Thursday, August 27, 2015

पु.ल. च एक सुंदर पत्र

या पत्रात पु लं सगळ्या आयुष्याचं सार सांगून जातात. आपण जगायला का आलो इथपासून ते आयुष्याचा सर्वोत्कष्ट बिंदू इथवर ते सारं सांगतात.या पत्राचं निमित्त ही तसं वेगळं आहे. पुलंचे नातेवाईक, चंदू ठाकूर हे लष्करात – हवाई दलात होते. त्यांच्या जवळच्या मित्राचं विमान अपघातात निधन झालेलं होतं. अशा प्रसंगी आयुष्याबद्दलच निराशा वाटून त्यांनी पुलंना एक पत्र लिहिलं. त्याचंच हे उत्तर.
--------------------------------------------------------------------------------------
> १० जुलै १९५७, -
> प्रिय चंदू
> रात्रीचे पावणे अकरा वाजले आहेत आणि मी रेडिओतून एक संगीतिकेचा कार्यक्रम प्रोड्यूस करून आताच घरी आलो आहे. तुझे पत्र वाचले. सुनीता सातार्‍याला बाबांकडे गेली आहे. वास्तविक पत्र तिला आहे पण तुझ्या पत्राला उत्तर लिहावेसे वाटले म्हणून उत्तर लिहायला लगेच बसलो. मला गेल्या कित्येक दिवसांत शांतपणे स्वस्थ बसायला फुरसदच मिळाली नाही. हा ऑपेराच घे. गेले आठ दिवस मी राबतो आहे. आज ९ ३० ते १० हा कार्यक्रम झाला. स्वर हवेत विरून गेले. मला फक्त थकवा उरला आहे. मी विचार केला – फक्त थकवा च उरला आहे का? वास्तविक विचार केलाही नसता. लाथ मारून वळकटी उघडली असती आणि घोरायलाही लागलो असतो. पण तुझ्या पत्राने थकलेल्या अवस्थेतही विचार करायला लावले. आणि जसजसा विचार येईल तसतसा मी लिहिणार आहे. किंवा पेन आणि कागदाच्या सहाय्याने विचार करणार आहे.
> तुझ्या सर्व पत्राचा सारांश हाच आहे की हे सारे आहे तरी काय? जुन्या लोकांनीही हा प्रश्न विचारून घेतला आहे. कस्त्वम? कुत: आयात:? तू कोण आहेस? कुठून आला आहेस? पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला वाटतं हा नाही. तू कशासाठी आला आहेस हा प्रश्न महत्वाचा आणि काण्ट पासून विनोबांपर्यंत सर्वजण त्या प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. त्या थोरांच्या मानानं आपण अल्पमतीच. पण तू कशासाठी आला आहेस? हा प्रश्न सुचण्याचं भाग्य ज्यांना ज्यांना लाभलं; ते तुझ्या पत्रामुळं तुलाही लाभलं आहे, असं मला वाटलं; ते धन्य आहेत. हा महान प्रश्न आहे. मनाच्या महान अवस्थेत हा प्रश्न सुचतो. तुझं विमान ज्याप्रमाणे जमिनीवर स्वत:चा पंखा नुसताच फिरवीत राहिलं तर त्याला अर्थ नाही त्याचप्रमाणे मन देखील जागच्या जागी नुसतं घुमत राहिलं तर त्याला किंमत नाही. जमिनीवरचे पायच सोडून एक उड्डाण घ्यावं लागतं आणि अलिप्तपणाने भूगोल पाहिल्यासारखा जीवनाचा विचार करावा लागतो. पण हा विचार करताना आपल्याला त्याचे उत्तर देण्याची ताकद आहे, अशा अहंकारानं जर विचार सुरू झाला तर उत्तर कधीच सापडत नाही. त्याला संपूर्ण निर्मम व्हावं लागतं आणि घोडे पेंड खाते ते इथेच.
> तू तुझ्या पत्रात अखिल स्त्री जातीला अत्यंत हीन लेखून मोकळा झाला आहेस. बायका मूर्ख! का – तर तुला त्यांच्यात अजिबात अर्थ आढळत नाही. पण अशाच तुला मूर्ख वाटलेल्या बाईचं छोटं पोर पाहिलं आहेस न तू? त्याचं ती सर्वस्व आहे कारण त्याच्या सुखदु:खाशी तिच्या इतकं कोणी रममाण झालं नाही. आणि माणसाला काय हवं असतं ठावूक आहे? स्वत: शी एकरूप होणारं दुसरं कोणीतरी! काय भयंकर अहंकार आहे नाही? तुझ्याशी स्वत:चं ‘स्व’त्व विसरून आपलं सर्वस्व अर्पण करणारी व्यक्ती हवी आहे. पण तू असा विचार केला आहेस का? तू कुणाच्यात तुझा ‘स्व’ अर्पण करायला तयार आहेस का? निर्मम होऊ शकतोस का? नाही! तू होऊ शकत नाहीस. मी होऊ शकत नाही. होऊ शकतात फक्त स्त्रिया. ज्यांची तुला अजून ओळख पटली नाही.
> तुझी आई पहा. ती आप्पांसाठी जगते. तिला वैयक्तिक महत्वाकांक्षा नाही. सुनीता स्वतंत्रपणे खूप गोष्टी करु शकली असती. तिच्यात असामान्य बुध्दीमत्ता आहे. पण तिने आपले सर्वस्व माझ्यासाठी ठेवले. माझ्याशिवाय तिला विचार नसतो. इतके आपण पुरुष समर्पणाच्या वरच्या अवस्थेला नाही जाऊन पोहोचत. दु:खे निर्माण होतात ती इथे! तू सदैव मृत्यूच्या छायेत वावरत असतोस. मी देखील ऑफिसमध्ये रोज सोनापुरावरून जातो. अनेकांची अंतिमयात्रा मला दिसते. विचार येतो सारा अट्टाहास यासाठीच का करायचा? लिहायचं – नाटकं लिहायची – विनोदी साहित्य लिहायचं-गायचं – गाणी करायची – कशासाठी? शेवट तर ठरलेलाच आहे. पण हे सारे विचार कुठून उत्पन्न होतात. त्याची गंगोत्री कोणती? त्याची गंगोत्री आपल्या अहंकारात आहे. मी आहे तर जग आहे. किंबहुना सारं मला आवडेल असं असलं तरच त्या अस्तित्वाला किंमत आहे. या विचारातून नक्की काही संभवत असेल तर दु:ख! निराशा!. तुला असल्या निराशेने घेरले आहे.
> तुला वाटतं मी फ्लाईंग का करावं? चंदू – कारकुनांनी तरी मानेचा काटा मोडेपर्यंत का झिजावं? भंग्यांनी संडास साफ का करावे? स्त्रियांनी बाळंतपणाच्या यातना का भोगाव्या? इतकंच काय गाणाऱ्यांनी का गावं? चित्रकारांनी चित्रं का काढावी? जगात कुणी कुणाला दु:ख का द्यावं या प्रश्नाइतकाच जगात कुणी कुणाला आनंद तरी का द्यावा हा प्रश्न विचारता येण्यासारखा आहे. शहाण्यांनी या प्रश्नाच्या मागे लागू नये. कारण हे सारं काय आहे कशासाठी आहे याचं उत्तर कुणालाही सापडलं नाही. हे आहे हे असं आहे. यात आपल्याला होऊन अर्थ निर्माण करायचा आहे. नाही तरी फूल म्हणजे काय असतं? काही स्त्रीकेसर काही पुंकेसर एक मऊमऊ तुकड्यांचा पुंजका एवढंच ना? पण आपण त्याला अर्थ दिला. कुणी ते प्रेयसीला दिलं. कुणी देवाला दिलं. कुणी स्वत:च्या कोटाला लावलं आणि फुलाला अर्थ आणला. जीवनालाही असाच अर्थ आणावा लागतो. आणि तो अर्थ काहीतरी घेण्यात नसून काहीतरी देण्यात असतो. जीवनाला आपण काहीतरी द्यावे लागते. अगदी निरपेक्ष बुध्दीने द्यावे लागते. आणि मग जीवनाला अर्थ येतो.
> हवेत विरणाऱ्या अल्पजीवी स्वरांची संगीतिका आज नदीत दीपदान करतात तशी मी सोडली. कुणाला आवडेल कुणाला नावडेल. कुणी माना डोलावतील कुणी नाकं मुरडतील. मला त्याचं दु:ख वा आनंद होता कामा नये. दु:ख झाले पाहिजे ते देताना झालेल्या चुकांचे, अपूर्णत्वाच्या जाणीवेचे. आनंद झाला पाहिजे ते करताना झालेल्या तन्मयतेचा! बस्स. एवढेच करण्यासाठी आपण इथे आलो आहे. तुकोबा म्हणतात याचिसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दीस गोड व्हावा. मी म्हणतो रोजचा दीस गोड व्हावा हा अट्टाहास हवा. कारण रोजच्यातला कोणता दिवस शेवटचा आहे हे कधी कुणाला आधी कळलं आहे? आईला पोरापासून काही घेण्याचा आनंद कुठे असतो? पोराला जन्मल्यापासून ती देत येते. तू कधी वासरू पीत असताना गाईचे समाधानी ध्यान पाहिले आहेस का?
> जीवनाचा मळा आपण शिंपावा. उगवलं तर उगवलं मग कुठल्याही क्षत्रात तू ऐस. वैमानिक ऐस अगर हमाल ऐस. बोजा टाकायचाच आहे. तो आनंदाने टाकावा. वैतागाच्या ठिणग्या लगेच पायाखाली विझवाव्या. वैताग कंटाळा मलाही येतो. क्षुद्रपणा दिसतो. स्वार्थ दिसतो. पण तसा आपल्यातही कुणाला आढळणार नाही ना याची चिंता असावी. म्हणजे मग जगण्याला धार येते. मनाचा आम्ल झडतो. तू हे फिलॉसॉफर वाचण्यापेक्षा ललित लेखक वाच. डोस्टोवस्की – गोर्की – डिकन्स – शेक्सपियर वाच. जीवनाला रंग देणारी माणसे ही. तत्वद्न्यांचं आणि माझं कधीच सूत जमलं नाही. शून्याला भागत बसणारी मंडळी करायची आहेत काय? त्यापे्क्षा तुझ्या दारासमोर फुलबाग करायला लाग! जीवनाचा आनंद अत्तराच्या कुपीतले झाकण उघडल्यासारखा दरवळायला लागेल आणि ऐसा मझा येईल!
> लग्न जरूर कर पण गरिबाच्या रसिक सालस पोरीशी कर. तिला चित्रकला येत असावी. तिला ते नाहीतर संगीत यावं. पण केवळ दिखाऊ ऍकम्प्लिशमेंट्स नव्हेत हं. अगदी खऱ्या तिला आपल्या कलांची जोपासना करता येईल अशा स्वास्थ्यात ठेव. ती तुला जीवनाचं नवं दर्शन घडवील आणि चंदोबा ही शक्ती फक्त स्त्रीत असते. परमेश्वराची ही अगाध कृती आहे. साऱ्या जिवीताची जी प्रेरणा आहे, ती स्वत:ही हे पुष्कळदा विसरते आणि वेड्यासारखे वागते. हे दुर्दैव आहे. तुझे सोबती अचानक गेले आणि तुला दु:ख झाले. साहजिक आहे. अंतर्मुख होणंही साहजिक आहे. तू म्हणतोस की their deaths were not justified. My dear boy, whose deaths are justifiable?
> माझा एक भाऊ औषधांच्या अभावी वयाच्या अकराव्या वर्षी वारला. माझे वडील अत्यंत निर्व्यसनी होते, निष्पाप होते, प्रामाणिक होते. ते पन्नाशीच्या आधी हृदयविकाराने वारले. परवा मुंबईत गोळीबारात माणसं मेली. आणि हिरोशिमा? त्याबद्दल लिहायला हवं का? ज्या दिवशी जन्माला येणं जस्ट्फाइबल होईल त्या दिवशी आपण मरणाचं जस्टिफिकेशन शोधत बसू. पण आज हाती आलेल्या क्षणाचं सोनं करायचं आहे. जीवनाच्या त्या क्षणांची मजा हीच की ते दुसऱ्याला दिले तर त्या जीवनाचं सोनं होतं नाहीतर शुध्द माती. आपलं जीवन मातीमोल वाटायचं सुध्दा एकच कारण की मला दुसऱ्याच्या जीवनात सुख कसं देता येईल याचा विचार अस्वस्थ करीत नाही. आणि तो ज्यांना अस्वस्थ करतो ते भाग्यवान जीवनाला अर्थ आणतात. तुझं पत्र मी सुनीताला पाठवीन. तिचं उत्तर तुला येईलच. १२ वाजत आले. आता थांबतो.
कळावे,
>
> भाई

