Thursday, April 24, 2014

सुंदर विचार.

प्राजक्ताची झाडे भेटताना...
आयुष्याच्या वाटेवर कधी खाचखळग्यांतून जावे लागते. कधी काट्याकुट्यांची वाट तुडवावी लागते. कधी अवघड वळणे पार करावी लागतात. कधी उंच कडे आणि खोल, धडकी भरवणारी दरी यामधल्या अरूंद वाटांमधून प्रवास करावा लागतो. पण माय-पिता-शिक्षक-पती अथवा पत्नी यांनी आपल्या मन-मनगट-मेंदूमध्ये ताकद पेरलेली असते. मानसिक, भावनिक, शारीरिक, आत्मिक बळ वाढवलेले असते. ती ताकद-बळ काटे-कुटे, खाच-खळगे तुडविताना हिंमत देते.
जीवनमार्गावरच्या दुःसहतेचे हे केवळ वाङ्मयीन वर्णन नाही; तर असे अनुभव झोपडपट्टीमध्ये, बंगल्यामध्ये, आलिशान निवासांमध्ये राहणाऱ्यांनाही येतात. प्रवास करताना कोट्यधीशांची विमाने कोसळतात. काश्मीरच्या सहलींमध्ये सहकुटुंब स्वर्गीय सौंदर्यपान करताना हिमकडे कोसळून गतप्राण व्हावे लागते. पण आयुष्याची राख होतानाही जगण्यासाठी उमेद देणारे सगे-सोयरे, परिचित-अपरिचित भेटतात. पाठीवर हात ठेवीत 'लढ' म्हणत कढ आवरण्यास ते ताकद पेरतात. 'अरे नेस्तनाबूत, मातीस मिळालेलेही उभारी धरतात. फिनिक्स पक्ष्यांसारखे राखेतून भरारी घेतात,' सांगत आशेचे किरण दाखवितात. अपयशामुळे मनाचा दाह असह्य झाल्यावर 'फायर ब्रिगेड' बनतात. थंडगार शब्दसरींसारख्या बोलांनी शांतवतात. आपण आपली उंची वाढविण्यास जिवाचे रान करतो, पण काहीजण टिंगल-टवाळी करतात. यश मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करीत नाहीत.
एका सद‍्गृृहस्थांनी बालसंकुलात हयात खर्च केली. आपल्या एकुलत्या मुलासाठी अनाथाश्रमामध्ये वाढलेली कन्या वधू म्हणून घरी आणली. त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी निमंत्रणासाठी गेल्यावर शुभेच्छाही दिल्या नाहीत. नवविवाहित जोडप्याला सकारात्मक निमंत्रण दिले नाही. रोटरी, महापौर,सेवाभावी ट्रस्ट, आदींनी सत्कार केले. एका स्नेही महिलेने त्यांची आकाशवाणीवर मुलाखत घेतली. पण अनाथाश्रमात वाढलेल्या, पदवीपर्यंतचे शिक्षण घेत उपअधीक्षक पदावरून निवृत्त झालेल्या त्या सद्गृहस्थाला पदाधिकाऱ्यांचे वर्तन विंचवाचा डंख वाटते. माणसे अशी निवडुंगाची फांदी का बनतात? का फटकारतात? पण काही माणसे भेटतात तेव्हा म्हणावे वाटते, 'अशी जागा आहात तुम्ही आयुष्यातली, जिथे हातात माझ्या नेहमी फुलेच आली.'
काही वेळा आयुष्याची वाट मागे टाकत जाताना सद्भाग्यामुळे काही माणसे 'माणूस' म्हणून भेटतात. आपल्यामधला 'माणूस'जागवतात. काही माणसे श्रावणातील प्राजक्त रूप घेऊन समोर येतात. ती सहवासामध्ये येणाऱ्यांसाठी पानोपानी बहरलेली, फुलांनी डवरलेली असतात. त्यांच्याखाली फक्त उभे राहायचे असते. फिकट पिवळ्या रंगाच्या पाकळ्यांची, नारंगी-शेंदरी रंगाच्या देठांची, मृदुल, नाजूक फुलं अंगावर पडतात. मंद मंद सुगंधाच्या हळुवार लाटांची बरसात करतात.
कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक आयुष्याची वाट कितीही खडतर असली तरी प्राजक्ताची भेट व्हावी. प्राजक्त फुले देहावर टपटपावित. तन-मन-चेतापेशी-अंतर्याम शीतल-रंगीन, गंध-सुगंधाने भारून, भारावून जावे. आजच्या जगातील प्रदूषित वातावरणाचा संसर्ग टळावा. 'सर्वेः सुखिना संतु' ओठी यावे. तुम्हाला भेटला का प्राजक्त कधी? का तुम्हीच कोणासाठी प्राजक्त बनलात कधी? आठवा ना शांतपणे!
प्रा. अनुराधा गुरव

Wednesday, April 9, 2014

संस्कार म्हणजे नेमकं काय?

‘संस्कार’ म्हणजे नेमकं काय?
प्रत्येक व्यक्तीवर चार ठिकाणांहून ‘संस्कार’ होत असतात. एक- त्याच्या घरातून, तिथल्या वातावरणातून! दोन- शाळा-कॉलेजमधून, तीन- आजूबाजूच्या समाजाकडून आणि चौथे त्याच्या ‘आंतरमनातून’. आणि या चौथ्या संस्कारावरच खरं जीवन अवलंबून असतं, असं मला वाटतं.
१९७२ साली आम्ही दोघं परदेश प्रवासाला गेलो होतो आणि त्या वेळचे हे तीन ठिकाणचे अनुभव आहेत. अनुभव नव्हे स्वानुभव! आश्चर्य वाटावे असे! विश्वास बसणार नाही असे! पण ते मनावर ‘संस्कार’ करून गेले आहेत, म्हणून तुम्हाला सांगते.
(१) जपानला टोकियो शहरात चालताना कोपऱ्यावर कधीही न पाहिलेल्या फळांची चवड लावलेली होती. विकत घ्यायला म्हणून जवळ गेलो तर तिथे कुणी विक्रेता नव्हता. १५-२० मिनिटं त्याची वाट पाहण्यात घालवली. एवढय़ात इंग्रजी भाषा बोलता येणारा एक जपानी इसम आमच्याजवळ आला आणि म्हणाला, ‘‘तुम्हाला ही फळं हवी असतील तर एक पिशवी उचला. डझनभर आहेत. बाजूला त्याचा भाव लिहिलेला आहे. खाली पैशाची पेटीही ठेवलेली आहे. त्यात पैसे टाका आणि पुढे चला.’’ ..त्याचं हे बोलणं ऐकून मी विचारलं- ‘‘अहो, पण तो विक्रेता कुठे आहे? आणि ही पेटी कुणी उचलून नेली तर?’’ त्यानं जे उत्तर दिलं, ते ऐकून मी अवाक् झाले. तो म्हणाला, ‘‘इथला विक्रेता दिवसभर एका कारखान्यात काम करतो. संध्याकाळी त्याचं काम संपलं की इथे येऊन उरलेली फळं आणि पैशाची पेटी घेऊन तो घरी जाईल. उद्या पुन्हा नवीन फळं आणून लावेल आणि पैशाच्या पेटीबद्दल म्हणाल तर आमच्या देशात आम्ही दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावत नाही.’’ ..त्याचं उत्तर ऐकून मला दिसायला लागलं की ‘दादरला रानडे रोडवर एक शंभरची नोट पडली आहे आणि ती आपली नाही’ म्हणून लोक तिला वळसा घालून पुढे जात आहेत.
