलेला असतो त्याचा वचपा यांनाही काढायचा असतो. शेवटी ही देखील हाडा मासाचीच माणसे, फक्त फरक इतकाच की आपणदेखील हाडामासाचेच असतो पण ते मातीचेही असतात. त्यांची मातीशी नाळ घट्ट असते. आपल्यापैकी काहींची तर आपल्या जन्मदात्या मायबापाशीदेखील नाळ घट्ट राहत नाही. आपला राग पोटात ठेवून माया लोभ मात्र ते खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करतील. “अरे त्याने माझी गाय कापली म्हणून का मी त्याचे वासरू मारू ? देव अक्कल वाटत असताना तो शेण खायला गेला असेल म्हणून का मी त्याच्या गतीला येऊ ? त्याने त्याचा जिम्मा निभावला नाही म्हणून काय झाले ? देवाने मला मोप दिलया, मी समाधानी आहे. त्याचे कर्म त्याचे त्याच्यापाशी. त्येला पांडुरंग बघून घेईल.” असे म्हणत म्हणत त्यांची प्रत्येकाची गाडी विठू चरणी येऊन विसावते. राग कितीही असला तरी ते कोणाचे वाटोळे व्हावे म्हणून प्रार्थना करणार नाहीत, मात्र एखाद्या वेळेस अडचणीत सापडलेल्याला अशा माणसाला चार गोष्टी ऐकवूनच मदत करतील, पण त्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणार नाहीत.....
डोक्याला वेगवगळया रंगाचे फेटे घालून इथे तिथे बसलेली म्हातारी माणसे हे यांचे खरे हाकारे असतात. गावातला सर्वात जेष्ठ म्हतारा जे काही सांगेल त्याच्या शब्दाविरुद्ध शक्यतो कोणी जात नाही. गावात विशेष मान असतो अशा वठलेल्या माणसाला. गावातली टाळकरी अन भजनी मंडळी ही सर्वांच्या आदरस्थानी असतात. त्यानंतर असतो तो गुरव अन बामण. त्यांच्यावर यांची अपार श्रद्धा. अबीर, गुलाल, बुक्का हाच यांचा ब्रम्हदेव, विष्णू अन शंकर. चिरमुरे, लाह्या,बत्ताशे हाच इथला महाप्रसाद. आत्ताच्या घडीला देखील घरी टीव्ही फ्रीज नसणारी अनेक घरे गावात सापडतील पण गुलाल बुक्का नसणारे घर गावात सापडणार नाही. आषाढीला उपवास अन नवरात्रात व्रत वैकल्ये, शिवाय ज्याचे त्याचे कुलदैवत अन कुलाचार हा त्यांचा श्रद्धेचा धार्मिक विषय. याशिवाय गावातली दर सालची जत्रा अन त्यातले याना येणारे उफाण हे देखील अनुभवण्यासारखे.
याचा अर्थ गावात सर्व माणसे अशीच असतात असे नाही काही माणसे इब्लीस अन बेरकी देखील असतात. प्रत्येक गावात अशी काही माणसे असतातच. बांधाच्या कोरभर तुकड्यासाठी नरडीचा घोटघेण्यापर्यंत कधीकधी इथला माणूस घसरतो तेंव्हा सारा गाव हळहळतो, आयुष्याच्या पारंब्या तुटतील असं कोणतेही नाते ताणू नये हे इथले मुळामुळातले तत्वज्ञान, आईबहिणीला कडला जाईपर्यंत बघावे अन भावकीला थुकावे असेही इथले रक्तात भिनलेले भाव..