Monday, June 29, 2015

किशोर पवार यांचा लेख..

कोकण युवा साहित्य परिषदेच्या अधिकृत पेज वर हा पहिला लेख प्रसिद्ध होतोय तोहि थेट दुबईतून पाठवलाय आपले युवा लेखक किशोर पवार यांनी
त्यांचे कार्यकारी मंडळा कडून मन:पुर्वक आभार.
विषय - निरीक्षण.
लिखाणाच माध्यम - मुक्त लेखन.
विशेष - पात्र आणि त्याचं हुबेहूब वर्णन
तो मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात डोक्यावर रुमाल टाकून किती तरी वेळ ताटकळत एस टी ची वाट पाहत थांबलाय पोरा बाळाना शाळेला सुट्टी लागलेय ...गावाकड मेहुनीच बहिणीच नात्यातल कुणा कुणाच लग्न निघालय म्हणून चिक्कार लोक रस्त्यावरच्या उजाड मोकळ्या ढाकळ्या बस थांब्यावर बायको पोर आणि ब्यागा सांभाळीत नेमका लाल डब्बा कधी येईल त्याची वाट पाहतात ..लांबून एस टी येताना दिसली कि घर धनी जरा पुढ होऊन बोर्ड काय डोकावतो ते पाहत परत मोबाईल काढीत टाईम पाहतो ...लहान लेकर बाळ मात्र शेट्ट उन्हाला भेत नसत्यात गावला जायचं म्हणाल्या वर एक तर रात्रभर ती झोपतच नाहीत ..सकाळी सगळ्या अगोदर उठून बस्त्यात ..त्या मूळ उन बिन त्यांना काय लागत नसत ..गावाला जायची हौस कडक रखरखीत उन्हा वर हि मात करते ...समोरून ऐटीत जाणारे कार वाले पाहून बाया बापड्या उगाचच मनात चरफडत आमची जिंदगानी एस टी ट्रक नि काळ्या पिल्या जीपड्या झालच तर सहा सीटर च्या डुगडुगीतच चाललेय म्हणून मनात बापाला शिव्या देत कुणाच्या गळ्यात बांधलेय म्हणत साडीत जास्तच उकडतंय म्हणून चरफडतेय ...तो शांत पणे तिथल्या प्रत्येक प्रवशाला न्याहाळतोय ...तितक्यात त्याला हावी ती एस टी आली एकदाशी ..आपली स्याक सांभाळीत तो एस टी त प्रवेश करता झाला ...हातातील पंच दांडी वर ठोकीत कंडक्टर पुढे चला पुढे चला चा सवई प्रमाणे जय घोष करीत होता ...तो मात्र तिथेच थांबला ...लाहान पणी तो जाळीतून ड्रायव्हरला न्याहाळत आसे ...तो जसा स्टेअरिंग फिरवेल तसा मनातून हा हि फिरवे अगदी हात फिरवत असे ...समोरून भरदाव येणारी गाडी जणू आता येऊन कोपर्याला ठोकेल असे वाटत असतनाच भुर्कन ती बाजूने निघून गेली कि ह्याच्या पोटात आलेला गोळा शांत होई ..
आता जरा जाणता झालाय पण एस टी तली वेग वेगळी माणस खेटून बसणारी जोडपी ...एखाद्या पर पुरुषाच्या बाजूला एखादी स्त्री किंवा मुलगी बसली कि असल्या जळजळीत उन्हात हि गरावा अनुभवणारी पुरुष मंडळी.. त्यात गाडी चालू असताना हि आपली चामडी पिशवी सांभाळीत तिकीट देणारा मास्तर त्याचा तो टाक टाक वाजणारा पंच ..तिकीट देऊन झाल्यावर जागेवर बसल्यावर स्क्रू फिरवून गोल खाच्यात अडकून राहिलेलं काउंटर तिकीट घडी झालेले कोपर्यात दुमडलेल्या नोटा सरळ करीत सफाईदार पणे त्या नेमक्या रीतीने लावून ५०० १०० नंतर पन्नास आसे गट्टा करून वरच्या खिश्यात लीलया कोंबण्याची पद्धत ...सगळ्यात कुतुहूल त्याला त्याच्या किलोमीटर शिट च नेहमीच मास्तर किती सुवाच्छ अक्षरात बारीक रकान्यात आकडे मोड लिहीतात त्या पेपरची घडी हि किती सुंदर असते नाही ..आयुष्याच्या पटलावर वर हि त्याची बेरीज वजाबाकी तो अशीच सुबक पणे मांडीत असेल काय जगण अधिक सोप करीत अशीच त्याची छान घडी करून संसाराचा हिशोब मांडीत असेल काय ...
तसाच तो खांबा जवळ उभा राहिला काही अंतराने मास्तर च्या बाजूचा माणूस उतरणार हे त्याच्या चुळबुळी वरून ह्यांन ताडल होत ..आणि ह्याला मास्तर जवळची सीट मिळाली
त्यान मास्तर ला उगाचच छेडायला सुरवात केली मास्तर जेवायला कुठ थांबणार मास्तर ने हि ठरल्या ठिकाणचे हॉटेल सांगितले ..मास्तर आणि ड्रायव्हर ला तिथे फुकट जेवण मिळत हि खंत त्याला नेहमी असायचीच पुन्हा ती आज जागी झाली ...तो काय मास्तर तिथे नको ह्या हॉटेल ला गाडी थांबवा तिथे मस्त भेटत ...मास्तर म्हणाला नाही आम्ही इथेच नेहमी जेवतो ....बरय ब्वा तुम्हाला फुकट मिळत ..आणि हा थट्टा करीत मिश्कील हसला
मास्तर मात्र खजील झाला राग आलाय आसा एक हि भाव त्याच्या चेहर्यावर न्हवता पण दुक्ख होत
आहो फुकट काय ते एक प्लेट मसूर ची डाळ आणि कडक रोटी ..कित्येक वर्ष हेच खातोय आणि सतत प्रवास करतोय ...
ती होती तोवर घरून डबा यायचा मला पुरण पोळी आवडते म्हणून प्रत्येक सणाला ती पुरणपोळीच बनवायची ...आता घरची साधी पोळी हि नाही भेटत हो ...मास्तर दीनवाणी पणे बोलता झाला
म्हणजे .............
वावंशा चा दिवा म्हणून एकाच मुली वर थांबायचं ठरवलं ती जास्त शिकलेली न्हवती तरी माझा निर्णय तिला मान्य होता आईन न पाठीला पाठ असावी म्हणून थोडा त्रागा केला पण मला एकाच मुलीला चांगल शिकवायचं होत ..मुलगी शिकली हि नाकी डोळी हि सरस ..पण हुंड्या शिवाय कुठे जमत न्हवत स्थळ सांगून यायची पण भरमसाठ मागणी ..मी ह्या हुंडा प्रथेच्या बिलकुल विरुद्ध पण मुलीच वय वाढत होत अश्या परिस्थितीत समाज तुम्हाला गुढगे टेकायला लावतोच प्रत्येक वेळी तुम्ही प्रवहाच्या विरोधात पोहालच असे नाही होत ना ...होती न्हवती ती मिळकत मुलीच्या लग्नात लावली कुठलीच कसर नाही ..त्या नंतर एका वर्ष्यातच बायकोला कर्करोगान पछाडल ..पैसे संपले होतेच मग राहिलेला फंड गावची जमीन तिचे काही दागिने विकून तिच्या आजारपणाची कसरत करू लागलो मी तिच्या वर खूप प्रेम करायचो खूप म्हणजे खूप तिला किमो लागला सगळे केस उडून गेले ऐन पंचेचाळीशित ती जक्ख म्हातारी वाटू लागली मला मात्र ती त्या आवस्थेत हि एखाद्या आप्सरे सरखीच दिसायची ...कर्करोगाशी झुंजत तिने अखेर प्राण सोडला...आणि मी ह्या जगात एकटा झालो पोरका ...
खूप दिवस झाले घरची पोळी भाजी नाही मुली कडे जातो कधी तरी ....पण तिच्या हातची चव कुठेच नाही ...ह्या फुकटच्या जेवणात तर ती अजिबात नाही फक्त पोट भरण ...बस्स
हा सुन्न झाला नि मास्तर बोलत होता तिकीटाची गणित लीलया मांडणारा पेपरची घडी सुरळीत पणे करणारा मास्तर खर्या जगण्यात किती विस्कटलाय ...तिकिटाचा एक रुपया जरी बाकी राहिला तरी मास्तर एक रुपया ढापू पहातोय अशी भावना जपणारा हा आज त्या मास्तर कडे नुसतच शून्यात पाहत होता ...... _/\_
- किशोर पवार
Kishor Pawar
लेखक - वक्ते
Abu Dhabi United Arab Emirates.

