Tuesday, April 21, 2015

स्मिता गानु जोगळेकर यांचा सुंदर लेख.

थोडे तरी वेडे व्हायलाच हवे

थोडे तरी वेडे व्हायलाच हवे 

मी आणलेले असते नीलकंठ पक्ष्याचे छानसे पीस. एक गोलच गोल शंख , सूर्यफुलाच्या वाळलेल्या शेंगांच्या अर्धगोल पुंगळ्या आणि खूप अधिरतेने मला त्या दाखवायच्या असतात कोणाला तरी.मी ऑफिस मध्ये येते, सारा माहोल ठावूक असूनही आशाळभूतपणे बघते इथे तिथे.आसपासची माणसं बघून मला पुनः पुनः आश्चर्य वाटत राहते,काही किरकोळ अपवाद वगळता, यांच्यातील कोणीच का कधी बोलत नाही पाउस-वारा, फुलं-पाखरं , सुगंध-झुळूक , डोंगर-झरे वगेरे वगरे बद्दल . हे सतत कोणाला प्रमोशन , कोणाची बदली , कोण कोणाचा चमचा आहे,या महिन्यात डी.ए. किती वाढला वरच बोलत असतात, कपाळावर चिंतेचं जाळं आणि चेहऱ्यावर त्रस्त भावांसकट.वाटतं पावसाची सर पाहून कधीतरी हर्षित व्हावे,दाराबाहेर एखाद्या फुलपाखराकडे निरखून पाहावे, रानाची पाखरांची समुद्राची ओढ दाखवावी, किमान गप्पा तरी,किमानात किमान विचार तरी व्यक्त व्हावा .पण छट,हे लोक पावसाबद्दल बोलले तरी आता चिखल होणार हे सांगण्यासाठी, ढग आल्याच्या आनंदापेक्षा झाकोळल्याचा अंधार पांघरण्यासाठी,आणि हा झाकोळ दुसऱ्यावर लादण्यासाठी.