(२) जर्मनीमध्ये एका स्टेशनवर एक चाळिशीची बाई आपली दोन मुलं आणि तीन डाग सांभाळत गाडीची वाट पाहत उभी होती. तिची गाडी आली, ती निघून गेली आणि माझ्या लक्षात आलं की, घाईमध्ये चढताना तिची एक बॅग प्लॅटफॉर्मवरच राहून गेली आहे. आमच्या गाडीला अजून वेळ होता. म्हणून मी ती बॅग उचलून शेजारच्या ऑफिसमध्ये नेऊन दिली आणि घडलेला प्रकार सांगितला. त्या माणसानं चिडून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘‘तुम्ही का हात लावलात तिच्या बॅगेला? होती तिथे नेऊन ठेवा. त्या बाईच्या जेव्हा ही गोष्ट लक्षात येईल, तेव्हा ती परत येईल आणि आपली बॅग घेऊन जाईल. दोन दिवस तिच्या लक्षात नाही आलं, तरी ती बॅग तिथेच असेल.’’
(३) दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनची सांपत्तिक स्थिती फार वाईट झाली होती. त्या काळात माझे यजमान तिथे शिकत होते. एक दिवस रेडिओवरून एक बातमी प्रसृत करण्यात आली की- ‘‘या वेळी चुकीने तुम्हाला रेशनच्या दुकानातून एक आठवडय़ाऐवजी दोन आठवडय़ांचे रेशन दिले गेले आहे. तरी एक आठवडय़ाचं रेशन परत करावं. नाही तर आपत्ती ओढवेल.’’ ..दुसऱ्या दिवशी सर्व दुकानांच्या बाहेर जास्तीचं रेशन परत करायला लोकांच्या रांगा लागल्या.
आज ४० वर्षांनंतर हे सारं आठवले की, मनात येतं की आज त्या ठिकाणी काय परिस्थिती असेल? असेच असतील का अजून संस्कारी लोक, संस्कारी समाज आणि संस्कारी देश? आज काय आहे माहीत नाही. एखादेवेळेस तिथल्या लोकांनाही या ‘परिकथा’ वाटत असतील.
आज हे अनुभव आठवले आणि पुन्हा एकदा माझं मन ‘संस्कार’ या विषयाकडे वळलं. पाठोपाठ माझी आई उच्चारायची ते एक वाक्य आठवलं- ‘वाण्याचा पसा, सोनाराचा मासा आणि शिंप्याचा खिसा’ एवढे तरी स्वत:कडे राखून ठेवण्याचा प्रत्येकाचा कल असतोच.. कारण प्रत्येकजण दरक्षणी ‘मी’चा विचार आधी करतो. मी- माझा परिवार- माझे विचार- माझे यश- माझा पैसा- समाजातील माझे स्थान- माझा भविष्यकाळ आणि माझा स्वार्थ- एवढे तरी तो प्रथम स्वत:साठी राखून ठेवतोच. कारण या ‘मी’वर त्याचं पहिलं प्रेम असतं आणि तो या ‘मी’ला सोडून आयुष्य जगूच शकत नाही.. ‘संस्कार’ हा तसा तीन अक्षरी लहानसा शब्द! पण त्याच्या अंतरंगात शिरलं की- तो आपल्या संपूर्ण आयुष्याला कसा व्यापून राहिलेला असतो, हे लक्षात यायला लागलं.
मोबाइल, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स यांच्या आगमनानंतर जीवन उधळून गेलंय, पण करणार काय? असं जात जात हे जग कुठे जाणार आहे, याचा विचार करायला वेळ तरी कुणाजवळ आहे आज? आमच्यासारख्या वयस्कर मंडळींच्या मनाला एक प्रकारचं हताशपण आलंय.
प्रत्येक व्यक्तीवर चार ठिकाणांहून ‘संस्कार’ होत असतात. एक- त्याच्या घरातून, तिथल्या वातावरणातून! दोन- शाळा-कॉलेजमधून, तीन- आजूबाजूच्या समाजाकडून आणि चौथे त्याच्या ‘आंतरमनातून’. आणि या चौथ्या संस्कारावरच खरं जीवन अवलंबून असतं, असं मला वाटतं. आपण कसं जीवन जगणार आहोत, हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं. या संस्काराचा थोडा बारकाईनं विचार करू.