Thursday, May 7, 2015

समीर गायकवाड यांचा एक सुंदर लेख..



गावाकडे एक बरे असते, माणसांच्या चेहरयाला कल्हई केलेली नसते. माणसे जशी असतात तशीच राहतात अन तशीच दिसतात. कपाळाला अष्टगंध लावून सकाळी घराबाहेर पडणारी ही माणसे घरी येतील की नाही म्हणून घरचे लोक त्यांचा घोर करत नाहीत. मुळात गाव ते केव्हढे असते ? शे दोनशे ते पाचशे उंबरा इतकी त्याची व्याप्ती. गावात किती भाग म्हणाल तर एक वेशीबाहेरचे जग अन वेशीच्या आतले जग. म्हणूनच गावात हाक मारताना प्रत्येकाला एकमेकाचा बाप माहिती असतो.जसे की गणा भोसलेचा किसन महणजे किसन गणपत भोसले, महादू भोसल्याचा इष्णू म्हणजे विष्णू महादेव भोसले. तेथे औपचारिकता ही औषधालाही सापडणार नाही. फॉर्मेलिटीचे आपल्याला भारी कौतुक, तर त्याना त्याचे वावडे. हाका मारताना देखील ते हात अन आवाज राखून मारणार नाहीत, जोरात आवाज असणारच. रानात ओरडायची सवय असल्याने हळुवारपणा ते जपणार नाहीत, पण मुक्या प्राण्याची माया असो व घरातल्या म्हतारया माणसाची हेकेखोरमागणी असो ते तेथे हळुवार होतील. जेंव्हा ते हाका मारतील, जवळ येतील. बसतील, आधी इकडचे तिकडचे चार शब्द बोलतील. अर्थातच त्यात पिक पाणी अन पाऊसवारा हा असणारच. सुखदुःखाची देवाण घेवाण करतील. नडलेल्या गोष्टी सांगतील.....
पण कधी कधी हे देखील बिथरतात, भावकी अन गावकीचा विषय सोडून बोल म्हणतील. कुठेतरी कधीतरी कोणी दुखावलेले असते त्याचा राग वर्षानुवर्षे मनात धरून ठेवलेला असतो त्याचा वचपा यांनाही काढायचा असतो. शेवटी ही देखील हाडा मासाचीच माणसे, फक्त फरक इतकाच की आपणदेखील हाडामासाचेच असतो पण ते मातीचेही असतात. त्यांची मातीशी नाळ घट्ट असते. आपल्यापैकी काहींची तर आपल्या जन्मदात्या मायबापाशीदेखील नाळ घट्ट राहत नाही. आपला राग पोटात ठेवून माया लोभ मात्र ते खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त करतील. “अरे त्याने माझी गाय कापली म्हणून का मी त्याचे वासरू मारू ? देव अक्कल वाटत असताना तो शेण खायला गेला असेल म्हणून का मी त्याच्या गतीला येऊ ? त्याने त्याचा जिम्मा निभावला नाही म्हणून काय झाले ? देवाने मला मोप दिलया, मी समाधानी आहे. त्याचे कर्म त्याचे त्याच्यापाशी. त्येला पांडुरंग बघून घेईल.” असे म्हणत म्हणत त्यांची प्रत्येकाची गाडी विठू चरणी येऊन विसावते. राग कितीही असला तरी ते कोणाचे वाटोळे व्हावे म्हणून प्रार्थना करणार नाहीत, मात्र एखाद्या वेळेस अडचणीत सापडलेल्याला अशा माणसाला चार गोष्टी ऐकवूनच मदत करतील, पण त्याच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणार नाहीत.....
डोक्याला वेगवगळया रंगाचे फेटे घालून इथे तिथे बसलेली म्हातारी माणसे हे यांचे खरे हाकारे असतात. गावातला सर्वात जेष्ठ म्हतारा जे काही सांगेल त्याच्या शब्दाविरुद्ध शक्यतो कोणी जात नाही. गावात विशेष मान असतो अशा वठलेल्या माणसाला. गावातली टाळकरी अन भजनी मंडळी ही सर्वांच्या आदरस्थानी असतात. त्यानंतर असतो तो गुरव अन बामण. त्यांच्यावर यांची अपार श्रद्धा. अबीर, गुलाल, बुक्का हाच यांचा ब्रम्हदेव, विष्णू अन शंकर. चिरमुरे, लाह्या,बत्ताशे हाच इथला महाप्रसाद. आत्ताच्या घडीला देखील घरी टीव्ही फ्रीज नसणारी अनेक घरे गावात सापडतील पण गुलाल बुक्का नसणारे घर गावात सापडणार नाही. आषाढीला उपवास अन नवरात्रात व्रत वैकल्ये, शिवाय ज्याचे त्याचे कुलदैवत अन कुलाचार हा त्यांचा श्रद्धेचा धार्मिक विषय. याशिवाय गावातली दर सालची जत्रा अन त्यातले याना येणारे उफाण हे देखील अनुभवण्यासारखे.
याचा अर्थ गावात सर्व माणसे अशीच असतात असे नाही काही माणसे इब्लीस अन बेरकी देखील असतात. प्रत्येक गावात अशी काही माणसे असतातच. बांधाच्या कोरभर तुकड्यासाठी नरडीचा घोटघेण्यापर्यंत कधीकधी इथला माणूस घसरतो तेंव्हा सारा गाव हळहळतो, आयुष्याच्या पारंब्या तुटतील असं कोणतेही नाते ताणू नये हे इथले मुळामुळातले तत्वज्ञान, आईबहिणीला कडला जाईपर्यंत बघावे अन भावकीला थुकावे असेही इथले रक्तात भिनलेले भाव..
आपआपली सुखदुखे अन स्वप्ने काळजातल्या कपारीत ठेवून आपल्याच ढंगात चालणारी ही माणसे. कोणी धोतर तर कोणी पायजमा घालून असतो आजकाल क्वचित कोणी जीन्सवाला तरणा पोरही येथेहटकून दिसतो..नऊ वारीचा डोक्यावरून पदर घेऊन वेस चुकवून बारीक कुजबुज करत लगबगीनेचालत जाणारया बायका पाहताना लाल,हिरवे,पिवळे.तांबडे ठिपके थवा करून चालल्यासारखे वाटते.पायात फुफुटा उडवत जाणारा रस्ता अन त्यावर तळपायाला चिरा पडलेली काळपट चपला घालून चालणारी चालणारी माणसे. सावलीचे ज्ञान याना अधिक उत्तम ठावूक, पर्यावरण पर्यावरण म्हणून छाती बडवत बसण्याऐवजी हे झाडाझुडपातच देव शोधतात अन पानाफुलात आयुष्य घालवतात. इथल्या मळकटलेल्या रस्त्यांच्या कडेने घराघरातून वाहणारे मोरीचे पाणी उघड्या गटाराला मिळते जिथे माशा अन डास चिलटांचे स्वतंत्र विश्व असते. फिरत फिरत हे गटार गावातल्या ओढ्यापाशी जाते. दरसाली ओढ्याला वरुणदेवाच्या कृपेनुसार वेगवेगळे रुपडे मिळते. ओढ्याजवळच्या पानवेली म्हणजे गावातल्या मेलेल्या माणसाचेच झाडातले जल्म असे लहानपणापासून ऐकलेले. त्यामुळे त्या पानवेलींची पाने कोणी तोडत नसे. या दृढ समजाला कारणही तसेच असते, सर्रास बहुतेक गावात स्मशानभूमी नावाची वेगळी रुक्ष जागा नसते. गावातली घाण अन पावसाचे दान पोटात घेऊन नदीला मिळणारा ओढा गावातली माणसे देखील आधी त्याच्या मातीतल्या कणा कणात कालवतो अन मगआपल्या पोटाशी धरून नदीला घेऊन जातो. मग ती चंद्रभागा असते नाही तर गोदावरी,कृष्णा, पंचगंगा. पण तिचे पाणी आपल्याला समिंदराला नेते अशी धारणा. म्हणून गावात कोणाची मयत झाली की गावाबाहेरच्या ओढ्यावर त्याचे क्रियाकर्म ठरलेले असायचे. पुढे हीच माणसे तिथल्या पानवेलीत जन्म घेतात अन गावातल्या माणसाना भेटतात असे सगळे म्हणायचे.
गावात असते वेशीजवळचे मारुतीचे मंदिर, एखाद्या उभ्या आडव्या आळीला विठोबाचे मंदिर. क्वचित नमाजासाठी मातीचे मिनार. ही सर्व धार्मिक प्रवृत्तीच्या गावकरयांची श्रद्धास्थाने. इथले उत्सव अन उरूस हा त्यांचा घरचाच जलसा असतो. तर गावतली चावडी ही मुळातच बोलभांड असते. अनेक घटनांची ती मूक साक्षिदार असते, गावातले अनेक निवाडे अन वाद, संकटे अन त्यांचे निवारण याचे ती दार्शनिक असते. चावडीच्या भिंतीला कान लावले तरी अनेक श्वास अन निश्वास यांचे उसासे ऐकू येतील, गावातला खरा इतिहास चावडीच्या कणाकणात मिसळून गेलेला असतो. इथला पार म्हणजे तर आपल्या हजारो बाहूंनी जगाला आपल्या बाहूत सामावूनघेणारा विश्वनिहंताच जणू. जसा गाव तसा पार असतो. वडाचे झाड असणारा पार म्हणजेस्वर्गच जणू. क्षणभराच्या उसंतीत विचारलेली ख्याली खुशाली ते निवांत आपल्या सासूरवाशीण बहिणीबाळीच्या अडचणी ते आईवडिलांचे आजारपण या सर्वांवरच्या गावगप्पा येथे होतात.कोणाच्या घरी पाहुणे आलेत इथपासून ते कोणाच्या घरी देवदेव आहे इथपर्यंतची पहिली खबर पारावरून गावात पसरते. पाराने गावातली पंचांची पंचायत बघितलेली असते अन त्यातआलेले आसू आणि हसुचे हजारो भावानुभव आपल्यात साठवलेले असतात. लहान मुलांच्या अनेक विट्या पाराने अलगद झेललेल्या असतात तर कधी कटून आलेला एखादा पतंग वडाच्या शहाजोग फांद्यांनी आपल्या गळ्यात अडकवून ठेवलेला असतो. पारावरचा कट्टा हा गावाच्या सांस्कृतिककार्यक्रमांचे मंच म्हणून जेंव्हा जगत असतो तो तेंव्हा अभिजात प्रतिभेचे नवनवोन्मेषाचे अगणित हुंकार बनतो. कधी एखाद्या सभेचे तर एखाद्या बैठकीचे दमदार बोल ऐकण्यासाठी गावकरी त्या पाराभोवती गोळा झालेले असतात तर कधी पावसाळी दिवसात तिथ साठलेल्या पाण्यात खेळणारी पोरे पाराने आपल्या कुशीत घेऊन त्यांच्याशी मस्ती केलेली असते. गावातला पार गावाची कळा सांगतो. पार स्वच्छ अन प्रसन्न असेल तर गावगाडा खुशीत अन शिस्तीत चाललेला आहे याचे ते प्रतिक असते. तर पाराभोवती कचरा साठलेला असेल अन पार उदास भासला तर गावात काहीतरी अप्रिय घडल्येय कुणीतरी गेलेय याची ती चाहूल असते. पार हा गावातल्या रग अन रंगेलपणाचाही अंदाज बांधत असतो.मिशीवर पीळ देत दिली घेतलेली आव्हाने अन जीवावर उदार होऊन लावलेल्या पैजा याचे अनेक स्पर्श तिथल्या पारंब्या शिवता क्षणीच मस्तकातून भिनतात. पारात कैद असतात अनेक अपेक्षा अन उपेक्षाची जीवघेणी गाऱ्हाणी ती मात्र पार फक्त आपल्या एकट्याच्या अंतःकरणात ठेवून असतो त्याचे शेअरिंग नसते. पाराचे ते असहाय दुःख असते, त्याच्या अबोलव्यथांचे प्रकटन कधी करत नाही.
गावाबाहेरचे तळे म्हणजे अनेक आख्यायिकांचे आगार असते. पावसाचे तांडव आपल्या पोटात साठवून तळ्याचेपाणी कधी तळाला जावून विचारमग्न होते तर कधी पाळी फोडून गावदेवाच्या पायरया शिवून आपलाही रामराम घालते. तळ्याच्या हालणारया पाण्यात अनेक प्रतिबिंबे दिसतात. तर तिथल्या प्रत्येक तरंगात तळ्याकाठच्या जीर्ण झाडांची हिरवी पिवळी पाने पानगळीतला आपला मरण सोहळा साजरा करत फिरकी घेत नाचत नाचत पाण्याशी अनुष्टुभीत होऊन आपली झाडाची गाणी गात असतात. तळ्याकाठची झाडे म्हणजे गावातल्या पोरांचा जीव की प्राण ! सूर पारंब्या पासून ते लंगडी पर्यंत अनेक खेळांचे अनेक डाव इथे मांडलेले. उंबराच्या झाडाची लालसर मऊ गोड उंबरे खात झाडावरचा डिंक अन लाख गोळा करताना चावणारे लालकाळे तिखट मुंगळे, अन त्यांचा कडक डंख वर याला पोरांच्या गलक्याची जोड असायची. या सर्वांच्या कोलाहलात आपला सुर मिसळणारे सकळ विहंगगण ! एक जादुई माहौल असायचा तिथे. तळे कोरडे पडले की मग मात्र गावच उदास भासे, मेलेल्या माणसाची आतडी कातडी बाहेर यावी तसा तळ्यातला गाळ कोरडा झाल्यावर पोटातले मोठाले दगड धोंडे वर घेऊन यायचा. सलग दोन तीन वर्षे जर तळे आटले की देवाला भाग बांधला जायचा, सारा गाव अनवाणी राहून उपास तपास करायचा. पुढल्या पावसाळ्यात बक्कळ पाऊस पडला की आधी देवळाला काव आणि पिवडीच्या रंगाचे दोन हात ठरलेले असायचे. तळ्यातल्या पाण्यावरून जुनी माणसे वेगवेगळ्या दंतकथा रंगवत बसत. तळ्याचे पाणी कोणा एकाच्या घरचे नसूनही ते सर्वांच्या डोळ्यात असायचे, चरायला गेलेली अख्ख्या गावाची गुरे गावात परतताना तिथे आळीपाळीने पाणी प्यायची तेंव्हा त्यांच्या जिभेचा लप्लाप आवाज अन त्याच वेळेस त्यांच्या हलणारया गळ्यातल्या घंटांचा मंजुळ आवाज ऐकताना मावळतीचा लालपिवळा सूर्य तळ्यातल्या पाण्यात कधी बुडून जायचा काही कळायचे नाही...
गाव म्हणजे मातीतल्या माणसांचा जथ्था जो दुःखाचे अवडंबर करत नाही अन सुखाचे उत्श्रुंखल बाजार भरवत नाही. देवळातल्या मुक्या खांबातही गावाची कहाणी ऐकायला येते, ओढ्यातल्या पाण्यातही गावाचे अश्रू ओळखायला येतात. गाव असतो एक चिरंतन आनंदाचा चैतन्यमय सोहळा, मक्याच्या सोनेरी कणसासारखा अस्सल सोनेरी बीज वाढवणारा ! गाव असतो माणुसपणाचा उरूस, देणारया हातांचे हात घेणारा अन त्या हातांना आपल्या मस्तकी धारण करणारा ! गाव म्हणजे जन्मापासून ते मरणापर्यंत साथ देणारी अखंड उर्जा देणारी सावली ! गाव म्हणजे मातीतल्या माणसांची मायेची सावली ! गाव म्हणजे काही वस्ती,वाडी वा घरे नव्हे गाव म्हणजे मातीच्या काळजाचे अनंत तुकडे जे भूमीपुत्रांच्या ठायी विसावलेले !! गाव म्हणजे आई, गाव म्हणजे बाप, गाव म्हणजेच विठ्ठल रुखमाई, गाव म्हणजे आकाशाची निळाई अन निसर्गाची हिरवाई, गाव म्हणजे डोळ्यात पाझरणारा खारट झरा.
सरते शेवटी गाव म्हणजे फाटक्या कपड्यात दुख लपवून, जमीन गहाण टाकून जीवाला जीव देऊन आईबापाची सेवा करणारया अन मातीच्या ऋणात राहून कोरभर भाकर पोटाला खाऊन तिथल्याच मातीत जगून आपला स्वाभिमान धरीत्रीच्या चरणी अर्पण करणारया शेकडो माणसांचा एकसंध देह असतो !!
- समीरबापू गायकवाड.