आपआपली सुखदुखे अन स्वप्ने काळजातल्या कपारीत ठेवून आपल्याच ढंगात चालणारी ही माणसे. कोणी धोतर तर कोणी पायजमा घालून असतो आजकाल क्वचित कोणी जीन्सवाला तरणा पोरही येथेहटकून दिसतो..नऊ वारीचा डोक्यावरून पदर घेऊन वेस चुकवून बारीक कुजबुज करत लगबगीनेचालत जाणारया बायका पाहताना लाल,हिरवे,पिवळे.तांबडे ठिपके थवा करून चालल्यासारखे वाटते.पायात फुफुटा उडवत जाणारा रस्ता अन त्यावर तळपायाला चिरा पडलेली काळपट चपला घालून चालणारी चालणारी माणसे. सावलीचे ज्ञान याना अधिक उत्तम ठावूक, पर्यावरण पर्यावरण म्हणून छाती बडवत बसण्याऐवजी हे झाडाझुडपातच देव शोधतात अन पानाफुलात आयुष्य घालवतात. इथल्या मळकटलेल्या रस्त्यांच्या कडेने घराघरातून वाहणारे मोरीचे पाणी उघड्या गटाराला मिळते जिथे माशा अन डास चिलटांचे स्वतंत्र विश्व असते. फिरत फिरत हे गटार गावातल्या ओढ्यापाशी जाते. दरसाली ओढ्याला वरुणदेवाच्या कृपेनुसार वेगवेगळे रुपडे मिळते. ओढ्याजवळच्या पानवेली म्हणजे गावातल्या मेलेल्या माणसाचेच झाडातले जल्म असे लहानपणापासून ऐकलेले. त्यामुळे त्या पानवेलींची पाने कोणी तोडत नसे. या दृढ समजाला कारणही तसेच असते, सर्रास बहुतेक गावात स्मशानभूमी नावाची वेगळी रुक्ष जागा नसते. गावातली घाण अन पावसाचे दान पोटात घेऊन नदीला मिळणारा ओढा गावातली माणसे देखील आधी त्याच्या मातीतल्या कणा कणात कालवतो अन मगआपल्या पोटाशी धरून नदीला घेऊन जातो. मग ती चंद्रभागा असते नाही तर गोदावरी,कृष्णा, पंचगंगा. पण तिचे पाणी आपल्याला समिंदराला नेते अशी धारणा. म्हणून गावात कोणाची मयत झाली की गावाबाहेरच्या ओढ्यावर त्याचे क्रियाकर्म ठरलेले असायचे. पुढे हीच माणसे तिथल्या पानवेलीत जन्म घेतात अन गावातल्या माणसाना भेटतात असे सगळे म्हणायचे.
गावात असते वेशीजवळचे मारुतीचे मंदिर, एखाद्या उभ्या आडव्या आळीला विठोबाचे मंदिर. क्वचित नमाजासाठी मातीचे मिनार. ही सर्व धार्मिक प्रवृत्तीच्या गावकरयांची श्रद्धास्थाने. इथले उत्सव अन उरूस हा त्यांचा घरचाच जलसा असतो. तर गावतली चावडी ही मुळातच बोलभांड असते. अनेक घटनांची ती मूक साक्षिदार असते, गावातले अनेक निवाडे अन वाद, संकटे अन त्यांचे निवारण याचे ती दार्शनिक असते. चावडीच्या भिंतीला कान लावले तरी अनेक श्वास अन निश्वास यांचे उसासे ऐकू येतील, गावातला खरा इतिहास चावडीच्या कणाकणात मिसळून गेलेला असतो. इथला पार म्हणजे तर आपल्या हजारो बाहूंनी जगाला आपल्या बाहूत सामावूनघेणारा विश्वनिहंताच जणू. जसा गाव तसा पार असतो. वडाचे झाड असणारा पार म्हणजेस्वर्गच जणू. क्षणभराच्या उसंतीत विचारलेली ख्याली खुशाली ते निवांत आपल्या सासूरवाशीण बहिणीबाळीच्या अडचणी ते आईवडिलांचे आजारपण या सर्वांवरच्या गावगप्पा येथे होतात.