     पण नाही हे असे मळभ येत आहे असे वाटतच मी मान झटकून टाकते आणि झटकून टाकते त्यासोबत सगळे नकाराचे विचार ही आणि मनात म्हणते आपण घेतलेला फुलांचा गंध द्यावा खुशाल शिडकून यांच्या अंगावर,आपण ऐकलेलं रानाचं निसर्ग संगीत हळूच सोडून द्यावं त्यांच्या कानात आणि जो अपवादात्मक असा असतो तो आपल्यासारखा एखादा वेडा जीव भेटतोच कि या सर्व कोरड्या पसाऱ्यात ,तोच एखादा रानवेडा,पाउसवेडा,डोंगर किंवा कविता वेडा,बस आणखी काय करावे लागते माणसाला रिते होण्यासाठी आणि पुन्हा इतरांना वेडं करण्याचा आपला प्रयत्न चालू ठेवावाच कि
     नुकत्याच केलेल्या नागझिरा नवेगावच्या धुंद मोहिनीमधून मी अजून बाहेर आलेली नसते . किंचीतसे ही रिकामे क्षण मिळताच नजरेसमोरून सरकू लागतो सारा चलतचित्रपट आणि ट्रान्समध्ये गेल्यासारखं पुन्हा निघते मन त्या वाटांवरून स्वैर सफरीला,मग त्याला कोणताही एवढासा संदर्भ सुद्धा पुरतो. मधेच वाचलेलं मारुती चितमपल्ली यांचं 'शब्दाचं धन' किंवा कृष्णमेघ कुंटेचं 'रानवेड्याची शोधयात्रा' आठवून जातं . आठवते शब्दाचं धन या शब्दावरच केलेली पानाफुलांची, पाखरांची, झाडांची, वणव्याची, वाघाची चित्रावळ किंवा खुणावतो रानवेड्याच्या पुस्तकावरचा तसाच वेडा प्रचंड मोठा बायसन,तोंडात गवताचा झुबका ठरलेला अजस्त्र सुळ्यांचा टस्कर, स्वतः च्या डोक्यावर गवत उडवत असलेला. त्या मागचे थंडगार तळे आणि त्याही मागे खडक आणि हिरवळीचा मिलाफ .असं सारं .श्वासातलं जगणं असतं. आणि हे सारे हळूच हात धरून मला अलगद बाहेर नेतात आणि बघता बघता मी थेट रानात पोहोचते.तिथे मला भेटते चैतन्याच्या शोधात हिंडणारी जोय एडमसन, सतत निसर्गाचा विचार करणारी , निसर्ग जगणारी , निसर्ग रेखाटणारी अभ्यासणारी , एकटीच भटकणारी , पियानो वाजवणारी संगीताचा इतिहास व रचना शिकणारी , नक्षीकाम करणारी , भांडी घडवणारी शिवणकाम , गायन , शवपेट्या बनवणे , मानववंशशास्त्राचा अभ्यास करणे एवढ्या ढीगभर गोष्टी येत असलेली जोय मला इथेतिथे खरीखुरी वावरताना दिसते.मनाला ओढ लागते आपण ही सारी आकडेमोड सोडून निघून जावे रानेवने तुडवायला.
     खरंतर मी ऑफिसमध्ये असते.आता निघायला हवे,पण रानाच्या धुंदीत मला सभोवतालच्या प्रिंटर्सची करकर,कोम्प्युटर्स ची टकटक,सेलफोन्सचे रिंगटोन्स,स्पीकरवरचं संगीत आपसातले संवाद, डेबिट क्रेडीटचे हिशेब, ट्रान्स्फर प्रमोशनच्या गप्पा काहीकाही ऐकू येत नसतं. माझ्या संवेदनांच्या सीमारेषा विस्तारलेल्या असतात कैक पुढे, पलीकडे, दूरदूरवर.मी या इथल्या पसाऱ्यातली एक नसतेच मुळी. माझ्या मनात असते वेगळीच उधळण,माझी नजर शोधत असते काचेतून दिसणारा आभाळाचा तुकडा .
     ऑफिस मध्ये जिथे तिथे काचा आणि आरसे आहेत , माझ्या उजवीकडे असलेल्या काचेतला नजारा जेव्हा डावीकडच्या आरशात प्रतीबिंबाच्या रुपात दिसतो तेव्हा त्यात एक वेगळीच मजा मिसळते.प्रत्यक्षापेक्षाही या प्रतीबिम्बात खूप जास्त कवडसे उमटलेले असतात.एक नवेच डायमेन्शन,एक वेगळीच खोली त्या आभाळाच्या तुकड्याला प्राप्त होते. आणि त्या आभाळाच्या छायेखालची वाट अगदी स्पष्ट हाकारे करू लागते.व्यंकटेश माडगूळकरांनी उल्लेख केलेली हीच का ती वाट?,ते म्हणतात सकाळच्या ताज्या वृत्तपत्राप्रमाणे वाचता येणारी ही वाट दिवसभराच्या फरांट्यान्मुळे संध्याकाळपर्यंत भेळ खाऊन चूरगळून टाकलेल्या कागदासारखी दिसू लागते, पण माझ्या मनात लख्खपणे असते ती फक्त सकाळची स्वच्छ ताजी, सुगंधित वाट. माझ्या डोळ्यात असतं एक खूप खरंखुरं सात्विक जग,ज्यात मी बुडवून टाकते स्वतःला. रंगाच्या, गंधाच्या, स्वप्नांच्या निरभ्र जगात चिंब करून टाकते स्वतःला , आणि मी रानातून येताना आणलेलं ते नीलकंठ पक्ष्याचं पीस अलवारपणे काढून बघत राहते त्याकडे ,स्पर्श करते त्याला आणि मी स्वतःच एक पीस होऊन तरंगत राहते,वेडेपणाच्या वेगळ्याच विश्वात, जगण्याला वेगळेपणाचे आयाम देणाऱ्यां त्या विश्वात ...तरलपणे ...!!!!!
स्मिता