Tuesday, April 21, 2015

स्मिता गानु जोगळेकर यांचा सुंदर लेख.

थोडे तरी वेडे व्हायलाच हवे

थोडे तरी वेडे व्हायलाच हवे 

मी आणलेले असते नीलकंठ पक्ष्याचे छानसे पीस. एक गोलच गोल शंख , सूर्यफुलाच्या वाळलेल्या शेंगांच्या अर्धगोल पुंगळ्या आणि खूप अधिरतेने मला त्या दाखवायच्या असतात कोणाला तरी.मी ऑफिस मध्ये येते, सारा माहोल ठावूक असूनही आशाळभूतपणे बघते इथे तिथे.आसपासची माणसं बघून मला पुनः पुनः आश्चर्य वाटत राहते,काही किरकोळ अपवाद वगळता, यांच्यातील कोणीच का कधी बोलत नाही पाउस-वारा, फुलं-पाखरं , सुगंध-झुळूक , डोंगर-झरे वगेरे वगरे बद्दल . हे सतत कोणाला प्रमोशन , कोणाची बदली , कोण कोणाचा चमचा आहे,या महिन्यात डी.ए. किती वाढला वरच बोलत असतात, कपाळावर चिंतेचं जाळं आणि चेहऱ्यावर त्रस्त भावांसकट.वाटतं पावसाची सर पाहून कधीतरी हर्षित व्हावे,दाराबाहेर एखाद्या फुलपाखराकडे निरखून पाहावे, रानाची पाखरांची समुद्राची ओढ दाखवावी, किमान गप्पा तरी,किमानात किमान विचार तरी व्यक्त व्हावा .पण छट,हे लोक पावसाबद्दल बोलले तरी आता चिखल होणार हे सांगण्यासाठी, ढग आल्याच्या आनंदापेक्षा झाकोळल्याचा अंधार पांघरण्यासाठी,आणि हा झाकोळ दुसऱ्यावर लादण्यासाठी.