कोणाच्या घरी पाहुणे आलेत इथपासून ते कोणाच्या घरी देवदेव आहे इथपर्यंतची पहिली खबर पारावरून गावात पसरते. पाराने गावातली पंचांची पंचायत बघितलेली असते अन त्यातआलेले आसू आणि हसुचे हजारो भावानुभव आपल्यात साठवलेले असतात. लहान मुलांच्या अनेक विट्या पाराने अलगद झेललेल्या असतात तर कधी कटून आलेला एखादा पतंग वडाच्या शहाजोग फांद्यांनी आपल्या गळ्यात अडकवून ठेवलेला असतो. पारावरचा कट्टा हा गावाच्या सांस्कृतिककार्यक्रमांचे मंच म्हणून जेंव्हा जगत असतो तो तेंव्हा अभिजात प्रतिभेचे नवनवोन्मेषाचे अगणित हुंकार बनतो. कधी एखाद्या सभेचे तर एखाद्या बैठकीचे दमदार बोल ऐकण्यासाठी गावकरी त्या पाराभोवती गोळा झालेले असतात तर कधी पावसाळी दिवसात तिथ साठलेल्या पाण्यात खेळणारी पोरे पाराने आपल्या कुशीत घेऊन त्यांच्याशी मस्ती केलेली असते. गावातला पार गावाची कळा सांगतो. पार स्वच्छ अन प्रसन्न असेल तर गावगाडा खुशीत अन शिस्तीत चाललेला आहे याचे ते प्रतिक असते. तर पाराभोवती कचरा साठलेला असेल अन पार उदास भासला तर गावात काहीतरी अप्रिय घडल्येय कुणीतरी गेलेय याची ती चाहूल असते. पार हा गावातल्या रग अन रंगेलपणाचाही अंदाज बांधत असतो.मिशीवर पीळ देत दिली घेतलेली आव्हाने अन जीवावर उदार होऊन लावलेल्या पैजा याचे अनेक स्पर्श तिथल्या पारंब्या शिवता क्षणीच मस्तकातून भिनतात. पारात कैद असतात अनेक अपेक्षा अन उपेक्षाची जीवघेणी गाऱ्हाणी ती मात्र पार फक्त आपल्या एकट्याच्या अंतःकरणात ठेवून असतो त्याचे शेअरिंग नसते. पाराचे ते असहाय दुःख असते, त्याच्या अबोलव्यथांचे प्रकटन कधी करत नाही.
गावाबाहेरचे तळे म्हणजे अनेक आख्यायिकांचे आगार असते. पावसाचे तांडव आपल्या पोटात साठवून तळ्याचेपाणी कधी तळाला जावून विचारमग्न होते तर कधी पाळी फोडून गावदेवाच्या पायरया शिवून आपलाही रामराम घालते. तळ्याच्या हालणारया पाण्यात अनेक प्रतिबिंबे दिसतात. तर तिथल्या प्रत्येक तरंगात तळ्याकाठच्या जीर्ण झाडांची हिरवी पिवळी पाने पानगळीतला आपला मरण सोहळा साजरा करत फिरकी घेत नाचत नाचत पाण्याशी अनुष्टुभीत होऊन आपली झाडाची गाणी गात असतात. तळ्याकाठची झाडे म्हणजे गावातल्या पोरांचा जीव की प्राण ! सूर पारंब्या पासून ते लंगडी पर्यंत अनेक खेळांचे अनेक डाव इथे मांडलेले. उंबराच्या झाडाची लालसर मऊ गोड उंबरे खात झाडावरचा डिंक अन लाख गोळा करताना चावणारे लालकाळे तिखट मुंगळे, अन त्यांचा कडक डंख वर याला पोरांच्या गलक्याची जोड असायची. या सर्वांच्या कोलाहलात आपला सुर मिसळणारे सकळ विहंगगण ! एक जादुई माहौल असायचा तिथे. तळे कोरडे पडले की मग मात्र गावच उदास भासे, मेलेल्या माणसाची आतडी कातडी बाहेर यावी तसा तळ्यातला गाळ कोरडा झाल्यावर पोटातले मोठाले दगड धोंडे वर घेऊन यायचा. सलग दोन तीन वर्षे जर तळे आटले की देवाला भाग बांधला जायचा, सारा गाव अनवाणी राहून उपास तपास करायचा. पुढल्या पावसाळ्यात बक्कळ पाऊस पडला की आधी देवळाला काव आणि पिवडीच्या रंगाचे दोन हात ठरलेले असायचे. तळ्यातल्या पाण्यावरून जुनी माणसे वेगवेगळ्या दंतकथा रंगवत बसत. तळ्याचे पाणी कोणा एकाच्या घरचे नसूनही ते सर्वांच्या डोळ्यात असायचे, चरायला गेलेली अख्ख्या गावाची गुरे गावात परतताना तिथे आळीपाळीने पाणी प्यायची तेंव्हा त्यांच्या जिभेचा लप्लाप आवाज अन त्याच वेळेस त्यांच्या हलणारया गळ्यातल्या घंटांचा मंजुळ आवाज ऐकताना मावळतीचा लालपिवळा सूर्य तळ्यातल्या पाण्यात कधी बुडून जायचा काही कळायचे नाही...
