Sunday, November 13, 2011

happy childrens day all of you my small friends

सगळ्या बाल गोपालाना बाल दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ...

Monday, October 24, 2011

Happy Diwali

सर्व मराठी ब्लॉगर्स मित्र मैत्रीणीना दीपावलीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा ...ही दीपावली आपणा सर्वाना प्रसन्न,समृद्ध आरोग्यसंपन्न आणि सुख शांतीमय जावो ही प्रार्थना .

Sunday, April 3, 2011

गुढी ..आनंदाची आणि चैतन्याची ..

सर्व ब्लॉगर्स मित्रमैत्रिणींना ,वाचकांना आणि तमाम भारतवासीयांना गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्च्छा.....

अद्भूत......

क्षणाक्षणाला बदलत जाणारे करोडो चेहर्यांवरचे भाव ,धपापणारे उर ,क्षणात भयाण शांतता तर क्षणात जल्लोष आणि अखेर आत्यंतिक आनंदाने  बेभान झालेला माझा भारत ....!!! प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा वर्ल्ड कप चा अंतिम सामना भारताने जिंकून "जगज्जेता " हा किताब पटकावला .अठ्ठावीस वर्षानंतर विश्वकप भारताला मिळाला आणि तोही सचिन सारख्या महान खेळाडूला समर्पित केला गेला ,हि २०११ या नवीन वर्षाच्या सुरवातीची सगळ्यात आनंददायी घटना आहे ,प्रत्येक भारतीयाला चिरंतन स्मरणात राहणारा अलौकिक क्षण ! .मी १९८३ च्या वर्ल्ड कप विषयी फक्त ऐकून होतो ,पाहीला नव्हता कारण घराघरात दूरदर्शन संच नव्हते आणि क्रिकेटच एवढ लोणही पसरलं नव्हत ,वयही लहान होत ,म्हणून आज विश्वकप जिंकण्याच्या आनंदाचं खूप अप्रूप वाटतय.एक ऐतिहासिक क्षण अनुभवला .धोनी ,हरभजनसिंग आणि युवराजच्या डोळ्यातील आनंदाश्रू  पाहून खरच गहिवरून आलं.कुणाचं लक्ष नाही असं पाहून हळूच डोळ्यांच्या कडा पुसल्या .आत्ता कळलं लोक क्रिकेट साठी एवढ वेड का होतात ते .

    धोनी सेनेचं हृदयापासून अभिनंदन आणि संपूर्ण क्रिकेटवेड्या भारताचं देखील मनापासून अभिनंदन.!!!!
                                                              जयहिंद!!

Wednesday, March 30, 2011

थरार

भारत पाकिस्तान  या दोन संघातला क्रिकेट सामना म्हणजे धर्मयुद्धच! त्याचा थरार प्रत्येक भारतीयाने काल अनुभवला. 'जबरदस्त' असच त्याच वर्णन कराव लागेल. प्रत्येक भारतीयाच्या मनातली इच्छा काल सुफळ संपूर्ण झाली . ज्यांना क्रिकेट मधल काहीच कळत नाही, ते सुद्धा एखाद्या जाणकारासारखे हा सामना बघत होते. विशेष करून महिलावर्ग! इतरवेळी टी.व्ही .वर सामना असताना घरातल्या बायकांचं डोक उठत. उगाच तणतणतच "अहो ते क्रिकेट बिकेट नको बर का,आम्हाला 'कुंकू 'बघायचीय ",असं म्हणत आपला हक्क गाजवतात परंतु कालचा सामना पाहताना महिलावर्ग ही तेवढाच उत्साही दिसत होता .आश्चर्याची गोष्ट म्हणजे सचिन सेहवाग सोडून कुठलाही क्रिकेटपटु माहीत  नसताना महिलावर्ग सामन्याचा थरार अनुभवत होता .असो .
    भारताचा विजय अपेक्षितच होता तो झालाच. आता टक्कर विश्वविजेता बनण्यासाठी . भारत विश्वविजेता होईलच  हे नक्की .....त्यासाठी भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा .आणि भारतीय संघाचं मनापासून अभिनंदन .