विज्ञानाच्या कक्षा रुंदावायला लागल्यापासून गेल्या २५ वर्षांत स्त्री-पुरुष- सारा समाजच आंतरबाह्य़ ढवळून निघाला आहे आणि त्याचे परिणामही दिसायला लागले आहेत. चांगले-वाईट दोन्ही! सगळ्यांचीच वावटळ उठलीय.
(१) शहरी जीवनात आजकाल अनेक ‘घरांतून’ जगण्याच्या अनेक तऱ्हा पाहायला मिळतात.. काही ठिकाणी संध्याकाळ झाली की, वडिलांची मद्याची आचमनं सुरू होतात. त्याचा अमल चढायला लागला की, स्वभावाची अवस्थाही बदलायला लागते. कभी खुशी- कभी गम अशी स्थिती होते. हळूहळू त्याच माळेतले आजूबाजूचे मणी गोळा व्हायला लागतात. गप्पांचा, हसण्याचा, खिदळण्याचा आवाज चढायला लागतो. शनिवार संध्याकाळ असेल तर या साऱ्याला ऊतच येतो; फड रंगायला लागतो.. स्नॅक्सच्या बशा आत-बाहेर करताना बायको वैतागते. मुलंही सैरभैर होतात, पण इलाज नसतो. हळूहळू सारेजण या परिस्थितीला सरावले जातात. आजकाल अनेक विवाहित स्त्रियाही तिच्या नवऱ्याच्या किंवा त्याच्या मित्रांच्या ग्लासला ग्लास भिडवत ‘चीअर्स’ करतात आणि पार्टीत सामील होतात. पी.जे.- पाचकळ विनोद सांगून होतात- हशा पिकतो.. रात्रीचे ११ वाजून गेले तरी कुणालाच जेवणाचं भान नसतं. थोडय़ा वेळाने ठिकाणावर आले की, गरम-गार जसं असेल तसं जेवून घेतात आणि घरोघरी पांगतात.. या साऱ्यांत मुलं केव्हा तरी स्वयंपाकघरात जाऊन असेल ते पोटात ढकलतात किंवा कोपऱ्यावरची पावभाजी खाऊन येतात आणि झोपून जातात.
दुसऱ्या काही घरांतून अगदी वेगळं वातावरण असतं. घरं लहान असतात. दोन-तीन पिढय़ा एकत्र राहत असतात. तिथे मग विचारांतले मतभेद, स्वभावांचे प्रकार, आवडीनिवडी, त्यातच वृद्धांच्या शारीरिक तक्रारी, डॉक्टरांकडच्या फेऱ्या, औषधांच्या याद्या, वाढती महागाई, मुलांचं भवितव्य, मुलीचं लग्न या आणि अशाच अनेक कारणांमुळे जो तो त्रस्त असतो. प्रत्येकालाच एक विचित्र ताण जाणवतो.. हळूहळू मग तो मुखावाटे बाहेर पडतो. वाद होत राहतात. रंगाचा बेरंग होतो. याच वातावरणातून मुलं मोठी होत असतात. त्यांच्या मनावर या साऱ्याचे पडसाद उमटत राहतात. त्यातून काही वाहवत जातात तर काही या साऱ्याकडे सजगतेनं पाहत वाढत राहतात.. तसं पाहिलं तर प्रत्येक ‘घर’ म्हणजे एक कादंबरी असते. या साऱ्यांतून मुलांवर संस्कार होतील ते होतील. आजकाल कुणालाच त्याबाबत विचार करायला वेळ नाही.
‘शाळा-कॉलेजच्या’ म्हणजे शिक्षणाच्या वयात जे संस्कार मनावर होतात, ते बऱ्याचदा गुरुशिष्यांतल्या नात्यांवर आणि त्यांच्याविषयी वाटणाऱ्या आदरांवर अवलंबून असतात. निवडलेला अभ्यासक्रम, त्यावर केलेली मनाची एकाग्रता, भविष्याविषयी ठरविलेल्या निश्चित अशा दिशा, उत्तम वाचन, जगात नित्य-नव्यानं घडणाऱ्या घटना- त्यांच्याकडे पाहण्याचा डोळसपणा यातून व्यक्तीची जडणघडण होत जाते.. याउलट निवडलेला मित्रवर्ग जर व्यसनांच्या आहारी गेलेला असेल, त्यांच्या तोंडची भाषा ओंगळ असेल, तर जीवनाला भलतेच वळण लागते. ते भरकटले जाते. चांगले संस्कार होण्याचे बाजूलाच राहते.