गाव म्हणजे मातीतल्या माणसांचा जथ्था जो दुःखाचे अवडंबर करत नाही अन सुखाचे उत्श्रुंखल बाजार भरवत नाही. देवळातल्या मुक्या खांबातही गावाची कहाणी ऐकायला येते, ओढ्यातल्या पाण्यातही गावाचे अश्रू ओळखायला येतात. गाव असतो एक चिरंतन आनंदाचा चैतन्यमय सोहळा, मक्याच्या सोनेरी कणसासारखा अस्सल सोनेरी बीज वाढवणारा ! गाव असतो माणुसपणाचा उरूस, देणारया हातांचे हात घेणारा अन त्या हातांना आपल्या मस्तकी धारण करणारा ! गाव म्हणजे जन्मापासून ते मरणापर्यंत साथ देणारी अखंड उर्जा देणारी सावली ! गाव म्हणजे मातीतल्या माणसांची मायेची सावली ! गाव म्हणजे काही वस्ती,वाडी वा घरे नव्हे गाव म्हणजे मातीच्या काळजाचे अनंत तुकडे जे भूमीपुत्रांच्या ठायी विसावलेले !! गाव म्हणजे आई, गाव म्हणजे बाप, गाव म्हणजेच विठ्ठल रुखमाई, गाव म्हणजे आकाशाची निळाई अन निसर्गाची हिरवाई, गाव म्हणजे डोळ्यात पाझरणारा खारट झरा.
सरते शेवटी गाव म्हणजे फाटक्या कपड्यात दुख लपवून, जमीन गहाण टाकून जीवाला जीव देऊन आईबापाची सेवा करणारया अन मातीच्या ऋणात राहून कोरभर भाकर पोटाला खाऊन तिथल्याच मातीत जगून आपला स्वाभिमान धरीत्रीच्या चरणी अर्पण करणारया शेकडो माणसांचा एकसंध देह असतो !!
- समीरबापू गायकवाड.

Tuesday, April 21, 2015

स्मिता गानु जोगळेकर यांचा सुंदर लेख.

थोडे तरी वेडे व्हायलाच हवे

थोडे तरी वेडे व्हायलाच हवे 

मी आणलेले असते नीलकंठ पक्ष्याचे छानसे पीस. एक गोलच गोल शंख , सूर्यफुलाच्या वाळलेल्या शेंगांच्या अर्धगोल पुंगळ्या आणि खूप अधिरतेने मला त्या दाखवायच्या असतात कोणाला तरी.मी ऑफिस मध्ये येते, सारा माहोल ठावूक असूनही आशाळभूतपणे बघते इथे तिथे.आसपासची माणसं बघून मला पुनः पुनः आश्चर्य वाटत राहते,काही किरकोळ अपवाद वगळता, यांच्यातील कोणीच का कधी बोलत नाही पाउस-वारा, फुलं-पाखरं , सुगंध-झुळूक , डोंगर-झरे वगेरे वगरे बद्दल . हे सतत कोणाला प्रमोशन , कोणाची बदली , कोण कोणाचा चमचा आहे,या महिन्यात डी.ए. किती वाढला वरच बोलत असतात, कपाळावर चिंतेचं जाळं आणि चेहऱ्यावर त्रस्त भावांसकट.वाटतं पावसाची सर पाहून कधीतरी हर्षित व्हावे,दाराबाहेर एखाद्या फुलपाखराकडे निरखून पाहावे, रानाची पाखरांची समुद्राची ओढ दाखवावी, किमान गप्पा तरी,किमानात किमान विचार तरी व्यक्त व्हावा .पण छट,हे लोक पावसाबद्दल बोलले तरी आता चिखल होणार हे सांगण्यासाठी, ढग आल्याच्या आनंदापेक्षा झाकोळल्याचा अंधार पांघरण्यासाठी,आणि हा झाकोळ दुसऱ्यावर लादण्यासाठी.