Monday, March 21, 2011

अंतर्मन


 ब-याच दिवसानंतर आज लिहण्याची उर्मी आलीय.असं खुपदा होतं.उर्मी आल्यानंतर काही क्षणातच उत्साह मावळतो.कारण उर्मी चित्तातुन येते आणि उत्साह शरीरातुन.शरीर-मनाची एकरुपता साधल्याशिवाय हे घडत नाही.आज दोन्हींचा समन्वय साधला गेलाय....आपल्या अंतर्यामी असलेल्या अंतर्मनाविषयी आज थोडं लिहीतो..
    आपल्या प्रत्येकाच्या प्राणमय कोषात खोलवर एकच आकांक्षा रुजलेली असते आणि ती म्हणजे आपण सुखी व्हावं,आनंदात जगावं,आपल्या जीवनात ऐश्वर्य ,वैभव,समृद्धी संपन्नता असावी,तेही इतकं अपरिमीत असावं की,त्यात इतरांना सुध्दा भागीदार करुन घ्यावं.या सुखासाठी ,आनंदासाठी आपण झटत राहतो,भट्कत राह्तो.मोठमोठया पदांवर विराजमान होण्याच्या आधीन होतो.पडेल ते कष्ट करतो.प्रयत्नांती हे सगळं प्राप्त देखिल होतं.पण त्यानंतर असं लक्षात येतं की आपण समाधानी नाही आहोत, आनंदी, तृप्त नाही आहोत. कशासाठी तरी मन अजुन सैरभैर आहे. याचा शोध आपल्याला बाहेरच्या दिशेने घेवुन जातो. काही प्रज्ञावंत प्रतिभावंतांच म्हणणं आहे की असं बाहेरच्या दिशेने शोधण्यामध्ये आनंद,ऐश्वर्य कधीच मिळत नाही. आपल्याला एवढच माहीत करुन घ्यायचंय की हे सर्व आपण आपल्यासोबत घेवुन जन्माला आलो आहोत. ही संपदा आपल्या अंतर्यामी आहे, आपल्यात विद्यमान आहे आणि ते म्हणजे आपलं अंतर्मन.....
     आपला एक समज असतो ,पैशांनी सारी सुखं विकत घेता येतात.पण तस नाहीये. ज्या काही सर्वोत्तम गोष्टी आहेत त्या मोफत आहेत. काहीही न देता त्या मिळतात आणि याच गोष्टींची जीवनात जास्त गरज असते जसं की प्रेम ,आस्था,शुध्द अंतःकरण,मानसिक शांती आणि अंतर्मनातील आनंद.
   आपलं अंतर्मन हे अफाट सामर्थ्याचं भांडार आहे.अद्भुत चमत्काराची शक्ती त्याच्याजवळ आहे.ही शक्ती  प्राप्त करण्यासाठी आपण डोळे उघडे ठेवायला हवेत. अफाट समृध्दिचा खजिना,बुध्दिमत्ता, संपन्नता जे काही  सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी लागतं ते सगळ आपण मिळवू शकतो.त्या आधी त्याला जाणुन घ्यायला हवं.
     लौकीक अर्थाने मन हे एकच असलं तरी त्याच्या काम करण्याच्या पध्द्तीचे दोन भाग आहेत.त्या  दोन्ही भागाचं कार्य मुळातच परस्परांपासुन भिन्न आहे. दोन्हींमध्ये स्वतःचे विशिष्ट गुण व शक्ती आहेत. त्या दोघामध्ये फरक करण्यासाठी त्याना वेगळी नावं दिली गेली. अंतर्मन आणि बाहयमन. अथवा अचेतन  मन आणि सचेतन मन..किंवा जागृत मन आणि निद्रिस्त मन.
   बाहयमन आपल्या शरीराचे मालक असते.आपण काय विचार करतो, कशावर विश्वास ठेवतो .आपल्या मान्यता (समजुती) काय आहेत यावर आधारीत दिलेल्या आदेशांच पालन आपलं अंतर्मन निमुटपणे करत असतं.ते कधीही विचार करत नाही.फक्त तुमच्या आदेशाचं पालन करणे एवढच त्याला समजतं.सर्वप्रथम विचार येतो बाहयमनात.विचारातुन कृती जन्माला येते.आपले विचार जन्म घेतात ते आपापल्या जीवन मुल्यांमधुन,आणि ही मुल्य आधारलेली असतात आपल्या स्वतःच्या श्रध्दांवर आणि भावनांवर. आपलं आज पर्यंतचं जगणं म्हणजे आपल्या विचारांचा परीणाम. दिवसभरात आपल्या मनात अनेक विचार येतात ,अनेक दृष्य आपण पहातो. हे विचार, दृष्य,वस्तु आपण कधीच विसरत नाही.लहानपणी पाठ केलेली स्तोत्रं,कविता आपण केव्हाही म्हणु शकतो. अनेक वर्षानंतर भेट्लेला मित्र आपण लगेच ओळखतो. पोहणे ,सायकल चालवणे या कला आपण कधीच विसरु शकत नाही. हे सर्व ज्ञान ज्या ठिकाणी साठवले जाते वा रेकॉर्ड केले
जाते ते म्हणजे आपलं अंतर्मन. शरीरातील अंतर्गत कार्य प्रणाली संपुर्णपणे अंतर्मनाच्या स्वाधीन असते.
  याआधी सांगितल्याप्रमाणे अंतर्मनाला स्वतंत्र विचार करण्याची शक्ती नाही.ती दैवी शक्ती आहे (Devine Power) अंतर्मन व जागृत मन यांच्या मध्ये अविश्वासाचा व अश्रध्देचा पोलादी पडदा आहे.हज्जारो विचारामधील एखादाच प्रबळ श्रध्देने ओथंबलेला विचार वा इच्छाशक्ती हा पडदा फाडुन अंतर्मनात शिरतो आणि वास्तवात येतो. आपल्या विचारांवर असलेली नितांत श्रध्दा ,जागृत मनातील संकल्प अंतर्मनात गेल्यावर अंतर्मन ते अस्तित्वात आणण्यास कारणीभुत होते.आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करतो त्याच गोष्टी आपल्या जीवनात मोठयाप्रमाणात असतात.