‘आजूबाजूच्या समाजाकडून’ होणाऱ्या संस्काराबाबत बोलावं तेवढं थोडंच आहे.. वर्तमानपत्र उघडलं की ८०% बातम्या भ्रष्टाचार, काळाबाजार, गुंडगिरी, बलात्कार, खून, मारामाऱ्या, दरोडे, आंदोलनं, उपोषणं आणि आत्महत्या यांच्याचबद्दल असतात. त्यामुळे ‘कधी एकदा पेपर येतो’ असं आजकाल होत नाही.. दूरदर्शनच्या पडद्यावरून लांबलचक फरपटत जाणाऱ्या मालिका, अवास्तव विषय, स्पर्धा, ओंगळ- पाचकळ विनोद, लहान लहान मुलींकडून डोळा मारत- ओठ दुमडत सादर केल्या जाणाऱ्या लावण्या, तरुण मुलं-मुली कमीत कमी कपडय़ांतून करत असलेली नृत्यं- या सगळ्या गोष्टी घरातले सर्व वयांचे लोक आवर्जून बघत असतात. ‘एकमेकांना मिठय़ा मारणं’ हे तर आजकाल सर्रास झालंय. एकमेकांना स्पर्श केल्याखेरीज कुणाला भावना व्यक्तच करता येत नाहीत. नवररसांचा राजा ‘शृंगार’- जो एकेकाळी शय्यागृहापुरता मर्यादित होता, तिथला अधिपती होता, तो आज रस्त्यावर आलाय, स्वस्त झालाय. मोबाइल, कॉम्प्युटर्स, लॅपटॉप्स यांच्या आगमनानंतर जीवन उधळून गेलंय, पण करणार काय? असं जात जात हे जग कुठे जाणार आहे, याचा विचार करायला वेळ तरी कुणाजवळ आहे आज? आमच्यासारख्या वयस्कर मंडळींच्या मनाला एक प्रकारचं हताशपण आलंय. नव्या युगात सामावून जाता येत नाही आणि लहानपणचं निरागस- निर्मळ- शांत आयुष्य फक्त वाकुल्या दाखवत राहतं, चिडवत राहतं. त्याचा कितीही मोह झाला तरी परत फिरता येत नाही.
मनात उलटसुलट विचारांचा गोंधळ उडतो आणि मग मनात येतं, शेवटी ‘अंतर्मनातले’ संस्कारच आयुष्याला योग्य वळण देतात. या लेखाच्या सुरुवातीला सांगितलेले विविध देशांतले अनुभव आठवले तरी आपण त्या संस्कारांपासून किती अंतरावर आहोत हे लक्षात येईल. तसं यायला पाहिजे. वाण्याचा पसा- शिंप्याचा खिसा आणि सोनाराचा मासा हे सारं आज गरजेचं असलं, तरी त्याचं प्रमाण किती ठेवायचं हे प्रत्येकानं ठरवायला हवं. तरच ‘चारित्र्य’ नावाची चीज टिकून राहील, संस्कारी जीवन वाटय़ाला येईल.
परवा दूरदर्शनवरून एक स्वामीजी प्रवचन करत होते. बोलता बोलता त्यांनी एक छान वाक्य उच्चारलं-
‘‘जो आज ‘बच्चा’ आहे त्याला ‘अच्छा’ व्हायचं असेल तर प्रथम ‘सच्चा’ बनायला पाहिजे.’’
एकदम पटलं. मनाचं हताशपण काही काळ तरी दूर झालं. त्या जागी प्रसन्नता आली. जग संस्कारी वाटायला लागलं.
मोहिनी निमकर