श्रीमहालक्ष्मी (+)
लेखक- सचिन मधुकर परांजपे
धन किंवा ज्याला पैसा म्हणतात त्याची अधिष्ठात्री देवि म्हणजे महालक्ष्मी हे आपण मागच्या लेखात बघितलं आहे. धन म्हणजे रोख रक्कम किंवा बोलीभाषेतला पैसा इतकी मर्यादीत व्याख्या माणसाने केलेली असली तरीही पूर्वासुरींनी महालक्ष्मी ही देवता ऐश्वर्यसंपन्नतेशी जोडलेली आहे. त्यामुळे धन (रोख रक्कम), सोनंनाणं, संपत्ती, चलअचल प्रॉपर्टी, समाजातील मानमरातब, सुप्रतिष्ठा, ताकद, सत्ता, मांगल्य, उत्तम आरोग्य आणि मुख्य म्हणजे संपत्तीचा सर्वांगिण उपभोग घेण्याची मानसिक व शारिरीक सुसंपन्नता ही या एकाच देवतेच अन्युस्युत आहे. तिला #श्री अशी संज्ञा आहे. श्रीसूक्ताची फलश्रुती असलेल्या लक्ष्मीसूक्ताचा शेवटही
श्री॒वर्च॑स्य॒मायु॑ष्य॒मारो᳚ग्य॒मावि॑धा॒त् शोभमानं मही॒यते᳚ ।
ध॒नं धा॒न्यं प॒शुं ब॒हुपु॑त्रला॒भं श॒तसं॑वत्स॒रं दी॒र्घमायुः॑ ॥असा आहे
ध॒नं धा॒न्यं प॒शुं ब॒हुपु॑त्रला॒भं श॒तसं॑वत्स॒रं दी॒र्घमायुः॑ ॥असा आहे
म्हणजे या एकाच ऋचेत ऐश्वर्यापासून सत्ता, धनधान्य, पशुधन, बहुत पुत्रांचा लाभ, संतती आणि शंभर वर्षाचे दीर्घायुष्य असा उल्लेख केलेला आहे हे लक्षात घ्या. आपण पुढच्या काही लेखांमध्ये श्रीलक्ष्मीदेवीच्या अनेक स्तोत्रांचा उल्लेख करणार आहोतच. पण त्या अगोदर श्रीलक्ष्मीच्या गुणधर्माचा परिचय आपण हळूहळू करुन घेणार आहोत...
१) धन किंवा पैसा हे प्रामुख्याने सुखाची साधने व विनिमयाची साधने खरेदी करण्याचे एक प्रयोजन आहे. एक माध्यम आहे हे ध्यानात घ्यावे. म्हणजे साध्य हे सुखाची साधने, गाड्याबंगले, वस्तु हे असून ते मिळविण्याचे साधन म्हणजे पैसा आहे. गोंधळ हा होतो की आपल्यापैकी बरेचजण पैशालाच साध्य समजून पैशामागे जीव तोडून लागतात आणि तिथे गोष्टी फिस्कटतात. पैसा हा अत्यावश्यक आहेच पण ते साध्य नाही...ते फक्त साधन आहे. ज्याप्रमाणे एखादा आवडीचा मिल्कशेक प्यायला काचेचा ग्लास लागतो, तो अतिशय महत्वाचा असतो हे मान्य पण त्यापेक्षाही महत्वाचा आहे तो त्यातून प्यायला जाणारा मिल्कशेक...मिल्कशेककडे दुर्लक्ष करुन तुम्ही फक्त काचेचा ग्लासच कवटाळून बसाल तर चालणार नाही. तेव्हा साध्य आणि साधन यातला फरक लक्षात घ्या...आपल्याला साध्य बरीच गाठायची आहेत. साधन फक्त वापरायचे आहे...साधनाला बंदिस्त करुन ठेवाल तर ते चालणार नाही...
२) #न_मागे_तयाची_रमा_होय_दासी हे एक गंमतीशीर सुभाषित आहे आणि ते शब्दश: खरं आहे बघा...कोणत्याही गर्भश्रीमंत माणसाकडे बघा. तो श्रीमंत असतो पण तो उद्योगी असतो. तो निरनिराळ्या प्रोजेक्टविषयी गप्पा मारेल, तो निरनिराळ्या विषयांचा उहापोह घेईल पण तो कधीच पैसा या गोष्टीविषयी बोलताना दिसत नाही. त्यालाही पैसा हवाच असतो हो पण त्याचा उल्लेख तो कटाक्षाने टाळतो...त्याच्या विचारानुसार, उद्योग हा महत्वाचा असून पैसा हे त्या उद्योगाचे Byproduct आहे. उद्योग केल्यावर, तो यशस्वीपणे आणि मेहनतीने चालविल्यानंतर पैसा हा मिळणारच,जाईल कुठे? फक्त पैशाची हाव किंवा पैशामागे हात धुवून लागाल तर पैसा अजिबात मिळत नाही. तेव्हा आजपासून बोलताना, चर्चेत पैशाचा उल्लेख टाळा...सुखाच्या साधनांविषयी बोला, उद्योगाविषयी बोला, नव्या प्रोजेक्टविषयी गप्पा मारा, नोकरीत असाल तर नोकरी बदलण्याविषयी चर्चा करा, नव्या ऑपोर्च्युनिटीज बघा...पैसा सोडून बाकी विषयांवर गप्पा करा....पैसा हा येईलच, श्रीलक्ष्मी येईलच फक्त जो तिच्या मागे धावत नाही त्याच्या मागे ती येते हे विसरु नका...
३) कायम रॉयल व्यक्तिमत्वांचे आदर्श समोर ठेवा. जे खऱ्या अर्थाने श्रीमंत आयुष्य जगतात अशांकडे बघा..जमिनी विकून गाड्या उडविण्याऱ्या गुंठामंत्र्यांचे आदर्श ठेवू नका, आणि करोडॊ रुपये ढुंगणाखाली ठेवून भुकेकंगलासारखं फालतू आयुष्य जगणाऱ्या कवडीचुंबकांचेही आदर्श ठेवू नका...गर्भश्रीमंत, उद्योगी, बुध्दीमान, उत्कृष्टपणे पैशाची गुंतवणूक करणारे, रॉयल लाईफस्टाईल जगणारे, मितभाषी, व्यसनांना स्वत:वर हावी होऊ न देणारे, चारित्र्यसंपन्न, देखणे, उत्तम ड्रेसिंग सेन्स असणारे, पैशाचा उत्तम विनियोग करणारे, सिलेक्टीव्ह गोष्टींची आवड असणारे, पैशाचा बडेजाव न मिरवणारे, मृदू, ऐश्वर्यसंपन्न, आधुनिक लाईफस्टाईल जगणारे, रसिक वृत्तीचे असे जे कोणी आहेत त्यांचे आदर्श समोर ठेवा...चंदनाचे संगे तरुवर चंदन या उक्तीप्रमाणे हे वर उल्लेख केलेले गुण स्वत:मध्ये कसे येतील ते बघा...ऐश्वर्यसंपन्न आयुष्य आपोआप जगायला सुरुवात कराल तुम्ही....
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
(क्रमश:)