                                                    क्रमश:

Tuesday, March 8, 2011


महिला दिनाच्या निमित्ताने....
आपण तमाम सर्व पुरुष घरातील स्रियांना मग ती आई ,पत्नी,बहिण ,मुलगी कुणीही असु दे,सर्वच बाबतीत गृहित धरलेलं असतं.मी काहीही निर्णय घेतला,तो सर्वाना मान्य आहे अशी आपण आपली ठाम समजुत करुन घेतलेली असते.सहसा आपल्या निर्णयाविरुध्द कुणिही जाणार नाही याची आपल्याला खात्रीअसते.आणि जर त्याला कुणी विरोध केला तर तुला काही कळत नाही ,गप्प बैस अशी तंबी वजा धाक   दाखवुन त्यांना गप्प करतो.त्या गप्प बसतात.खरं तर त्या मागे त्यांचा विचार असतो, जावू दे, कशाला वाद घालायचा,कळेल आपोआप चुक की बरोबर . आणि मग निर्णय चुकल्यानंतर आपण काहीतरी सारवासारव करतो,वेळप्रसंगी आदळआपट, संताप करुन वरचढ होण्याचा प्रयत्न करतो,कारण आपला अहंकार!
परंतु विचार करुन घरातील स्रीला जर आपल्या सर्व लहानमोठ्या निर्णय प्रक्रियेत सामावुन घेतले तर अनेक
अवघड प्रसंग वा अनाहुत संकटापासुन आपण दुर राहु शकतो.हा माझा  विश्वास आहे..
  आज जगात असं कोणतंही क्षेत्र नाही ज्यात स्री चा सहभाग नाही.स्री मधील नैसर्गिक क्षमता ओळखूनजगभरात त्यांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि त्याही मोठ्या हिमतीनं आपल्या जबाबदा-यासांभाळताहेत.
  आपल्या सर्वांच्या आयुष्यात,आपल्याला घडवणा-या,आपल्यावर उत्तम संस्कार करणा-या आईचा मोलाचा वाटा असतो.तिच्या प्रेमासारखी सुंदर गोष्ट जगात नाही.आईचे शब्द हे सर्वात गोड शब्द आहेत.भलेही ती कठोर बोलु देत त्यात तीचा उद्देश फक्त आपल्याला सुधारण्याचा असतो,दुखावण्याचा नव्हे.आजच्या यादिवशी महिला दिवस साजरा करताना एक स्री म्हणुन माझ्या आयुष्यात आईचं महत्व मी कधीच विसरणारनाही.
  त्या नंतर आपल्या आयुष्यात येते दुसरी स्री म्हणजे पत्नी. गृहलक्ष्मी.घरघरातल्या समृध्दिची देवता.जेव्हा घरातील पुरुष अडचणीत सापडतो ,संकटांना सामोरं जातो तेव्हा पत्नीची सुध्दा तेवढीच मोलाची साथ लाभते.ती कोणत्याही परिस्थीतीला तोंड देण्यास समर्थ असते.कोणतही दुःख झेलण्याची, आपल्या आरोग्याचीतमा न बाळगता ,आपल्या कुटुंबासाठी सर्व त्यागकरण्याची तीची तयारी असते.याचा आपणा सर्वाना अभिमान वाटला पाहिजे.घरातील कोणतही लहान मोठं कार्य असु देत तिच्यातील उत्साहाची आणि शक्तीची प्रचीती येते. माझाच काय प्रत्येक पुरुषाचा हा अनुभव आहे.की ,.पत्नी फक्त दोन दिवस आजारी पडु दे किंवा माहेरी जावु दे,घराचे आणि स्वतःचे काय हाल होतात हे सांगणे न लगे. घराचं जंगल व्हायला वेळ   लागत नाही.यासाठी प्रत्येक पुरुषाने एक निर्धार करावा परिवारातील कुणाही स्री च्या डोळ्यात कधीच अस्रु दिसता कामा नये. आपल्या आनंदाचे आणि समृध्दिचे कारण त्याच आहेत.ज्या घरातील स्री दुःखी असते ते घर नेहमी होरपळत असते.
        अध्यात्मिक पातळीवर जावून विचार केल्यास स्री मध्ये नउ प्रकारच्या निरनिराळया शकती आहेत.त्या                      अशाआदिशक्ती,शब्द्ब्रम्हयी,चराचरमयी,ज्योर्तिमयी,वाग्ड्मयी,नित्यानंदमयी,परात्परमयी,मायामयी,आणि श्रीमयी. ही स्री तत्व आहेत.म्हणुन तिला स्री म्हटलं जातं.
  विश्वामध्ये नाते आणि नातेसंबंध ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.आयुष्यातील प्रत्येक गोष्ट ही नातेसंबंधांचा संगम आहे.प्रत्येक गोष्ट स्री आणि पुरुषामधील उर्जेचा समतोल आहे.एका उर्जेचे अधिक्य झाले  तर आपला तोल सुट्तो.आज स्रीत्वाच्या उर्जेला पुन्हा जागृत करण्याची गरज आहे.कारण पुरुषी उर्जेच्या अधिकतेमुळे भ्रष्टाचार ,उध्द्टपणा आणि आक्रमकपणा वाढला आहे.सा-या जगात ही समस्या बनुन राहीली आहे.         
   आज महिला दिनाच्या निमित्ताने मला सांगावेसे वाट्तं ,जग निराशेने भरुन गेलं आहे.ही निराशा आली कुठन?.ही आपल्यातुनच निर्माण झाली आहे.म्हणुन महिला दिनाच्या निमित्ताने आपण योग्य आणि उत्तम विचार करणे आवश्यक आहे.प्रत्येक स्री चा योग्य तो मान राखला गेला पाहिजे.
भारत वर्षातील तमाम माता भगिनींना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा........