     पण नाही हे असे मळभ येत आहे असे वाटतच मी मान झटकून टाकते आणि झटकून टाकते त्यासोबत सगळे नकाराचे विचार ही आणि मनात म्हणते आपण घेतलेला फुलांचा गंध द्यावा खुशाल शिडकून यांच्या अंगावर,आपण ऐकलेलं रानाचं निसर्ग संगीत हळूच सोडून द्यावं त्यांच्या कानात आणि जो अपवादात्मक असा असतो तो आपल्यासारखा एखादा वेडा जीव भेटतोच कि या सर्व कोरड्या पसाऱ्यात ,तोच एखादा रानवेडा,पाउसवेडा,डोंगर किंवा कविता वेडा,बस आणखी काय करावे लागते माणसाला रिते होण्यासाठी आणि पुन्हा इतरांना वेडं करण्याचा आपला प्रयत्न चालू ठेवावाच कि
     नुकत्याच केलेल्या नागझिरा नवेगावच्या धुंद मोहिनीमधून मी अजून बाहेर आलेली नसते . किंचीतसे ही रिकामे क्षण मिळताच नजरेसमोरून सरकू लागतो सारा चलतचित्रपट आणि ट्रान्समध्ये गेल्यासारखं पुन्हा निघते मन त्या वाटांवरून स्वैर सफरीला,मग त्याला कोणताही एवढासा संदर्भ सुद्धा पुरतो. मधेच वाचलेलं मारुती चितमपल्ली यांचं 'शब्दाचं धन' किंवा कृष्णमेघ कुंटेचं 'रानवेड्याची शोधयात्रा' आठवून जातं . आठवते शब्दाचं धन या शब्दावरच केलेली पानाफुलांची, पाखरांची, झाडांची, वणव्याची, वाघाची चित्रावळ किंवा खुणावतो रानवेड्याच्या पुस्तकावरचा तसाच वेडा प्रचंड मोठा बायसन,तोंडात गवताचा झुबका ठरलेला अजस्त्र सुळ्यांचा टस्कर, स्वतः च्या डोक्यावर गवत उडवत असलेला. त्या मागचे थंडगार तळे आणि त्याही मागे खडक आणि हिरवळीचा मिलाफ .असं सारं .श्वासातलं जगणं असतं. आणि हे सारे हळूच हात धरून मला अलगद बाहेर नेतात आणि बघता बघता मी थेट रानात पोहोचते.तिथे मला भेटते चैतन्याच्या शोधात हिंडणारी जोय एडमसन, सतत निसर्गाचा विचार करणारी , निसर्ग जगणारी , निसर्ग रेखाटणारी अभ्यासणारी , एकटीच भटकणारी , पियानो वाजवणारी संगीताचा इतिहास व रचना शिकणारी , नक्षीकाम करणारी , भांडी घडवणारी शिवणकाम , गायन , शवपेट्या बनवणे , मानववंशशास्त्राचा अभ्यास करणे एवढ्या ढीगभर गोष्टी येत असलेली जोय मला इथेतिथे खरीखुरी वावरताना दिसते.मनाला ओढ लागते आपण ही सारी आकडेमोड सोडून निघून जावे रानेवने तुडवायला.