     पण नाही हे असे मळभ येत आहे असे वाटतच मी मान झटकून टाकते आणि झटकून टाकते त्यासोबत सगळे नकाराचे विचार ही आणि मनात म्हणते आपण घेतलेला फुलांचा गंध द्यावा खुशाल शिडकून यांच्या अंगावर,आपण ऐकलेलं रानाचं निसर्ग संगीत हळूच सोडून द्यावं त्यांच्या कानात आणि जो अपवादात्मक असा असतो तो आपल्यासारखा एखादा वेडा जीव भेटतोच कि या सर्व कोरड्या पसाऱ्यात ,तोच एखादा रानवेडा,पाउसवेडा,डोंगर किंवा कविता वेडा,बस आणखी काय करावे लागते माणसाला रिते होण्यासाठी आणि पुन्हा इतरांना वेडं करण्याचा आपला प्रयत्न चालू ठेवावाच कि
     नुकत्याच केलेल्या नागझिरा नवेगावच्या धुंद मोहिनीमधून मी अजून बाहेर आलेली नसते . किंचीतसे ही रिकामे क्षण मिळताच नजरेसमोरून सरकू लागतो सारा चलतचित्रपट आणि ट्रान्समध्ये गेल्यासारखं पुन्हा निघते मन त्या वाटांवरून स्वैर सफरीला,मग त्याला कोणताही एवढासा संदर्भ सुद्धा पुरतो. मधेच वाचलेलं मारुती चितमपल्ली यांचं 'शब्दाचं धन' किंवा कृष्णमेघ कुंटेचं 'रानवेड्याची शोधयात्रा' आठवून जातं . आठवते शब्दाचं धन या शब्दावरच केलेली पानाफुलांची, पाखरांची, झाडांची, वणव्याची, वाघाची चित्रावळ किंवा खुणावतो रानवेड्याच्या पुस्तकावरचा तसाच वेडा प्रचंड मोठा बायसन,तोंडात गवताचा झुबका ठरलेला अजस्त्र सुळ्यांचा टस्कर, स्वतः च्या डोक्यावर गवत उडवत असलेला. त्या मागचे थंडगार तळे आणि त्याही मागे खडक आणि हिरवळीचा मिलाफ .असं सारं .श्वासातलं जगणं असतं. आणि हे सारे हळूच हात धरून मला अलगद बाहेर नेतात आणि बघता बघता मी थेट रानात पोहोचते.तिथे मला भेटते चैतन्याच्या शोधात हिंडणारी जोय एडमसन, सतत निसर्गाचा विचार करणारी , निसर्ग जगणारी , निसर्ग रेखाटणारी अभ्यासणारी , एकटीच भटकणारी , पियानो वाजवणारी संगीताचा इतिहास व रचना शिकणारी , नक्षीकाम करणारी , भांडी घडवणारी शिवणकाम , गायन , शवपेट्या बनवणे , मानववंशशास्त्राचा अभ्यास करणे एवढ्या ढीगभर गोष्टी येत असलेली जोय मला इथेतिथे खरीखुरी वावरताना दिसते.मनाला ओढ लागते आपण ही सारी आकडेमोड सोडून निघून जावे रानेवने तुडवायला.
     खरंतर मी ऑफिसमध्ये असते.आता निघायला हवे,पण रानाच्या धुंदीत मला सभोवतालच्या प्रिंटर्सची करकर,कोम्प्युटर्स ची टकटक,सेलफोन्सचे रिंगटोन्स,स्पीकरवरचं संगीत आपसातले संवाद, डेबिट क्रेडीटचे हिशेब, ट्रान्स्फर प्रमोशनच्या गप्पा काहीकाही ऐकू येत नसतं. माझ्या संवेदनांच्या सीमारेषा विस्तारलेल्या असतात कैक पुढे, पलीकडे, दूरदूरवर.मी या इथल्या पसाऱ्यातली एक नसतेच मुळी. माझ्या मनात असते वेगळीच उधळण,माझी नजर शोधत असते काचेतून दिसणारा आभाळाचा तुकडा .
     ऑफिस मध्ये जिथे तिथे काचा आणि आरसे आहेत , माझ्या उजवीकडे असलेल्या काचेतला नजारा जेव्हा डावीकडच्या आरशात प्रतीबिंबाच्या रुपात दिसतो तेव्हा त्यात एक वेगळीच मजा मिसळते.प्रत्यक्षापेक्षाही या प्रतीबिम्बात खूप जास्त कवडसे उमटलेले असतात.एक नवेच डायमेन्शन,एक वेगळीच खोली त्या आभाळाच्या तुकड्याला प्राप्त होते. आणि त्या आभाळाच्या छायेखालची वाट अगदी स्पष्ट हाकारे करू लागते.व्यंकटेश माडगूळकरांनी उल्लेख केलेली हीच का ती वाट?,ते म्हणतात सकाळच्या ताज्या वृत्तपत्राप्रमाणे वाचता येणारी ही वाट दिवसभराच्या फरांट्यान्मुळे संध्याकाळपर्यंत भेळ खाऊन चूरगळून टाकलेल्या कागदासारखी दिसू लागते, पण माझ्या मनात लख्खपणे असते ती फक्त सकाळची स्वच्छ ताजी, सुगंधित वाट. माझ्या डोळ्यात असतं एक खूप खरंखुरं सात्विक जग,ज्यात मी बुडवून टाकते स्वतःला. रंगाच्या, गंधाच्या, स्वप्नांच्या निरभ्र जगात चिंब करून टाकते स्वतःला , आणि मी रानातून येताना आणलेलं ते नीलकंठ पक्ष्याचं पीस अलवारपणे काढून बघत राहते त्याकडे ,स्पर्श करते त्याला आणि मी स्वतःच एक पीस होऊन तरंगत राहते,वेडेपणाच्या वेगळ्याच विश्वात, जगण्याला वेगळेपणाचे आयाम देणाऱ्यां त्या विश्वात ...तरलपणे ...!!!!!
स्मिता




Monday, February 16, 2015

अनघा काकी तशा नेहमीच छान राहणार्या आणि स्वभावही खूप मस्त आणि आनंदी. थोड्याशा वयस्कर असल्या तरी उत्साही आणि अतिशय अनघा काकी तशा नेहमीच छान राहणार्या आणि स्वभावही खूप मस्त आणि आनंदी. थोड्याशा वयस्कर असल्या तरी उत्साही आणि अतिशय सकारत्मक. त्या नेहमीच संतुलित विचार करतात त्यामुळे स्त्रियांचं जास्त कौतुक किवा पुरुषांना उगाचच नाव ठेवलेली त्यांना कधी आवडत नाहीत. त्यांच्या शब्दात सांगायचं तर " खर सांगू तुम्ही माझ्यावर टीका कराल पण माझ स्पष्ट मत आहे की अर्ध्या पेक्षा जास्त संसार हे पुरुषांमुळे टिकले जातात. आपण सतत बडबड करत असतो. आपल्या मधेही मीच सगळ करते असा अहं भाव असतो. आपले नवरे जास्त वेळा बहिऱ्या लोकांसारखे वागतात त्यामुळेच हा संसाराचा गाडा सुरळीत चालू असतो. पुरुष काही बोलू शकत नाही अस नसत तर आपण काही बोललो तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात ह्याची त्यांना कल्पना असते म्हणून त्यांची शांती हा त्यांचा कमकुवतपणा समजायची चूक अनेक स्त्रिया करतात. मित्र म्हणून आपल्याला तो हवाही असतो पण त्याच वेळी आपणही त्याची छानशी मैत्रीण होण गरजेच आहे हे आपण विसरतो.आपण विवाहबाह्य संबंधाविषयी चर्चा करतो तेव्हा एक दुर्लक्षित झालेली गोष्ट हीच असते की आपल्याला मित्राची गरज असते तशीच त्यानाही मैत्रिणीची गरज असते. दर वेळेस त्या नात्याला शारीरिक पातळीवर उतरवायची गरज नसते. त्यांचीही बौद्धिक आणि भावनिक अशी गरज असू शकते .आपण स्त्रिया आपल्या नवर्याच्या चांगल्या मैत्रिणी होण्याचा प्रयत्न कधी करतो का ? सगळ्यात इतक्या गुरफटून जातो की छान राहील पाहिजे , दिसलं पाहिजे , वैचारिक पातळीवरही नवर्याशी सुसंवाद साधला पाहिजे हे लक्षातच घेत नाही . विरंगुळ्याचे क्षण नवरा म्हणून त्यांच्याही गरजेचे असतात ह्याचाच विसर आपल्याला पडतो. अनेकदा नवर्याला त्याची बायको मैत्रीण म्हणून अधिक हवी असते. आजकाल तिथेच खूप जणी कमी पडतात. मी पुरुषांची बाजू घेते अस समजू नका. पूर्वी स्त्रिया ह्या घरात असायच्या त्यामुळे ह्याचा विचार कधी झाला नाही पण आता स्त्रियांनी आपल्यातील ही आपल्या "नवर्याची मैत्रीण" जपली पाहिजे. संसार सुरळीत चालण्यासाठी ह्याची फार गरज असते. त्याचं मैत्रीपुर्वक नात त्यांच्यातील नवरा बायकोच्या नात्यालाही उत्साही ठेवत आणि प्रेमही छान अबाधित रहात. ज्या स्त्रियांना हे जमत त्या पत्नी म्हणून अधिक यशस्वी होतात." थोडक्या शब्दात त्यांनी यशस्वी वैवाहिक जीवनाची एक महत्वाची गरज अधोरेखित केली.ज्याचं लग्न झाल आहे आणि ज्याचं व्हायचं आहे त्यांनी ह्याचा नक्कीच विचार करायला हवा. मला तरी त्यांचे विचार मनापासून पटले.तुम्ही तुमच मत नक्की द्या ……… मिनल सबनीस.

Wednesday, January 14, 2015

स्विकाराचं श्रद्धेय अध्यात्म..