Saturday, March 5, 2011

सृजन


एका गर्दीच्या ठिकाणी मोठ्या इमारतीच्या पाय-यांवर एक अंध मुलगा हातात फलक घेउन बसला होता.
त्याच्यासमोर डोक्यावरची हॅट ठेवलेली होती.त्यात काही नाणी होती आणि हातातील फलकावर लिहले होते
‘’मी अंध आहे मला मदत करा’’
एक व्यक्ती आली तीने आपल्या खिशातुन नाणं काढुन त्या हॅट मध्ये टाकल  फलकावर मागच्या बाजुने काहीतरी लिहलं आणि सर्वांना दिसेल असा फलक ठेवला.
  काही वेळानंतर खुपशा नाण्यांनी आणि नोटांनी त्याची हॅट पुर्ण पणे भरुन गेली. दुपार नंतर ज्या व्यक्तीने
फलकावर काही लिहले होते ती व्यक्ती मुद्दामहुन काय घडले हे पाहण्यासाठी आली. त्या अंध मुलाने त्याच्या
पावलांचा आवाज ओळखला, आणि म्हणाला,सकाळी तुम्हीच आला होता आणि या फलकावर काहीतरी लिहुन गेलात, काय लिहलं होतं त्यावरयावर ती व्यक्ती म्हणाली ‘’मी फक्त एक खरं सत्य लिहलं जे तु तुझ्या शब्दात लिहलं होतस.’’ त्याने लिहलंहोतं...’’आजचा दिवस खुप सुंदर आहे,पण मी त्याचा आनंद घेउ शकत नाही.’’
  मित्रांनो, तसं पहायला गेलं तर दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे की मुलगा अंध आहे. पहि्ल्या वाक्यातुनफक्त मदतीची अपेक्षा आहे, दुस-या वाक्याचा अर्थ असा निघतो की आपण सर्व जण या सुंदर दिवसाचाआनंद घेउ शकतो त्याला सोडुन कारण तो अंध आहे. मग आपण किती भाग्यवान आहोत.
   अशा लहान सहान गोष्टींनी आपण सृजनशील होउ शकतो, फक्त ती दृष्टी हवी. आपल्याजवळ जे आहे त्या साठी आभार माना,अनेकांकडे तेही नाही.ज्यांना मदतीची गरज आहे त्याना मदत करा आणि मोठे व्हा.

Thursday, March 3, 2011

निमीत्त

अविचल स्वामीनिष्ठा , अतुलनीय पराक्रम यांचे मुर्तीमंत रूप म्हणजे रामदूत हनुमान. मानवाच्या मनात धर्मनिष्ठा, त्वेष, जिद्द, अन्ययाची चीड, जोम, सत्कर्मासाठी अग्रेसर रहाण्याची प्रवृत्ती निर्माण होण्यासाठी प्रातःस्मरणीय समर्थ रामदासांनी महाबली हनुमंताची उपासना करण्याचा उपदेश लोकांना दिला. हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने जगभरात साजरा केला जातो. भक्तगण आपल्या अपेक्षांची लांबलचक यादी हनुमंताच्या श्रीचरणी सादर करतील. आपल्या मनात राष्टनिष्ठा निर्माण होण्यासाठी किती जण हनुमंताकडे प्रार्थना करतात हा आत्मपरिक्षणाचा विषय आहे. साधारणपणे साडेसाती सुरु झाल्यावर शनिवारी , मंगळवारी हनुमंताच्या मंदिरासमोर लांबचलांब रांग दिसते. आपण आपल्या दैनंदिन जीवनात सुख सुविधांचा अनुभव घेत असतो , त्यामागे भारतीय सैन्याचे , पोलिसांचे जीवनपणाला लागले आहे हे आपण विसरतो