Thursday, October 3, 2013



(भय इथले संपत नाही...पुढील भाग..)

मृत्यूचे महानाट्य......(भाग2)

सातत्याने नवोन्मेषशाली असणारी सृष्टी सृजनशील सर्जनशीलतेची मोठी प्रतिभा आहे.परंतू नैसर्गिक प्रलयाचा महासागर जेव्हा तिला आपल्या कवेत घेतो तेव्हा ती बिनबोभाटपणे त्याला सर्वस्वाचं दान देवून टाकते आणि रिती होते पुन्हा नवीन काहीतरी जन्माला घालण्यासाठी....
       उगम आणि विनाश...जन्म आणि मृत्यु...या दोन टोकामध्येच पृथ्वीवरील जीवसृष्टीचा प्रपंच सुरु आहे.मृत्युचा हा सामुहिक उच्छाद पाहाताना ही जाणीन प्रकर्षाने होते..आणि आपण स्तब्ध होउन जातो. त्याने कुणालाच सुटकेची संधी दिली नाही एखाद्या लहरी   ,बेछूट दरोडेखोरासारखा येउन कठोर होउन निरपराधांना मरण देउन गेला..क्षणात होत्याचं नव्हतं करुन गेला..आणि मागे ठेवून गेला हळहळत्या निश्वाःसांसह फाटलेल्या आभाळाखाली गोठून गेलेली माणसं....व्याकुळतेच्या खोल डोहात बुडालेली माणसं...मृत्यूच्या महानाट्याचा जिताजागता प्रपात पाहणारी माणसं...किल्लारीसह बावन्न खेडी उध्वस्त झाली. हजारो संसार बेचिराख झाले. अनेक निष्पाप जीव उमलण्यापूर्वीच खुडले गेले, मागे राहीले फक्त मन हेलावून सोडणारे..आर्त विव्हळणारे स्वर...माझा बाबा गेला sss…..माझं तान्हुलं कुटं हाय...sss…इवल्या इवल्या चिल्यापिल्यांच्या मृतदेहाला कवटाळून,,आयाबायांचा...नातेवाईकांचा अनावर शोक...सगळीकडे हे मन छिन्नविछिन्न करणारे दृष्य काळजाला पीळ पाडत होते..मृत्यूने आपल्या  अक्राळविक्राळ जबड्यात गुलाबाच्या कळ्यांसारख्या...फुलपाखरासारख्या गोजिरवाण्या..निष्पाप..गोंडस जिवांसहीत.....तरण्याताठ्या लेकी-सुनांसहीत...म्हाता-या कोता-या कष्टक-यांना गिळून टाकलं होतं...रात्री झोपेच्या आधीन होण्यापूर्वी आपलं सर्वस्व असलेली आपल्या कुटुंबातली माणसं सकाळी सुर्योदयापूर्वी आपलं आता कुणीच नाही या भावनेने वेडीपिशी झाली होती.......
                                                                      
