Tuesday, June 12, 2012

मनातला पाऊस
-----------------
 तुझ्या येण्याच्या नुसत्या चाहुलीने
आसुसलेली गात्रं भिजल्यासारखी होतात ,
तहानलेले गळे ओलसर होतात ..
वाट बघणारे डोळे ओसंडून वाहतील  की काय ? असं वाटत ...
पण तू हुलकावणी देतोस ..आणि पुन्हा सगळं कोरडं ठक्क ...
पण ..मनामनात विश्वास असतो तुझ्या येण्याचा ...
तू येणारच असतोस ...
थेंबाथेंबातून स्पर्शाची अनुभूती द्यायला ...
कुणाला हसवायला तर कुणाला रडवायला ..
कुणासाठी आनंद सोहळा असतोस तर,
कुणासाठी मरणकळा ...
तरीही तुझी सगळी वाट पाहत असतात ...
तू कसाही आलास तरीही ....
आम्ही तुला कवेत घेतो ..
तू कुणाला हिरावून नेतोस किंवा कुणाचं काहीतरी हिरावून नेतोस ..
पण तू येतोस खरा ....
कुणासाठी तू लोभसवाणा "साजण " असतोस ,तर
कधी प्रेयसीच्या मनातला रिमझिमणारा श्रावण असतोस ..
कधी कुणाची सीता पळवणारा रावण असतोस ...आणि
विरहात असणार्यांच्या डोळ्यातला महाप्रलय असतोस ..
कुणासाठी सखा होतोस ..कुणासाठी दयाघन .
तुझ्यासाठी मनात अधीरता असते ..
तुझ्यासाठी डोळ्यात काहूर असतं ..
तुझ्यासाठी काळजात वादळ असतं ...आणि
मनामनात विश्वासाचं ..सृजनाचं  अंकुरणारं बीज असतं ..
म्हणून प्रत्येक जण  तुझी वाट  पाहत असतं  .....
तू येणारच असतोस...
तू यायलाच हवास ...
कसाही आलास तरी .
तू आम्हाला हवा आहेस ..