Wednesday, August 20, 2014

ताओ तत्वज्ञान..सुंदर लेख.

निसर्गाचे प्रतिरूप म्हणजे ताओ
आपल्या ज्ञानाच्या, सौंदर्याच्या, आनंदाच्या कल्पना किती तकलादू असतात. कारण आपल्या भिरू मनानेच त्या निर्माण केलेल्या असतात. निसर्ग आपल्याला सर्व दिशांनी पुकारत असला तरी आपल्या 'सुरक्षित' आणि सुखी कोषातून आपण बाहेर जाऊ शकत नाही. ज्ञानाच्या, सौंदर्याच्या, खर्‍या आनंदाच्या आपल्या कल्पना या आत्मकोषाशी निगडित आहेत. म्हणून तर जीवनाचे आव्हान आपण स्वीकारू शकत नाहीत. आपण आपल्या घराच्या खिडक्या बंद करू लागतो. दरवाजे आधीच बंद असतात. जीवन सर्व दिशांनी आपल्याला पुकारत असले तरी त्याला प्रतिसाद देण्याचे धाडस आपल्यात नसते. आपण अशा सुखाच्या शोधात असतो की जे आपल्याला वस्तूंच्या रूपात दिसते. आपण त्या बलाढय़ सागराला आलिंगन देऊ शकत नाही. त्याचे पेंटिंग्ज करून दिवाणखान्यात लावून ठेवतो. आपल्याला खरे ज्ञान नको असते, हवा असतो त्याचा आभास. खरे ज्ञान आपल्याला स्वतंत्र करते आणि स्वातंत्र्याचे आपल्याला भय वाटते. आपल्याला तेच ज्ञान हवे जे आपल्याला संपत्ती देईल. ते सौंदर्य, सत्य, शील काय कामाचे जे आपल्याला संपत्ती देत नाही किंवा सत्ता देत नाही. माणसाचे अशातर्‍हेने बाजारीकरण आणि वस्तूकरण होणे हा या आधुनिक जगाच्या यशाचा मूलमंत्र आहे.
माणसाच्या सुखाच्या कल्पना जेव्हा वस्तूंमध्ये परावर्तित होतात तेव्हा त्याच निळंभोर आभाळ दुरावत सागराचा आवाज त्याला ऐकू येत नाही. दारातली पाखरं त्याला परकी झालेली असतात. आपला आनंद निसर्गातून येत असेल तर तो शरीराला, मनाला, आत्म्याला निश्‍चितच पुलकित करणारा असेल. कारण त्याचा संबंध माणसाच्या शोषणाशी, संघर्षाशी, रक्त, घाम, अश्रूंशी नसतो. त्याचा संबंध असतो माणसाच्या हृदयाशी. म्हणूनच तर आपले सर्व धर्म, श्रद्धा, संकल्पना निसर्गातूनच आल्या आहेत. धर्म आणि विज्ञान हे निसर्गाला पाहणारे दोन डोळेच आहेत. विज्ञान बाहेरून पाहते, धर्म निसर्गाला आतून मनातून पाहण्याचा प्रयकरतो. धर्माचा संबंध म्हणून आत्मजाणिवांशी, अंत:प्रेरणाशी आपल्या मनाशी असतो. तो अस्तित्वाला समग्रतेने पाहतो. त्यावर श्रद्धा ठेवतो. खरा धर्म कधीही हिंसक असू शकत नाही. तो स्पर्धाशील, संघर्षशील किंवा विभाजनवादी नसतो. धर्माच्या नावाने संघर्ष करणारे लोक अंध असतात. कारण धर्माचा अर्थच आहे समग्रतेने जाणा. विज्ञानही तेच काम करत असते. अर्थात त्याचा संबंध श्रद्धेशी नसून तर्कशुद्ध विचारांशी, वस्तुनिष्ठतेशी असतो. विज्ञानाच्या पुष्कळ कल्पनादेखील धर्मातूनच आल्या आहेत. या जगात काहीही स्थिर नाही हे भगवान बुद्धाने