स्विकाराचं श्रध्देय आध्यात्म....
(परमेश्वरावर श्रध्दा असलेल्या प्रत्येकाने वाचावं असं काहीतरी...)
...व्यवहारात अनेकदा आपण इतरांच्या तोंडुन किंवा आपणही कित्येक वेळा, "माझी अमुकतमुक देवावर श्रध्दा आहे" किंवा "अमुकतमुक गुरुंना मी मानतो" वगैरे वक्तव्ये आपण ऐकत असतो, करत असतो....श्रध्दा असणे, किंवा मानणे गैर आहे असं अजिबात नाही. प्रत्येकाची श्रध्दास्थाने ही निरनिराळी असतात (त्यावर कुणीही टिका करण्याचीही गरज नसते, तो प्रत्येकाच्या आत्मानुभूतीचा विषय आहे) काही लोकं गणपतीची उपासना करतात, काहींचा श्रीशंकरांवर निस्सीम विश्वास असतो, कुणी शिर्डीसाईंचे भक्त तर कुणी श्रीगजानन महाराजांचे भक्त...व्यक्ति तितक्या प्रकृती...पण मुळात आपण भक्ती का करतो? किंवा एखाद्या विशिष्ट दैवतावर-गुरुंवर विश्वास का ठेवतो? याची कारणमिमांसा मुळात आपलीच आपण करायला हवीये.....त्याला "श्रध्दा जोखणं" असं मी म्हणतो...
....माझ्या मते बरेचदा आपल्या श्रध्देचा संबंध हा आपल्या व्यवहारीक सुखाशी किंवा यशापयशाची आपण जोडतो आणि तिथेच चुकतो. "मी गणपतीची उपासना केली आणि मला धंद्द्यात यश मिळालं" किंवा "मी विष्णुसहस्त्रनामाची पारायणे केली आणि माझा आजार बरा झाला" किंवा "मी दरवर्षी गुरुचरित्राचे सप्ताह करतो म्हणुन माझं नीट चाललंय"...ही अशी वक्तव्ये आपल्याला श्रध्दावान बनवतायत असं वरवर वाटलं तरी वास्तविक पहाता ही वक्तव्ये म्हणजे तुमच्या कमकुवत भक्तीचेच लक्षण आहे असं मी मानतो. याचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या उपासनेचं त्रैराशिक हे तुमच्या व्यवहारीक घटनांशी जोडुन चुक करत आहात. व्यवहारात घटना घडत असतात, त्या काहीवेळा तुमच्या "फेव्हर" मध्ये तर काहीवेळा तुमच्या विरोधात घडत असतात, घडणार असतात (त्याचा पुर्वकर्मार्जित कर्मांशी संबंध असतो किंवा नसतो तो भाग वेगळा विषय आहे) पण जेव्हा तुम्ही व्यवहारात तुमच्या बाजुने घडणाऱ्या घट्नांचे "क्रेडीट" परमेश्वरी उपासनेला देता तेव्हाच तुम्ही विरोधात घडणाऱ्या घटनांनाही त्यालाच जबाबदार धरु लागता...आणि श्रध्दा डळमळीत व्हायला लागते...
..."आयुष्यभर त्या गुरुचरित्राची पारायणे केली पण माझं काही चांगलं झालं नाही", "दरवर्षी मी मार्गशीर्षातले गुरुवार न चुकता करते पण काही केल्या माझी आर्थिक परिस्थिती सुधारत नाही" "शंकरावर नेमाने दर सोमवारी बेल वहातो पण माझी कामे काही होत नाहीत" अशी विधाने मग केली जातात. वास्तविक पहाता भक्ती म्हणजे आनंद असतो, तिथे निरपेक्षता असते, परिस्थितीचा स्विकार असतो, परमेश्वर आहे आणि त्याचं नामस्मरण केल्याने मला आनंद मिळतो म्हणुन मी ते करतो असा भाव अपेक्षित असतो. श्रीमंत व्हावं म्हणुन तुकारामांनी विठ्ठलभक्ती केली नव्हती, कोट्याधिश व्हावं म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही...तो त्यांचा आनंद होता. व्यवहारिक अपयशाने किंवा संकटांनी जर आपण देवाचा त्याग करणार असु तर तिला भक्ति म्हणता येणार नाही, तो शुध्द व्यवहार झाला. नाही का?
....प्राप्त परिस्थितीचा आनंदाने स्विकार करुन, आलेल्या संकटांविरुध्द लढण्याचे बळ तुम्ही परमेश्वराकडे नक्की मागु शकता पण "अमुक झालं तर तमुक" असा भाव भक्तीत अपेक्षित नाही. जोपर्यंत नीट चाललंय तोपर्यंत परमेश्वरी उपासना, पुजाअर्चा करणारी आणि एक गोष्ट जरी मनाविरुध्द झाली तरी एका क्षणात नास्तिक बनणारी मंडळी मी पाहिली आहेत, त्यांना मी "भक्तिमार्गातले व्यापारी" म्हणतो. "स्विकाराचं श्रध्देय आध्यात्म" जोपर्यंत तुम्ही आत्मसात करणार नाही तोपर्यंत ईश्वरी उपासनेतलं मर्म तुम्हाला कळणार नाही, आनंद काय असतो? ते समजणार नाही. अर्धपोटी उपाशी राहूनही आमच्या तुकोबारायांनी "आनंदाचे डोही आनंद तरंग..." हा अभंग कसा काय लिहिला? ते रहस्य समजायचं नाही. भक्ती ही कायम सघन, बळकट, निर्लेप, शुध्द, अव्याभिचारी आणि ’अ’व्यवहारी(इथे अर्थ निराळा घ्यावा) हवी हे विसरु नये
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

Tuesday, January 13, 2015

एकदा वाचाच...