असेच म्हणावे लागेल. आपण सहजतेने घेत असलेला श्वास देखील भारतीय सैन्याच्या , पोलिसांच्या अथक परिश्रमाचा परिपाक आहे हे आपणास मान्य करावेच लागेल. हनुमंताची उपासना करताना आपण राष्ट रक्षणासाठी कधी प्रार्थना करतो का ? याचे उत्तर व्यस्त प्रमाणात आहे ही घोर निराशा आहे. भारतीय सैन्यास , पोलीसांना हनुमंताचे अभेद्य कवच प्राप्त करुन देणे आपण आद्य कर्तव्य समजणे नितांत गरजेचे आहे. आपल्या क्षण भराच्या प्रार्थनेने भारताच्या चतुःसिमा रक्षणासाठी सैन्यात पराकोटीचा आवेश निर्माण होईल यात तिळमात्र शंका नाही. मात्र त्यासाठी प्रत्येक भारतीयाच्या मनातील आवेश व त्वेष सतत धगधगता असणे अगत्याचे आहे. आवेश व त्वेष हा प्रतिक्षण मानवास अत्यावश्यक असणार मनोविकार आहे. समर्थ रामदासांनी लिहिलेले भीमरुपी महारुद्रा हे स्तोत्र घराघरात श्रद्धेने म्हटले जाते. समर्थरामदासांनी हिंदुधर्मस्थापनेसाठी सिद्ध हनुमंताचे अत्यंत प्रेरणादायी स्तोत्र केले आहे. या श्रद्धायुक्तमनाने स्तोत्राच्या नित्यपठणाने मनातील निराशा , भय , अगतिकता अशी अवस्था क्षणार्धात दूर होते. त्याच बरोबर आपल्या राष्टाच्या सर्वांगीण रक्षणासाठी हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. विचार करा रोज प्रत्येकाने या स्तोत्राचे पठण केले तर भारतीय सैन्यास हनुमंत कृपेचे अभेद्य वज्रकवच प्राप्त होईल. स्तोत्र पुढील प्रमाणे-
श्रीगणेशाय नमः।
कोपला रुद्र जे काळी , ते काळा पाहावेचिना।
बोलणे चालणे कैचे , ब्रह्मकल्पांन्त मांडला॥१॥
ब्रह्मांडाहुनी जो मोठा , स्छुळ उंच भयानकु।
पुछ्य ते मुर्डले माथा , पावले सुन्यमंडळा॥२॥
त्याहुनी उंच वज्रांचा , स्छुळ उंच भयानकु।
त्यापुढे दुसरा कैचा , आद्भुत तुळणा नसे॥३॥
मार्तंडमंडळा ऐसे , दोनी पिंगाक्ष ताविले।
कर्करा घडिल्या दाढा , उभे रोमांच उठीले॥४॥
आद्भुत गर्जना केली , मेघचि चेवले भुमी।
फुटले गिरीचे गाभे , तुटले सींधु आटले॥५॥
आद्बुत वेश आवेशे , कोपला रण कर्कशु।
धर्म स्थापनेसाठी , दास तो उठीला बळे॥६॥
॥ श्रीसमर्थ रामदासकृतं मारुतीस्तोत्रं संपूर्णम्॥
अशा अद्भुत वेश धारण करणा-या हनुमंतास आपण भारतात होणारी घुसखोरी , अतिरेकि कारवाया रोखण्याचे आव्हान केले पाहिजे . आपल्या सैन्यदलास मनोबल , अतुलनिय पराक्रम करण्याचे सामर्थ्य देण्याची प्रार्थना करणे अगत्याचे आहे. या स्तोत्रपठणाने आपण हनुमंतास विनंती करत आहोत ती विश्वकल्याण्याची! हा उदात्त विचार मनात घेऊन आपणही हनुमान जयंतीपासून हे स्तोत्र नित्य म्हणावे ही नम्र विनंती. (सौजन्य -www.maiboli.com.}