सांगितले. विज्ञानाने ते नंतर सिद्ध केले. न्यूटनने म्हटले होते की, 'हे जग ईश्‍वराने निर्माण केले आहे. त्यामुळे ईश्‍वरनिर्मित नियमांना जाणणे म्हणजेच विज्ञान.' शेवटी ईश्‍वर म्हणजे निसर्गच आहे. त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे ईश्‍वरावर प्रेम करणेच आहे. भ. बुद्धांनी ईश्‍वराचे अस्तित्व मानले नाही, पण सत्याचे स्वरूप निसर्गातच पाहिले. म्हणूनच निसर्गातील बदल जाणणे म्हणजे बुद्धस्वरूप जाणणे असे म्हटले जाते. आपले ज्ञान, विज्ञान, शहाणपण आपल्याला निसर्ग चिंतनातूनच प्राप्त होते. ताओ तत्त्वज्ञानात ताओचे प्रतिरूप म्हणजे निसर्ग म्हटले आहे. निसर्गाचे प्रतिरूप म्हणजेच ताओ. ताओचा अर्थ आहे विश्‍वव्यवस्था. ती ज्या नियमाने चालते ते नियम जाणणे म्हणजे ताओ जाणणे होय. म्हणून सौंदर्य आहे ते ताओचे. वसुंधरेचे, विश्‍वाचे. निसर्ग आहे आकारांनी बद्ध.आपल्याला डोळ्यांनी दिसते ते आकारांचे सौंदर्य आहे, म्हणून त्याचे सौंदर्यही अनंत आहे. म्हणून खरं सौंदर्य वा सुख जाणायचे असेल तर आपल्याला निसर्गाकडे वळावे लागते. त्यातून अद्भुत असा आनंद आपल्याला मिळतो. म्हणून म्हटले आहे की, ताओचे (निसर्गाचे) सौंदर्य एखाद्या गूढ रमणीसारखे आहे. तिच्या नुसत्या नजरेने ती अनंत आशयांचं महाल उभे करू शकते. ती जेव्हा पश्‍चिमेकडे पाहाते तेव्हा तिला पूर्वेकडे जायचे असते. तिच्या साध्या स्पर्शाने अनंत गोष्टी घडतात. सूर्य उगवतो आणि मावळतो. झाडांना असंख्य फुले येतात. समुद्र खवळतो आणि शांत होतो. विकास आणि विनाश याचे अखंड चक्र फिरते आणि त्याची तिला जाणीवही नसते. परस्परविरोधी शक्ती एकमेकांच्या जागा घेत असतात. विसंवादातून सुसंवादाकडे, विविधतेतून ऐक्याकडे, विनाशातून विकासाकडे, अंधारातून प्रकाशाकडे अशी जीवनाची वाटचाल सुरू होते. निसर्ग आहे आनंददायी शक्तींचा संमेळ. उत्साहाचा महास्रोत, सर्जनशीलतेचा उत्सव, पण आपण किती करंटे आहोत.
आपण वस्तू आणि सुखाची साधनं जमवण्यात मग्न आहोत. त्यालाच आपण सुख म्हणतो. सामान्यांचं आयुष्य रडत रखडत चालणार्‍या बैलगाडीसारखे असते. तिला वेग नसतो. ती कायम बिघडत असते. कधी बैल थकतात, बसतात, कधी गाडीचं चाक निखळत रस्ता नादुरुस्त असतो. कधी नद्या भेटतात अरुंद पायाच्या आणि वेगवान. कधी त्या विशाल पात्राच्या असतात; परंतु त्यांची खोली कळत नाही. म्हणून आपण अडकून पडतो. खरं म्हणजे आपण कशासाठी जगतो हे कळत नसल्यामुळे धावत असतो. जीवनातील गंभीर समस्यांपासून सुटका करून घेण्याचा मार्ग माहिती नसल्यामुळेदेखील धावतो. ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती, साधने असतात तेही धावतात आणि ज्यांच्याकडे काहीच नसते तेही धावत राहतात. प्रत्येकाला पाहिजे असते सुख, समाधान, शांतता आणि ते सारे कुठेच मिळत नसते. एरिक फ्रॉम नावाच्या एका विचारवंताने आपल्या 'एक्सेप फ्रॉम फ्रीडम' म्हणजेच 'स्वातंत्र्यापासून सुटका' या पुस्तकात माणसाच्या मनोवस्थेचं चांगलं वर्णन केलं आहे. माणूस सुखी नसण्याचं कारण भौतिकवाद किंवा चंगळवाद आहे; परंतु भारतासारख्या गरीब देशात चंगळवाद आहे तो उच्च मध्यमवर्गीयात, नवश्रीमंतात किंवा काळाबाजार करणार्‍या धनदांडग्यात. सिनेमा, क्रिकेट, राजकारण यातही तो खुळखुळत असतो. जे काळा पैसा निर्माण करतात तेच याचे सूत्रधार असतात.
भारतात जणू दोन देश राहतात. जुनाट बैलगाडीत रडत रखडत जाणार्‍या आणि राहणार्‍या ग्रामीण शेतकर्‍यांचा, शेतमजुरांचा, कारागिरांचा देश आणि दुसरा चकचकीत मॉलमध्ये फिरणारा, पॉश वस्तीत राहणारा. इंग्लंड, अमेरिकेकडे डोळे लावून बसलेला देश. एरिक फ्रॉमचे मत आहे की, 'माणसे दु:खी आहेत कारण त्यांचे सुख ते वस्तूमध्ये शोधतात.' आपल्या घरात अधिकाधिक वस्तू असाव्यात, त्या आपल्या मालकीच्या असाव्यात, त्या इतरांना दिसाव्यात यासाठी ते अहोरात्र कष्ट करीत असतात. नवनव्या वस्तूंच्या, संधीच्या मागे ते पळत राहतात आणि जीवनाचा मुख्य हेतूच विसरून जातात. माणूस स्वत:च अमूल्य आहे, पण त्याचे मॉल ठरते बाजारात तेथील स्पर्धेवर. माणसाच्या सुखाच्या संकल्पनाच बदलल्या आहेत. बाह्य दिसणे बाह्य असणे याला जास्त महत्त्व आले आहे. तुमचे ज्ञान, संस्कार, नीतिमत्ता, विद्वत्ता याला काहीही महत्त्व राहिले नाही. महत्त्व आहे ते कोणत्याही मार्गाने संपत्ती मिळवण्याला. त्यासाठी तुम्ही आपला आत्मा विकला तरी चालेल. त्यातून निर्माण होते आंधळी स्पर्धा, एकाकीपणा, सर्व जगाविषयी संशय आणि दुरावा. त्यातून येते खिन्नता, उदासीनता, मानसिक दुभंगलेपण. जिथे स्पर्धा असेल तिथे तुम्ही एकाकीच असता. माणसाचं एकाकीपण घालवण्याचे अनेक प्रकार आहेत. आहे ते जीवन स्वीकारणे, ते उत्कटपणे जगणे, त्यात आनंद मानणे किंवा बधिर होऊन जाणे, जगापासून दूर पळणे, सुखदु:खाच्या पलीकडे जाऊन कुठल्या तरी कोषात स्वत:ला अडकवून घेणे. काही लोक दारूच्या एकेक घोटाप्रमाणे स्वत:ला संपवत जातात. माणसे व्यसनाधीन होतात कारण ती आनंदी नसतात. व्यसनाधीनतेवर विजय तेव्हाच मिळेल जेव्हा माणसाला आनंदाचे व्यसन लागेल. 