दिन दिन दिवाळी...dead body ओवाळी!!
दिवाळीला नरकासुराचा वध झाला. पण आता नरकासुराची जागा घेतली आहे सामान्य भारतीयांनी.. दिवाळी असो किंवा आणखी कोणताही सण अथवा खास प्रसंग. सामान्य भारतीयाला जिवंतपणी dead body बनवलं जातं. होय, आपल्यापैकी अनेकजण dead body आहेत... जिवंत असतानाच!! आणि दिवाळीत तर ह्या dead body ला लुटायचा plan तयार आहे.
दिवाळीच नाही तर दर सणाला, दररोज आम्हाला जिवंत असताना मारल जातं..मेलेल्यांच्या खिशातून पैसे काढायला सोपं असतं ना...आणि मारणारे स्वत आनंदाने मरण्यासाठी पैसे मोजतात. कोण बनवतं आम्हाला नरकासुर?
Department of Health and Human Services (DHHS) ने संपूर्ण जगातील आरोग्यसेवकांना कळवल आहे कि Formaldehyde हे रसायन cancer ला आमंत्रण देतं. Formaldehyde जीव जंतू ठार करतं. जर एखादं प्रेत जास्त वेळ ठेवायचं असेल, ते लवकर कुजू द्यायचं नसेल तर त्यावर Formaldehyde लावतात. जेणेकरून प्रेत लवकर सडत नाहीत. आता हे स्पष्ट आहे की, जिवंत असताना हे रसायन आपण लावणार नाही. पण आपण हे रसायन चेहऱ्यावर थोपतो. अंगावर फासतो. FDA (Food and Drug Administration) ने आणखी एका रसायनावर बंदी आणली आहे...त्याच नाव आहे...benzene. ह्या रसायनाची खासियत म्हणजे हे एकदा प्यायलं की पुन्हापुन्हा प्यायची इच्छा होते. आपण soft drink पुन्हा पुन्हा का पितो. कारण अनेक soft ड्रिंक मध्ये हे रसायन मिसळतात. आम्ही लहान मुलांना ते देतो, पाहुण्यांना देतो....सगळे addict बनतात. soft drink बनवणार्या कंपनीला कायमचे ग्राहक मिळत राहतात. आता तर दिवाळीच आहे. पिझ्झा-burger ची जोरात खरेदी होईल..दिवाळी साजरी करत नाहीत celebrate करतात. पिझ्झा, buger आणि soft ड्रिंक्स पिवून. पिझ्झा base सडू नये, त्यावरील मांस कुजू नये म्हणून त्यात काय मिसळतात?....ऑस्ट्रेलिया येथे KFC मध्ये chicken Twister wrap खाललेल्या मोनिका सामन ह्या तरुणीला salmonella encephalopathy ह्या मेंदू दुखापतीचा सामना करावा लागला. Justice Stephen Rothman ह्यांनी ह्यासाठी KFC ला जबाबदार धरलं. (ref : KFC guilty in Australia salmonella brain damage case ).
... आणि Formaldehyde तर रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे...खासपणे महिला ह्याचा भरपूर वापर करतात. दिवाळी मध्ये तर दुप्पट वापर होणार आहे. हे रसायन पुढील product मध्ये असत:
Lotions
Shampoos
Sunblock
Soap Bars
Cosmetics
Body Wash
Toothpaste
Baby Wipes
Bubble Bath
वरील product तुमचा चेहरा, तुमचं शरीर फ्रेश ठेवतात. अगदी खरोखर फ्रेश ठेवतात. कारण त्यातील Formaldehyde तुमच्या त्वचेवर जंतू बसू देत नाही. बसले तर त्यांचा नाश करतात. सोबत तुमच्या पेशींचाही नाश करतात. तुम्ही सुंदर दिसता की नाही हे माहित नाही. पण dead body बनता. स्वताच्या पैशाने.
ह्याच कारणामुळे स्वीडन आणि जपान देशांनी अश्या products वर बंदी आणली आहे. कारण आपल्या नागरिकांना nasopharyngeal cancer आणि myeloid leukemia होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. आपले नागरिक गंभीर आजारी झाले, cancer ग्रस्त झाले तर देशाचं नुकसान आहे हे जपान आणि स्वीडन ला कळत. पण भारतात ह्या कंपन्या राजरोस धंदा करतात. कारण त्या globalization च्या नावाखाली भारतात घुसल्या आणि इथल्या लोकांचं आरोग्य बिघडलं तर त्यांना फायदा होणार आहे...कारण आरोग्य देणाऱ्या सेवा सुध्धा तेच चालवतात. म्हणजे जिवंत राहिला तरी ग्राहक आणि मारायला टेकलात तरी ग्राहक. भारत फार मोठी बाजारपेठ आहे...जगताना मारणाऱ्यांची, मरत-मरत जगणार्यांची.
noodles meats मधेही अशीच रसायन वापरली जातात. भारत फार मोठा आहे, आपल्या हवामानात खाद्य पदार्थ सामान्य तापमानात फार तर 48 तास टिकतात. त्यामुळे जे product भारताच्या कानाकोपर्यात न्यायचे त्यांना ताज्या स्वरुपात टिकवण्यासाठी रसायने लावतात. शिवाय ह्या product चं शेल्फ life वाढतं...रसायनांमुळे सहा महिने टिकून राहतात. लहान मुले चिप्स, वाफेर्स आणि असे आकर्षक दिसणारे पदार्थ खातात. आपण घरी मुलाला ६ दिवस आधीच दूध पाजत नाही. पण chocolate ....ते तर वाढदिवसाला असतंच. सणाला मिठाई बाजूला झाली, chocolate देतात-घेतात. त्यात दुध असल्याच सांगतात. कोणत्याही रस्त्यावरील दुकानात ४ ते ६ महिने दूध टिकवण्यासाठी त्यात काय मिसळतात?
साधारण २० वर्षांपूर्वी dentist शोधावा लागायचा. कारण तेव्हा chocalate फार मिळत नसत. कोणी खात नसत. आता एका गल्लीत चार dentist मिळतात आणि बाजूला chocolate विकणारी दहा दुकानं असतात. आणि soft ड्रिंक, पिझ्झाचा पाउस पडतो. एका दुकानात खा-प्या आणि बाजूच्या दवाखान्यात जा. पुन्हा त्या दवाखान्यात विदेशी कंपन्या बसल्याच आहेत...आरोग्य सेवक बनून. त्यांच्या गोळ्या महाग असतात. तरीही त्याच मिळतात. कारण त्या विकणार्याला चांगला मर्जीन मिळतो. शिवाय toothpaste जर खरच मजबूत दात देतात तर त्या भारतात आल्यापासून दातांचे रुग्ण वाढणे हा फक्त योगायोग आहे का?
असे product वापरून एक तर आपण dead body बनतो..आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला भाग पाडतो. कारण नारळ पाणी, लिंबाचा रस, ताक, लस्सी, नीरा हे पेय न पिता विदेशी कंपन्यांचे ड्रिंक्स पितो. फायदा जातो विदेशी कंपनीच्या खिशात आणि आपले शेतकरी भरपूर पिक काढूनही कंगाल होतात. स्व-हस्ते मरण स्वीकारतात. जर साखर सम्राट होऊ शकतो तर लिंबू सम्राट, नारळ सम्राट का होऊ शकत नाही. साखरे इतकीच नारळ-लिंबाची गरज असते. पण लिंबू, नारळाचं पाणी, उसाचा रस hygenic नसतो असा प्रचार केला जातो. कोण करतं हा प्रचार? ज्यांना हे पदार्थ अडचण ठरतात ते. cola कंपन्या भारतात आल्या तेव्हा त्यांनी strategy आखली...लिंबू, नारळ, लस्सी ह्यांना बाजारातून हाकलायच. तरच भारतीय लोक आपले ड्रिंक्स पितील.... आणि अस भाषण jeorgia मध्ये झालं, गांधीजींच्या पुतळ्याखाली.
साधारण ११९५ साली cola कंपन्यांनी मोहीम सुरु केली आणि आज २०१४ मध्ये ते यशस्वी झाले. शत प्रतिशत विजयी ठरले. आता ड्रिंक्स वर प्रचंड उलाढाल होते. विदेशी कंपन्या अमाप नफा कमवतात आणि शेतकरी मात्र आत्महत्या करतात. पाणी विकणारे तेजीत आहेत आणि अन्न पिकवणारे कर्जबाजारी. अन्न तयार करणाऱ्याच product कोणी घेत नाही. शेतकरी मेले. आता पाळी आहे दूध उत्पादकांची. कारण मिठाई मध्ये sugar , calories असतात म्हणे....पण chocolate , noodles आरोग्याला चांगले असतात. त्यामुळे सण, खास प्रसंग chocolate ने साजरा करतात. म्हणून मिठाईची दुकानं संपत चालली, लोक संख्या वाढली आणि मिठाई, किराणा दुकाने कमी झाली..कारण mall आले आहेत . मिठाई विकणारे भारतीय आहेत. त्यांची मिठाई पद्धतशीर पाने बदनाम केली जाते. mall मधील brands ला खपवण्यासाठी सिने-क्रिकेट स्टार तयार आहेत. त्यात काय मिसळतात ते नंतर उघडकीला येत. तोवर सदर कंपन्या रग्गड नफा कमावून मोकळ्या होतात. कित्येकांना रुग्ण बनवतात. इकडे मालाला मागणी न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. सध्या केळ्यांची अशीच बदनामी चालू आहे. केळं खाल्ल्यामुळे १०० % cancer होतो. आणि पिझ्झा, बर्गर, noodle , snack आरोग्य देतात. म्हणजे तुम्ही केळी खावू नका. शेंगदाणे, फुटाणे, कुरमुरे, डाळी, काकडी, गाजर असे अनेक पदार्थ खावू नका. ते healthy नाहीत. शिवाय कुरमुरे खातो तो गरीब, backward समजला जातो. पिझ्झा खातो तो updated असतो. त्यामुळे पिझ्झा कंपन्या updated होत जातात आणि भारतीय शेतकरी out ऑफ date .
पिझ्झा कंपन्यांना AC दुकाने आणी रस्त्यावर भाजी विकणाऱ्या भारतीय महिलेला उन-पावसाचा मारा सहन करावा लागतो. शहरातील भरगच्च रस्त्यावर लघवी करायला जागा नसते, म्हणून ह्या महिला चहा-पाणी पीत नाहीत. किंवा चार-पाच तासात भाजी उचलून घरी जाव लागत.
जर भारतीयांनी ठरवल की मी फक्त माझ्या शेतकर्याने बनवलेलं product घेईन तर शेतकरी cola कंपन्या इतकी भरभराट पाहू शकतील. ते तुम्हाला dead body बनवणार नाहीत. घातक रसायन थोपणार नाहीत.
चला दिवाळी साजरी करू, जिवंत माणसांची...आनंदाने जगू शकणार्या भारतीय शेतकऱ्यांची...आणि त्या नरकासुराला दूर करूया जो भारतात घुसला आणि आम्हालाच मारायला निघाला आहे.
आमचा देश आधी सापांचा, गुलामांचा देश म्हणून ओळखला जायचा...आता तो dead body चा देश बनवायचा नाही!!
-निरेन आपटे

एक छान लेख...