     खरंतर मी ऑफिसमध्ये असते.आता निघायला हवे,पण रानाच्या धुंदीत मला सभोवतालच्या प्रिंटर्सची करकर,कोम्प्युटर्स ची टकटक,सेलफोन्सचे रिंगटोन्स,स्पीकरवरचं संगीत आपसातले संवाद, डेबिट क्रेडीटचे हिशेब, ट्रान्स्फर प्रमोशनच्या गप्पा काहीकाही ऐकू येत नसतं. माझ्या संवेदनांच्या सीमारेषा विस्तारलेल्या असतात कैक पुढे, पलीकडे, दूरदूरवर.मी या इथल्या पसाऱ्यातली एक नसतेच मुळी. माझ्या मनात असते वेगळीच उधळण,माझी नजर शोधत असते काचेतून दिसणारा आभाळाचा तुकडा .
     ऑफिस मध्ये जिथे तिथे काचा आणि आरसे आहेत , माझ्या उजवीकडे असलेल्या काचेतला नजारा जेव्हा डावीकडच्या आरशात प्रतीबिंबाच्या रुपात दिसतो तेव्हा त्यात एक वेगळीच मजा मिसळते.प्रत्यक्षापेक्षाही या प्रतीबिम्बात खूप जास्त कवडसे उमटलेले असतात.एक नवेच डायमेन्शन,एक वेगळीच खोली त्या आभाळाच्या तुकड्याला प्राप्त होते. आणि त्या आभाळाच्या छायेखालची वाट अगदी स्पष्ट हाकारे करू लागते.व्यंकटेश माडगूळकरांनी उल्लेख केलेली हीच का ती वाट?,ते म्हणतात सकाळच्या ताज्या वृत्तपत्राप्रमाणे वाचता येणारी ही वाट दिवसभराच्या फरांट्यान्मुळे संध्याकाळपर्यंत भेळ खाऊन चूरगळून टाकलेल्या कागदासारखी दिसू लागते, पण माझ्या मनात लख्खपणे असते ती फक्त सकाळची स्वच्छ ताजी, सुगंधित वाट. माझ्या डोळ्यात असतं एक खूप खरंखुरं सात्विक जग,ज्यात मी बुडवून टाकते स्वतःला. रंगाच्या, गंधाच्या, स्वप्नांच्या निरभ्र जगात चिंब करून टाकते स्वतःला , आणि मी रानातून येताना आणलेलं ते नीलकंठ पक्ष्याचं पीस अलवारपणे काढून बघत राहते त्याकडे ,स्पर्श करते त्याला आणि मी स्वतःच एक पीस होऊन तरंगत राहते,वेडेपणाच्या वेगळ्याच विश्वात, जगण्याला वेगळेपणाचे आयाम देणाऱ्यां त्या विश्वात ...तरलपणे ...!!!!!
स्मिता
Monday, February 16, 2015

अनघा काकी तशा नेहमीच छान राहणार्या आणि स्वभावही खूप मस्त आणि आनंदी. थोड्याशा वयस्कर असल्या तरी उत्साही आणि अतिशय अनघा काकी तशा नेहमीच छान राहणार्या आणि स्वभावही खूप मस्त आणि आनंदी. थोड्याशा वयस्कर असल्या तरी उत्साही आणि अतिशय सकारत्मक. त्या नेहमीच संतुलित विचार करतात त्यामुळे स्त्रियांचं जास्त कौतुक किवा पुरुषांना उगाचच नाव ठेवलेली त्यांना कधी आवडत नाहीत. त्यांच्या शब्दात सांगायचं तर " खर सांगू तुम्ही माझ्यावर टीका कराल पण माझ स्पष्ट मत आहे की अर्ध्या पेक्षा जास्त संसार हे पुरुषांमुळे टिकले जातात. आपण सतत बडबड करत असतो. आपल्या मधेही मीच सगळ करते असा अहं भाव असतो. आपले नवरे जास्त वेळा बहिऱ्या लोकांसारखे वागतात त्यामुळेच हा संसाराचा गाडा सुरळीत चालू असतो. पुरुष काही बोलू शकत नाही अस नसत तर आपण काही बोललो तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ह्याची त्यांना कल्पना असते म्हणून त्यांची शांती हा त्यांचा कमकुवतपणा समजायची चूक अनेक स्त्रिया करतात. मित्र म्हणून आपल्याला तो हवाही असतो पण त्याच वेळी आपणही त्याची छानशी मैत्रीण होण गरजेच आहे हे आपण विसरतो.