Tuesday, February 22, 2011

वर्तमान
वर्तमान क्षण अगदी मूल्यवान का असतो? एक कारण म्हणजे तोच क्षण सत्य असतो.जे काही आहे ते वर्तमान क्षणातच आहे. अखंडित वर्तमान हाच एक घट्क शाश्वत आहे.जीवन जे काही आहे ते आता या क्षणी आहे वर्तमानात आहे.तुमचं वर्तमान जीवन अस्तित्वात नव्ह्तं असं कधीच पूर्वी झालेलं नाही.भविष्यात
तस होणारही नाही . दुसरं म्हणजे वर्तमान क्षणच तुम्हाला मनाच्या बंदिस्तीतुन मुक्त करतो. मनापलीकडे नेतो. तोच एक बिंदु आहे, जो तुम्हाला काळ विरहीत आणि निराकार अस्तित्वाच्या साम्राज्यात नेतो.
                                                  
                                                                एखार्ट टॉल.

Friday, February 18, 2011

अध्यात्म

अध्यात्म हे आपल्या हृदयातून जन्म घेतं .अध्यात्माचा अर्थ आहे पारदर्शक होणं ,खोलवर आत जाणं .अध्यात्म म्हणजे आपल्या भावना निरंतर विकसित होणं सुद्धा आहे .आपण स्वताशी सतत स्पर्धा करत असतो खरं तर ते वाईट आहे .स्वताहून मोठं  होण्यासाठी अध्यात्म आपल्याला खूप मदत करतं त्या साठी प्रार्थनेची गरज असते .आपली प्रार्थना जर सक्षम असेंल तर आपलं जीवनही अध्यात्मिक होईल ..पारदर्शी होईल .त्यासाठी   आपण स्वताशी आणि ईश्वराशी प्रामाणिक राहा,  आपल्या प्रत्येक विचाराला प्रार्थना बनवा .कारण आपले विचार आपली परिस्थिती कथन करतात .नियमित प्रार्थना करा .फक्त संकटाच्या वेळी अथवा विशेष  कारणानेच प्रार्थना नसावी त्यासाठी सकाळ संध्याकाळ प्रार्थनेचा नियम करा. समूहाने प्रार्थना करा ,ती परिणामकारक होते. कुठल्याही प्रसंगात ईश्वरावर विश्वास ठेऊन त्याला समर्पित व्हा .धन्यवाद द्या ..जेव्हा आपण प्रार्थना कराल तेव्हा ईश्वराप्रती कृतग्नता व्यक्त करा .कारण सर्वांगिण विकासासाठीच हे आयुष्य आपल्यला बहाल करण्यात आलेलं आहे .
           खरोखरच प्रार्थना दोन स्तरांवर काम करते एक म्हणजे प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला मनशांती मिळते आणि विश्वास निर्माण होतो कि समस्या सुटेल आणि खरोखरच समस्या सुटते .हा तुमच्या प्रार्थनेचा परिणाम असतो 'प्रार्थनेमुळे मनोवृत्तीत बदल होतो आणि तुम्ही योग्य विचार करू लागता . योग्य विचारामुळे योग्य कृती घडते आणि योग्य परिणाम घडून येतात .