'आनंद हाच सद्गुण आहे. सद्गुणाचे फळ आनंद नव्हे' असे प्रख्यात विचारवंत कांट यांनी म्हटले आहे. माणसाला आनंदी राहण्याचा जन्मजात अधिकार आहे, पण खरा आनंद केव्हा मिळेल? जेव्हा आपण जीवनाचे मूल्य जाणू, आपल्याला छळ, पिळवणूक यांचा प्रतिकार करण्याचे व त्यातून मुक्त होण्याचे जन्मजात स्वातंत्र्य आहे. मग आपण कशामुळे दु:ख भोगतो? कारण आपण कुणाच्या तरी इच्छेचे बळी ठरतो. आपण आपले स्वायत्तमूल्य जाणले पाहिजे. जे निसर्गाने आपल्याला दिले आहे. आपण निसर्गाकडे वळू या. त्यासाठी जंगलात जाण्याची गरज नाही. निसर्गाकडे वळणं म्हणजे आपण आयुष्य अधिक सुंदर, सरळ सहज करणे. स्पर्धेतून द्वेष, मत्सर, संघर्ष निर्माण होतो. मुख्य म्हणजे हे जाणलं पाहिजे की, जग स्पर्धेवर नाही तर सहकार्यावर चालत.ं स्पर्धा तुम्हाला भौतिक यशाच्या, संपत्ती, सत्तेच्या नावाने एका दलदलीत घेऊन जाते. जिथे यश म्हणजे एक मृगजळच असते. खरे यश येते ते सहकार्यातून, सहसंवेदनेतून, सुसंवादातून. म्हणून लाओत्सेने म्हटले आहे, 'जो जगाशी स्पर्धा करीत नाही त्याच्याशी जगही स्पर्धा करीत नसते.' त्यातूनच माणसाला निर्विवाद यश मिळते. अमेरिकेत संशोधन करण्यात आलं तेव्हा लक्षात आलं की, तथाकथित यशस्वी आणि श्रीमंत लोक मुळीच सुखी नव्हते. दारूचं व्यसन, उद्ध्वस्त कौटुंबिक जीवन, नैराश्य, एकाकीपण, स्किझोफ्रेनिया, डिप्रेशन आदी रोगांनी ते मस्त होते. नैराश्य हा २0२0 साली अत्यंत मोठा मनोविकार असेल आणि लोकसंख्येच्या पंचवीस टक्के लोक त्यांनी बाधित असतील, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. याचे कारण आपले तथाकथित यश आपले मानसिक, शारीरिक, कौटुंबिक आरोग्य उद्ध्वस्त करीत असते. आपल्या यशाचा पाया नैतिक नसतो हेच त्याचे कारण आहे. आपली जीवनव्यवस्था सदोष आहे. ती स्पर्धा, संघर्ष, अशांततेवर उभी आहे. म्हणून समजून घ्यायचं आहे की, 'माणूस म्हणजेच खूप काही आहे, ज्याच्याकडे खूप काही आहे तो नव्हे,' असे एरिक फ्रॉमने आपल्या सेन सोसायटीत म्हटले आहे. म्हणून आपण शहाणं असू तर जीवनाचं महत्त्व ओळखू. आलिशान गाडीतून प्रवास करण्यापेक्षा आपण कधी तरी पायी चालू. निसर्ग आपल्याबरोबर चालू लागेल. हजारो रुपयांचे ड्रेस, साडी, दागदागिने अंगावर मिरवण्यापेक्षा आपण कधी तरी मुक्त होऊ या सार्‍या हव्यासातून. आपल्या गरजा कमी केल्या तर स्वातंत्र्य मिळेल. सर्वांच्या सुखात आपण आपलं सुख शोधलं तर माणूस मानसिकदृष्ट्या जास्त सक्षम, निरोगी आणि जास्त वरच्या पातळीवर जातो, असे अँडलर, एरिक्सन, कोहलबर्ग गिलीगन अशा जागतिक दर्जाच्या मानसशास्त्रज्ञांनी लिहून ठेवलं आहे. आपल्याला जीवनात संगीत हवं आहे की महागडी म्युझिक सिस्टीम? संगीत हवं असेल तर ते आपल्या मनातच जन्मतं, आपल्याला ते ऐकता आलं पाहिजे इतकंच.
(लेखक हे ताओ तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत)