आपण विवाहबाह्य संबंधाविषयी चर्चा करतो तेव्हा एक दुर्लक्षित झालेली गोष्ट हीच असते की आपल्याला मित्राची गरज असते तशीच त्यानाही मैत्रिणीची गरज असते. दर वेळेस त्या नात्याला शारीरिक पातळीवर उतरवायची गरज नसते. त्यांचीही बौद्धिक आणि भावनिक अशी गरज असू शकते .आपण स्त्रिया आपल्या नवर्याच्या चांगल्या मैत्रिणी होण्याचा प्रयत्न कधी करतो का ? सगळ्यात इतक्या गुरफटून जातो की छान राहील पाहिजे , दिसलं पाहिजे , वैचारिक पातळीवरही नवर्याशी सुसंवाद साधला पाहिजे हे लक्षातच घेत नाही . विरंगुळ्याचे क्षण नवरा म्हणून त्यांच्याही गरजेचे असतात ह्याचाच विसर आपल्याला पडतो. अनेकदा नवर्याला त्याची बायको मैत्रीण म्हणून अधिक हवी असते. आजकाल तिथेच खूप जणी कमी पडतात. मी पुरुषांची बाजू घेते अस समजू नका. पूर्वी स्त्रिया ह्या घरात असायच्या त्यामुळे ह्याचा विचार कधी झाला नाही पण आता स्त्रियांनी आपल्यातील ही आपल्या "नवर्याची मैत्रीण" जपली पाहिजे. संसार सुरळीत चालण्यासाठी ह्याची फार गरज असते. त्याचं मैत्रीपुर्वक नात त्यांच्यातील नवरा बायकोच्या नात्यालाही उत्साही ठेवत आणि प्रेमही छान अबाधित रहात. ज्या स्त्रियांना हे जमत त्या पत्नी म्हणून अधिक यशस्वी होतात." थोडक्या शब्दात त्यांनी यशस्वी वैवाहिक जीवनाची एक महत्वाची गरज अधोरेखित केली.ज्याचं लग्न झाल आहे आणि ज्याचं व्हायचं आहे त्यांनी ह्याचा नक्कीच विचार करायला हवा. मला तरी त्यांचे विचार मनापासून पटले.तुम्ही तुमच मत नक्की द्या ……… मिनल सबनीस.

Wednesday, January 14, 2015

स्विकाराचं श्रद्धेय अध्यात्म..

स्विकाराचं श्रध्देय आध्यात्म....
(परमेश्वरावर श्रध्दा असलेल्या प्रत्येकाने वाचावं असं काहीतरी...)
...व्यवहारात अनेकदा आपण इतरांच्या तोंडुन किंवा आपणही कित्येक वेळा, "माझी अमुकतमुक देवावर श्रध्दा आहे" किंवा "अमुकतमुक गुरुंना मी मानतो" वगैरे वक्तव्ये आपण ऐकत असतो, करत असतो....श्रध्दा असणे, किंवा मानणे गैर आहे असं अजिबात नाही. प्रत्येकाची श्रध्दास्थाने ही निरनिराळी असतात (त्यावर कुणीही टिका करण्याचीही गरज नसते, तो प्रत्येकाच्या आत्मानुभूतीचा विषय आहे) काही लोकं गणपतीची उपासना करतात, काहींचा श्रीशंकरांवर निस्सीम विश्वास असतो, कुणी शिर्डीसाईंचे भक्त तर कुणी श्रीगजानन महाराजांचे भक्त...व्यक्ति तितक्या प्रकृती...पण मुळात आपण भक्ती का करतो? किंवा एखाद्या विशिष्ट दैवतावर-गुरुंवर विश्वास का ठेवतो? याची कारणमिमांसा मुळात आपलीच आपण करायला हवीये.....त्याला "श्रध्दा जोखणं" असं मी म्हणतो...