Sunday, February 13, 2011


 हे नियंत्या....

वाणी माझी नित्य
      सांगे तुझे सत्य
मात्र तू अव्यक्त
        प्रेरणा माझी .

इवलेसे मन
         त्यात तुझे पण
सामावला तूच
          गात्रोगात्री.

सरावले भास
         त्यात तूच खास
अंथरले श्वास
 तुझिया साठी.....

Friday, February 4, 2011

Kavita

     मन
मन साय...   मन माय
मन जाणीवांचे पाय
मन गही-या अंधारी खोल बुड्त  जाय.
   तळ गाठला गाठला म्हणता,
मांडे अंतराली ठाण,
गेलं डोंगरी कपारी ,
ही-या-माणकांची   खाण.
मन हासरं वासरू ,
कधी चौखूर  उधले,
 देता क्षणी मीठी त्याला
होते लाजरे -बुजरे .

सर्व काही ठाउक त्याला
नसे क्षणाचा ही विसावा,
गोंजारीता मऊ हाते
मन आरसा दिसावा.

  मन कावरे- बावरे
मन चल बिचल,
मन करता एकाग्र
होते स्थिर अचल.

मन, घन -गंभीर डोह
त्याचा सापडे ना थांग,
मन माझा ज्ञानदेव
मन माझा पांडुरंग.

राजेंद्र भंडारी


                                                       
                                                                 

Thursday, February 3, 2011

 का ? कशासाठी ?


नमस्कार
आनंदतरंग हे माझ्या ब्लॉग चं नाव.. हे का? आणि कशासाठी?  असा प्रश्न मलाही पडला होता ,आणि मग सुरु झाली भ्रमंती मायाजालाच्या विश्वात...आणि बघता बघता हज्जारो माझ्यासारखे लेखन वीर सापडले .वेगवेगले विषय , रंगीबेरंगी कविता
मनाला चटका लाउन जाणारे अनुभव ,सुन्दर फोटोग्राफी असं काय आणि किती सांगू ... बस्स ..मन तिथच गुंतून पडलं .आणि
सुरु झाली ही साहित्य सफ़र . तसा मी अजुन ब्लॉग विश्वातल्या इयत्ता पहिलीतच आहे ..पण मला खात्री आहे माझ्या ब्लॉग मित्रांच्या सहकार्याने मी लवकरच पुढे जाईन. आपणा सर्वांचे मला आशीर्वाद हवेत ..

Friday, January 28, 2011

Man

आपले मन हे चैतन्याचा अनुभव घेण्याचे स्थान आहे .आपले जीवन उन्नत करणे हे भारतीय तत्वद्न्य्नाने  सांगितले आहे .विश्वातील चैतन्याशी एकरूप होणे शक्य व्हावे म्हणून माणसाला देवाने मन बहाल केले आहे  .मन हेच औषध कसे बनवता
येइल यावर जगात अनेक मानस शास्री अविरत संशोधन करीत आहेत .रोग कसा निर्माण होतो ,रोगाला प्रतिरोध कसा केला जातो , रोग कसा काबूत राखावा या प्रश्नांची उत्तरं वैद्यकीय शास्रासह मानसिक शास्रातुन मिलवन्याचा
 प्रयत्न होत आहे .