Tuesday, August 19, 2014

खरच,आपण असच असलं पाहिजे..

एका पोस्ट वरून
हे परमेश्वरा...
मला माझ्या वाढत्या वयाची जाणिव दे.
बडबडण्याची माझी सवय कमी कर.
आणि प्रत्येक प्रसंगी मी बोललच पाहिजे ही माझ्यातली अनिवार्य ईच्छा कमी कर.
दुसर्‍यांना सरळ करण्याची जबाबदारी फक्त माझीच व त्यांच्या खाजगी प्रश्नांची दखल घेउन ते मीच सोडवले पाहिजेत अशी प्रामाणिक समजूत माझी होऊन देऊ नकोस.
टाळता येणारा फाफटपसारा व जरुर नसलेल्या तपशिलाचा पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ मुद्यावर येण्याची माझ्यात सवय कर.
इतरांची दुःख व वेदना शांतपणे ऐकण्यास मला मदत करच पण त्यावेळी माझ तोंड शिवल्यासारखे बंद राहुंदे. अशा प्रसंगी माझ्याच निराशा, वैफल्यांचे रडगाणे ऐकवण्याची माझी सवय कमी कर.
केंव्हा तरी माझीही चूक होउ शकते, कधीतरी माझाही घोटाळा होऊ शकतो, गैरसमजुत होऊ शकते ह्याची जाणीव माझ्यात ठेव.
परमेश्वरा,
अगदी शेवटपर्यंत माझ्यात प्रेमाचा ओलावा, गोडवा, लाघवीपणा राहू दे.
मी संतमहात्मा नाही हे मला माहीत आहेच, पण एक बिलंदर बेरकी खडूस माणूस म्हणून मी मरू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.
विचारवंत होण्यास माझी ना नाही पण मला लहरी करू नकोस. दुसर्‍याला मदत करण्याची इच्छा आणि बुद्धी जरूर मला दे पण गरजवंतांवर हुकूमत गाजवण्याची इच्छा मला देऊ नकोस.
शहाणपणाचा महान ठेवा फक्त माझ्याकडेच आहे अशी माझी पक्की खात्री असूनसुद्धा, परमेश्वरा, ज्यांच्याकडे खरा सल्ला मागता येइल आणि ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडता येइल असे मोजके का होईना पण
चार मित्र मला दे.
एवढीच माझी प्रार्थना.
पु. ल.

Tuesday, August 12, 2014

वडीलांस पत्र.

" वडीलांस पत्र ..........."
प्रिय " बाबा " यांस ,

आज थोडं एकट एकट वाटलं,
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

चालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात,
पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,
आज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

जेवताना काऊ चिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही,
आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,
काऊ चिऊ साठी पुन्हा एकदा रुसवासं वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

लहानपणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप मजा वाटायची,
फाटका रेनकोट , तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची,
आज , नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

एकदा घरात एकटा असताना, सर्व घर रडून डोक्यावर घेतलं होत,
पण तुम्ही धावत पळत येउन ' मी आहे 'असं सांगितलं होत,
आज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा " एकट एकट " वाटलं .
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

आठवतय… एकदा मी पडलो होतो,मला खूप लागलं होत ,
त्यादिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या डोळ्यात दाटलं होत,
आज , उगाचंच अडखळून पडावसं वाटलं…
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

रात्री झोपताना तर तुमची मांडीच माझी " उशी " असायची ,
तुम्ही नसताना आईच्या कुशीतही झोप नसायची,
आज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावं वाटलं….
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

तुमचा हात सोडून शाळेत जाणे नकोसे वाटायचे,
पण तोच हात पकडून घरी जाताना मात्र कसलेच भान नसायचे,
आता मोठा झालो तरी " तो " हात पकडून शाळेत जावंसं वाटलं…
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

"तुझे बाबा , देव बाप्पा कडे गेले " अस मला कुणीतरी सांगितलं होत,
मात्र देव बाप्पा कुठे राहतो हेच मला कोणी सांगितला नव्हतं,
लहानपणीच्या त्या प्रश्नावर आज थोडं हसावसं वाटलं ….
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

जीवनातली तुमची कमी आईने कधीच भासू दिली नाही ,
पण तुमची आठवण मनातून कधीच जाऊ शकली नाही,
आज , भरलेल्या आभाळाबरोबर डोळ्यात पाणी दाटल्यासारखं वाटलं….
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……

बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……

(Advocate jayant Deshmukh यांच्या Timelineवरुन साभार)