Thursday, August 22, 2013

नव-यासाठी अन बायकोसाठी..

नवरा-बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी सुंदर कविता काल वाचनात आली. दुर्दैवाने कवीचे नाव कळू शकले नाही पण त्याने कवितेची गोडी कमी होत नाही.

तो तिला म्हणाला “डोळ्यात तुझ्या पाहू दे”
ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्...ब जरा राहू दे”

तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर?”
ती म्हणाली ” आई रागावतील, दूध उतू गेल तर?”

“ठीक आहे मग दुपारी फिरून येवू, खाऊ भेळ”
“पिल्लू येईल शाळेतून, पाणी यायची तीच वेळ”

“बर मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चर ला जावू”
“नको आज काकू यायच्यात, सगळेजण घरीच जेवू”

“तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट”
“बघ तुझ्या नादामधे भाजी झाली तिखट”

आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
एइकू आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस

सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली, ती त्याला खिड़की आडून

दमला भागला दिवस संपला तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना

नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।

तिनेच शेवटी धीर करून अबोला संपवला
“रागावलास न माझ्यावर?” आणि तो विरघळला।

“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून किती सिगरेट्स ओढल्यास सांग”

“माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळण आठवल

अपेक्षांच ओझ तू किती सहज पेललस
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…

तुला नाही का वाटत कधी मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावस?”

“बोललास हेच पुरे झाल…एकच फ़क्त विसरलास…
माप ओलांडून आले होते, मी-तू पण तेव्हाच गळलं
माझ जग तुझ्या जगात तेव्हाच नाही का विरघळलं?”

-कवी अज्ञात

Sunday, August 11, 2013

ईतिहास..

इतिहास ...(अक्षरदीप दिवाळी अंक २००३ मधून साभार)

May 25, 2013 at 6:35pm
इतिहास कधीच इतिहासजमा होत नाही
इतिहास विसरतात त्यांना क्षमा होत नाही
इतिहास म्हणजे भूतकाळ जागा करणे
आणि भविष्यकाळाला भव्य जागा देणे
इतिहास म्हणजे पुरलेली मढी उकरणे नाही
आणि आजची उरलेली मढी पुन्हा पुरणे नाही
इतिहास विसरला कि भूगोल बदलतो
भूगोल बदलला कि फक्त नकाशा बदलतो
इतिहास भूगोलाची तमा कधी करत नाही
इतिहास पुन्हा घडतो कामा कधी येत नाही
माकडाचा मानव झाला हा इतिहास आहे
मानवाचा माकड होणे हा उपहास आहे
सम्राटांच्या सनावळ्यात इतिहास नसतो
पायांखाली पिचलेल्या हाडात इतिहास असतो
माणूस हा आधी पशु आहे हा इतिहास आहे
माणूस हा गांधी येशू आहे हाही इतिहास आहे
इतिहास म्हणजे चंद्रावर पाऊल ठेवणे
इतिहास म्हणजे परग्रहांची चाहूल घेणे
पृथ्वी नष्ट झाल्यावर इतिहास भूगोलाचे काय
चंद्रावरती असतील मानवाचे घट्ट पाय.....