तुम्हाला काय आहे... मुलगी-मुलगा? की रेसचा घोडा?
एक तरुण interview रूम मध्ये बसला होता. समोर तीन professionals चष्मा आणि tie लावून बसले होते.
Executive engineer ने तरुणाकडे पाहून विचारले, " tell me , जिथे खूप पाउस पडतो, तिथे जास्त प्रमाणात काय निर्माण होतं?"
तरुणाने उत्तर दिलं- "छत्र्या!"
दुसर्या tie वाल्या लठ्ठ CEO ने विचारलं- " यावर्षी पद्मश्री कोणाला मिळाली?"
तरुणाने उत्तर दिलं- " मला... कारण माझं नुकतंच लग्न झालं असून बायकोच नाव आहे पद्मश्री !!"
तिसरा Regional manager वैतागून म्हणाला-" काही डोक आहे का तुला?"
तरुणाने शांतपणे उत्तर दिलं-" हो, खूप डोक आहे. शाळेत भरती झाल्यापासून ह्या interview पर्यंत सगळे जण तेच खात आहेत."
Executive engineer ने विचारलं, " तुझ्या bio - data मध्ये M A , B f t डिग्री लिहिली आहे, काय आहे ही पदवी?"
तरुणाने पुन्हा शांतपणे उत्तर दिलं-" Matric appeared but failed thrice "
त्यावर CEO ने चिडून फाइल आपटली आणि ओरडला-" फार मोठा गाढव आहेस तू !!"
तरुण तितक्याच शांतपणे म्हणाला- "साहेब, मोठे तर तुम्ही आहात, मी तर फार लहान आहे"
एक पिढी शिक्षण घेवून गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे.
परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला की चालला तबला वाजवायला...संगीत विशारद बनायला.
Albert Einstein बनवून देणाऱ्या Multi -national school आल्या. पण Albert हा Einstein बनण्यासाठी शाळेत गेला नव्हता. एक अमिताभ बनला तर हजारो acting school उभ्या राहिल्या. पण अमिताभ अभिनेता बनण्यासाठी कोणत्याही school मध्ये गेला नव्हता. आता लवकरच मोदी तयार करणाऱ्या शाळा उभ्या राहतील. आणि पालक लाखो रुपये फी भरून त्यात मुलांना पाठवतील. आज मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा खर्च एका वर्षाला होतो, तितके रुपये त्याच्या पालकांना संपूर्ण शिक्षण घेण्यासाठी सुध्दा लागले नाहीत.
आता शाळा सुरु केल्या आहेत investors नी. मागणी तसा पुरवठा ह्या तत्वावर. पालकांना आपल्या मुला-मुलीला रेसचा घोडा बनवायचं आहे ही मागणी पाहून जास्तीत जास्त अभ्यास मुलांच्या डोक्यात कोंबायला सुरुवात केली. दप्तराचं आणि पालक-शिक्षकांचं अपेक्षांचं ओझं वाहणारी मुले म्हणजे चालती बोलती प्रेते बनत चालली आहेत. जरा शुद्धीवर आली की " what is square of 12 ? " असं विचारून त्यांचं बालपण चिरडून टाकतात.
श्री मोदी ह्यांनी मुलांना एक प्रश्न विचारला होता-" तुमच्यापैकी किती जण घाम गळेपर्यंत खेळतात?"
तेव्हा एकाही मुलाने हात वर केला नाही. कारण आता मुले AC मध्ये जन्म घेतात, AC मध्ये वाढतात. चिप्स खातात, soft ड्रिंक पितात आणि mobile वर game खेळत बसतात. उन, पाऊस, वारा ह्याच्याशी संबंध येत नाही. पडणं-लागणं, खेळात हरणे माहीतच नाही. school bus आली नाही तर शाळेपर्यंत चालत जाण्याची ताकद मुलांमध्ये नाही. वय वर्ष ६ पार होत नाही तर डोळ्याला चष्मा लागतो. हात पायांच्या एकतर काड्या होतात नाहीतर लठ्ठपणा वाढतो. कारण शारीरिक कष्ट संपले आणि Modified food starch, maltodextrin, hydrolyzed corn gluten, disodium inosinate/ guanylate, yeast extrac, hydrolyzed soy protein मिसळलेले पदार्थ खाणे सुरु झाले. ह्या ingredients ची खासियत म्हणजे ते मुलांच्या पोटात शिरून जास्त काळ टिकतात आणि पोटातील पोषके शोषून घेतात. मुलांची hormonal आणि जैविक वाढ रोखतात. ज्यामुळे मुले दुबळी होत जातात. हे घटक पिझ्झा-बर्गर मध्ये असतात. म्हणून भारत लवकरच diabetes चे सर्वाधिक रुग्ण असलेला देश बनणार आहे. सोबत इतरही विकार येत आहेत.
शेंगदाणे, चणे, रवा, तांदूळ, बाजरी, सुका मेवा आणि फळे ह्यात घातक ingredients नसतात. लापशी, सातू, शिरा, पोहे किंवा अंड्याचे घरी बनवलेले पदार्थ मुलांना उत्तम पोषण पुरवतात. ते मिळत नसल्यामुळे मुलांची शारीरिक वाढ नीट होत नाही. प्रतिकार क्षमता संपते. मग vitamins , DHA , minerals देणारे product विकत आणून ते खायला देतात. वास्तविक, शरीर हा जगातील सर्वात मोठा कारखाना आहे. ह्याच शरीराला योग्य आहार, कष्ट मिळाले तर कुठेही तयार न होऊ शकणारं रक्त तयार होतं. साध्या भाज्या, अस्सल भारतीय जेवण मिळालं की शरीराची यंत्रणा स्वत काम करते. म्हणून ताज्या भाज्या, भाकरी खाणारी आणि मिनरल्स, calcium , proteins माहित नसलेली माणसे १०० वर्षे जगली आणि हे माहित झालेली माणसे फक्त ६० वर्षे जगतात…तेही अनेक रोग सोसत, औषधे घेवून !!
खेळ, व्यायाम, भटकंती आणि दर्जेदार वाचन न केल्यामुळे मुलांना मानसिक कमतरता जाणवते. संघर्ष माहित नसतो आणि team work कळत नाही. मित्र फक्त whats app , face बुक वर भेटतात. प्रत्यक्ष भेट नाही. सुख-दुखाची देवाणघेवाण नाही आणि मित्राचा-मैत्रिणीचा मानसिक आधार नाही. दिलखुलास हसणे आणि ओक्साबोक्शी रडणे मानसिक आरोग्यासाठी चांगले असते. ह्या दोन्ही क्रिया मुलांना करता येत नाहीत. आपोआपच, जरा मनाविरुद्ध घडलं की लहान मुले-मुली आत्महत्या करतात. बरीच एकुलती एक मुले दुसर्याशी जमवून घेण्याची सवय नसल्यामुळे पुढे लग्न झाल्यावर वर्षभरात घटस्फोट घेतात. ज्या मुलांना बहिण नसते, चांगली मैत्रीण नसते त्यांचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन संकुचित बनतो. ह्या उणीवांचा शिक्षणात विचार केलेलाच नाही.
भारतीय शिक्षण पद्धत सर्वांगीण नाही हे शिक्षण तज्ञ सांगत होते तोवर शिक्षणाचा धंदा सुरु झाला. मोठे उद्योजग, पुढार्यांनी शाळांमधून गुंतवणूक करून शिक्षण संकल्पनेला धूळ चारली. एखादी स्त्री गरोदर राहिली तर जन्माला येणाऱ्या जीवाच्या admission ची तयारी सुरु होते. कृष्णाला जन्मण्याआधी मारायची तयारी मामाने केली होती. आता मुल जन्माला येण्याआधी त्याला रेसचा घोडा बनवायची तयारी सुरु होते. आता मुलाने बोलायला सुरुवात केली की थेट E =Mc square म्हणायचं बाकी राहिलं आहे.
अशी मुले सर्व formula पटापट म्हणून दाखवतील पण स्वताचा formula कधीही शोधू शकणार नाहीत.
guitar शिकतील पण स्वताची संगीत रचना करू शकणार नाहीत.
लता मंगेशकर, सचिन तेंडूलकर, मेरी कोम ह्यांचं अनुकरण अचूक करतील. पण स्वताची ओळख निर्माण करणार नाहीत.
कारण त्यांना फक्त अनुकरण करायला शिकवलं जातं.
जगायची कला, गीत-संगीतातील आनंद, निसर्गासंपदेची भव्यता, नव्या संकल्पनांची निर्मिती, जुन्या विचारांचा आधार, साहित्य ह्याला बाजारू किंमत नसल्यामुळे फक्त जे विकलं जातं तेच ज्ञान मुलांना मिळतंय, त्यात ते पारंगत होत आहेत. काही जणांना campus मध्ये दर महिना ४ लाखांपेक्षा जास्त पगार असणारी नोकरी मिळतेय....पण त्यात देशाचं नाही, भांडवलदारांच हित साधला जातंय. पुढची पिढी मोठी पदवी मिळवेल पण न स्वत जगण्याचा आनंद लुटू शकतील, न दुसर्याला जगण्याची मजा मिळू देतील...
अगदी हाच धोका ओळखून जपानमध्ये शाळेत AC लावत नाहीत. तिथे मुलांना घोकंपट्टी पेक्षा practical वर भर देतात. वृक्ष-वेली स्वताच अन्न स्वत तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात?...असे प्रश्न विद्यार्थ्यांना न विचारता शाळेत व बाहेर भाजी लावायला शिकवतात. त्या रोपांची-वेलींची जोपासना करायला लावतात. "निप्पोन technology " ने केलेल्या तपासणीत म्हटलं आहे की शाळेच्या आवारातील वेलींमुळे तापमान चार अंश कमी झाल आहे. आणि मुले पाना-फुलांसोबत भावनिक नात जोडू लागली आहेत. जर्मनी मुलांना Transference शिक्षण देते. तिथे लहान मुलांची बोटे नाजूक असतात हे लक्षात घेवून दुसरी पर्यंत लेखन करू देत नाहीत. पाचवीपर्यंत practical चालतं आणि त्यानंतर विद्यार्थी बँक कर्मचारी बनेल की हवाई सेविका, प्रशासन सांभाळेल की कुशल कामगार होईल ह्याची सतत तपासणी होते. दहावीनंतर फक्त त्याला आवडणाऱ्या क्षेत्रांच प्रशिक्षण देतात. सगळे एकदम science मध्ये भरत नाहीत. अनावश्यक विषय शिकवत नाहीत. चीन हा cycle प्रेमी देश ४ वर्षाच्या मुलांना cycle चालवण्याच शिक्षण देतो. त्यानंतर theory कमी आणि प्रत्यक्ष कृती शिकवतात.
प्रत्येक विद्यार्थी उद्या देश चालवणार ह्याचा विचार Netherlands सारखा देशही करतो. एकाच विद्यार्थ्यावर सगळ्या विषयांचा मारा करत नाहीत. चारी दिशांनी अनेक विषय आणि क्लासचा मारा सोसण्याच काम भारतीय विद्यार्थ्यांना करावे लागते.
शिक्षण काय असतं?
रवींद्रनाथ टागोर काय म्हणतात पहा.
टागोरांची "शांतीनिकेतन" शाळा झाडांखाली भरत असे. पक्ष्यांची किलबिल ऐकू येई. एकदा टागोर झाडाखाली बसले होते. चार विद्यार्थी त्यांच्या समोर पुस्तकात डोक खुपसून बसली होती. आणि उरलेली बरीच मुले खेळत-बागडत होती. कोणी झाडावर चढला होता, कोणी फुलांचा सुगंध घेत फिरत होता. तेवड्यात एक पालक तिथे आले. पाहतात तर काय...गुरुदेव शांतपणे बसले होते आणि फक्त चार मुले पुस्तकात डोके खुपसून बसली होती व इतर मुले हसण्यात-नाचण्यात रमली होती. सुटा-बुटातील पालक महाशय टागोरांना म्हणाले- “या नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांच्या भवितव्याची तुम्हाला चिंता वाटत नाही का?”
टागोर म्हणाले- “चिंता वाटते, पण नाचणाऱ्या-बागडणार्या मुलांची नाही तर पुस्तकात तोंड खुपसून बसलेल्या मुलांची. ही मुले खेळण्या-बागडण्याच्या वयात मोठ्या माणसासारखी वागत आहेत. ही मुले लहान वयात प्रौढ झाली आहेत. प्रौढ तर मीसुद्धा अजून झालो नाही. खरं तर मलाही झाडावर चढाव असं वाटतं. पक्ष्यांशी बोलावसं वाटत. भरपूर खेळावस वाटतं. पण माझ शरीर आता साथ देत नाही. “
टागोर जगण्यासाठी शिकवत होते. आता शिकण्यासाठी जगावे लागते.
जास्त ज्ञान, जास्त कला घेवून मुले धावत असतात.
आणि पालक त्यांच्यावर पैसे लावतात !
मग एक रेस सुरु होते आणि जगायचं राहून जातं !!
-निरेन आपटे