                                                                       क्रमशः

Wednesday, October 2, 2013



भय इथले संपत नाही..... (भाग1)
दिनांक 30 सप्टेंबर 1993 ची पहाट लातुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या किल्लारी सास्तुर आणि या सारख्या बावन्न खेड्यासाठी काळपहाट ठरली. गणरायाच्या सहवासातले आनंददायी दहा दिवस काळजाच्या कप्प्यात साठवून शांतपणे झोपी गेलेल्यांना त्याची पाठ फिरताच एका अघटीत संकटाला सामोरे जावे लागेल अशी साधी कुणकुण देखिल लागली नाही. सगळे निर्धास्त झोपलेले असतांनाच पहाटे चार च्या सुमारास हा जीवघेणा धरणीकंप झाला.नेमकं काय घडतय हे कळायच्या आत प्रचंड गडगडाटासह पाळण्यात बसल्यासारखा सारा आसमंत हलु लागला..काहीतरी भयानक घडतय हे जाणवताच हल्लकल्लोळ माजला.लोक जीवानिशी धडपडत घराबाहेर.आले याला भूकंप म्हणतात हे कळायच्या आत ,कुणालाही आवरायला सावरायला सवड न देता पहाटेच्या अंधारात त्रेपन्न गावांना त्या भूकंपाने आपल्या उदरात सामावून घेतले...आज वीस वर्षानंतरही भयावह भूकंपाची आठवण अंगावर शहारे आणते....
अंधाराचं आणि मृत्यूचं अतुट नातं आहे अनेक जीवघेण्या आपत्तींना ,नैसर्गिक संकटांना बहुधा रात्र पहाटेच्या अंधाराची साथ मिळालेली आहे. काळ्याकुट्ट अंधाराच्या साथीने निष्पापांच्या जगण्यावर आघात करणार्या ह्या नैसर्गिक आपत्तीने सकाळी उजाडताना बघणा-यांच्या काळजाचा थरकाप उडवला.निसर्गाच्या रौद्र रुपाने निशःब्द झाले सगळे...अतिशय भेसूर चित्र समोर दिसत होते...मानव आणि निसर्ग यांच्यामध्ये घडलेल्या युद्धाचं...ते युद्धही एकतर्फीच....प्रतिकाराला देखिल उसंत नाही..आक्रंदनाला वेळ नाही..कुणी कुणाला वाचवायला वेळ नाही...उठायची देखिल संधी न देता अंगावर अजस्र चिरांच ओझं टाकुन अवघं भावविश्व मातीत दडपून निसर्गाने हजारोंचा बळी घेतला.... अवघ्या त्रेचाळीस सेकंदाच्या अवधीत हे सारं घडलं...कोसळुन पडलं होतं सारं ..भावनांच  अन् जाणीवांच जग...प्रत्येकजण अनभिज्ञतेच्या बुरख्याआड आपल्याच मस्तीत जगत होता पण नियतीच्या एकाचं फटका-याने होत्याचं नव्हतं करुन टाकलं....
तांत्रिक विश्लेषणानंतर कळलं हा भूकंप अतिशय तीव्र होता.जबरदस्त हाद-याने अंगावर दगड माती पडु लागली...वीजही गेली...काळ्याकुट्ट अंधारात आक्रोश ..किंकाळ्या टाहोंनी आसमंत चिरला गेला.. नुकतच विसर्जना मुळे लातुर नियंत्रण कक्षात थोडीफार जाग होती.भराभर संपर्क झाले.आपत्तीचा अदमास नव्हता पण भयानक संहाराची कल्पना आली होती.थोडसं उजाडलं..शेतात,गोठ्यात झोपायला गेलेले आपल्या गावाकडे..घराकडे कुठल्यातरी अनामिक ओढीने धावत सुटले...गावात पोहोचल्यावर त्यांना दिसले ते दगड-मातीचे ढिगारे...त्या ढिगा-यांखाली अडकलेली मदतीसाठी,मूकआक्रोश  करणारी ..रक्तबंबाळ झालेली माणसं...नशीब बलवत्तर असलेले जे वाचले त्यांच्या डोळयात मुर्तीमंत भीती दाटलेली..हजारोंच्या नशीबात ढिगा-याखाली दबून जीव सोडणे एवढेच होते...भूकंपाची माहिती मिळाल्यावर त्वरीत पोहोचलेले पत्रकार श्री भारतदादा गजेंद्रगडकर यांना एका ढिगा-यात गाडल्या गेलेल्या महिलेचा फक्त एक हात वर दिसत होता..मदतीसाठी आकांत करताना कदाचित जगण्याच्या तीव्र इच्छेने वर आला असेल.पण फक्त बघण्यापलिकडे ते काहीच करु शकले नाहीत..त्यांच्या डोळयात पाणी तरळले..सास्तुरच्या वाटेवर सन्नाटा...सगळीकडे प्रचंड भीती...काय घडले हे न कळल्याने जाणवणारी अस्वस्थता याचे नेमक्या शब्दात वर्णन करणे अशक्य होते..जिवंत माणसांना घराच्या दगडमातीच्या ढिगा-यातुन बाहेर काढण्याच्या प्रयत्नात मृतदेह काढायचे सुचणार तरी कसे आणि कुणाला?..तशात ढिगा-यामधून बाहेर आलेला हा हात...कोणाचा असेल तो.?....आयुष्याची सुखद स्वप्नं पाहाणा-या मुलीचा......विवाहाची चित्र रंगवणा-या तरुणीचा...कि अर्ध्या संसारातुन अचानक सर्वस्व सोडुन जावे लागलेल्या विवाहितेचा कि आपल्या चिल्यापिल्यांना वाचवण्याची संधीसुध्दा न मिळालेल्या असहाय्य मातेचा? सुन्न मनस्थितीत हा फोटो त्यानी काढला खरा. पण तो पाहतांना मन अजुनही अस्वस्थ होतं...त्या अबलेला आपण गाडले गेलो आहोत हे लक्षात तरी आले असेल का? समजा तिने आरडाओरड केली असली तरी ती ऐकू कोणाला येणार आणि त्या अंधारात मदत तरी कोण करणार..कशी करणार ? सारं गावच उध्वस्त झालेल...
                                                            क्रमशः 
                                                           राजेंद्र भंडारी 
                                                            9730248735