....माझ्या मते बरेचदा आपल्या श्रध्देचा संबंध हा आपल्या व्यवहारीक सुखाशी किंवा यशापयशाची आपण जोडतो आणि तिथेच चुकतो. "मी गणपतीची उपासना केली आणि मला धंद्द्यात यश मिळालं" किंवा "मी विष्णुसहस्त्रनामाची पारायणे केली आणि माझा आजार बरा झाला" किंवा "मी दरवर्षी गुरुचरित्राचे सप्ताह करतो म्हणुन माझं नीट चाललंय"...ही अशी वक्तव्ये आपल्याला श्रध्दावान बनवतायत असं वरवर वाटलं तरी वास्तविक पहाता ही वक्तव्ये म्हणजे तुमच्या कमकुवत भक्तीचेच लक्षण आहे असं मी मानतो. याचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या उपासनेचं त्रैराशिक हे तुमच्या व्यवहारीक घटनांशी जोडुन चुक करत आहात. व्यवहारात घटना घडत असतात, त्या काहीवेळा तुमच्या "फेव्हर" मध्ये तर काहीवेळा तुमच्या विरोधात घडत असतात, घडणार असतात (त्याचा पुर्वकर्मार्जित कर्मांशी संबंध असतो किंवा नसतो तो भाग वेगळा विषय आहे) पण जेव्हा तुम्ही व्यवहारात तुमच्या बाजुने घडणाऱ्या घट्नांचे "क्रेडीट" परमेश्वरी उपासनेला देता तेव्हाच तुम्ही विरोधात घडणाऱ्या घटनांनाही त्यालाच जबाबदार धरु लागता...आणि श्रध्दा डळमळीत व्हायला लागते...
..."आयुष्यभर त्या गुरुचरित्राची पारायणे केली पण माझं काही चांगलं झालं नाही", "दरवर्षी मी मार्गशीर्षातले गुरुवार न चुकता करते पण काही केल्या माझी आर्थिक परिस्थिती सुधारत नाही" "शंकरावर नेमाने दर सोमवारी बेल वहातो पण माझी कामे काही होत नाहीत" अशी विधाने मग केली जातात. वास्तविक पहाता भक्ती म्हणजे आनंद असतो, तिथे निरपेक्षता असते, परिस्थितीचा स्विकार असतो, परमेश्वर आहे आणि त्याचं नामस्मरण केल्याने मला आनंद मिळतो म्हणुन मी ते करतो असा भाव अपेक्षित असतो. श्रीमंत व्हावं म्हणुन तुकारामांनी विठ्ठलभक्ती केली नव्हती, कोट्याधिश व्हावं म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही...तो त्यांचा आनंद होता. व्यवहारिक अपयशाने किंवा संकटांनी जर आपण देवाचा त्याग करणार असु तर तिला भक्ति म्हणता येणार नाही, तो शुध्द व्यवहार झाला. नाही का?
....प्राप्त परिस्थितीचा आनंदाने स्विकार करुन, आलेल्या संकटांविरुध्द लढण्याचे बळ तुम्ही परमेश्वराकडे नक्की मागु शकता पण "अमुक झालं तर तमुक" असा भाव भक्तीत अपेक्षित नाही. जोपर्यंत नीट चाललंय तोपर्यंत परमेश्वरी उपासना, पुजाअर्चा करणारी आणि एक गोष्ट जरी मनाविरुध्द झाली तरी एका क्षणात नास्तिक बनणारी मंडळी मी पाहिली आहेत, त्यांना मी "भक्तिमार्गातले व्यापारी" म्हणतो. "स्विकाराचं श्रध्देय आध्यात्म" जोपर्यंत तुम्ही आत्मसात करणार नाही तोपर्यंत ईश्वरी उपासनेतलं मर्म तुम्हाला कळणार नाही, आनंद काय असतो? ते समजणार नाही. अर्धपोटी उपाशी राहूनही आमच्या तुकोबारायांनी "आनंदाचे डोही आनंद तरंग..." हा अभंग कसा काय लिहिला? ते रहस्य समजायचं नाही. भक्ती ही कायम सघन, बळकट, निर्लेप, शुध्द, अव्याभिचारी आणि ’अ’व्यवहारी(इथे अर्थ निराळा घ्यावा) हवी हे विसरु नये
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)