मला ईमेलवर आलेला एक सुंदर लेख..........ज्ञानेश्वरी कधी वाचावी ?
“तुझं ज्ञानेश्वरी वाचायचं वय आहे का?” आमच्या एका तरूण वाचकाला त्याच्या मित्रांनी विचारलं.
त्याने उत्तर दिलं “ ज्ञानेश्वरी वाचायचं वय असतं का? मग ज्ञानेश्वरांनी इतक्या लहान वयात ती लिहीलीच कशी?”
अनेक लोकांना आश्चर्य वाटते की ई साहित्य प्रतिष्ठानचे ई ज्ञानेश्वरी अभियान सुरू झाल्यापासून अनेक तरूण मंडळी ज्ञानेश्वरी वाचतात. आम्हाला या लोकांचे आश्चर्य वाटते. आम्हाला वाटते की ज्ञानेश्वरी ही तरुणांनीच वाचायला हवी. अगदी टीनएजर्सनीच.
ज्ञानेश्वरी लिहीली एका टीनएजच्या तरुण मुलाने. त्यातही जीवनाच्या रसरशीतपणाचे अनुभव घेत जगणार्या एका जीवनावर प्रेम करणार्या ज्ञानेश्वरांची सुंदर भाषा. आणि जीवनाची सर्व अंगे जीवंतपणे जगणार्या श्रीकृष्णाचे ते विचार. आणि सांगितली ती कोणाला? तर जग जिंकण्याची पात्रता अंगी बाळगणार्या तरूण अर्जूनाला. हे तर तरुणांचेच पुस्तक. ज्ञानेश्वरी कधीच शिळी होऊ शकत नाही. इतक्या कोवळ्या वयात ज्ञानेश्वरांनी जे विचार मांडले ते इतके सुंदर आहेत की सळसळत्या तारुण्याचा प्रत्यय प्रत्येक ओवीत येत रहातो. श्री पांढरे यांनी एकविसाव्या शतकाच्या ताज्या भाषेत तिचे रुपांतर केल्यामुळे आजच्या तरुणालाही या सळसळत्या जवां भाषेचा अनुभव घेता आला. त्यामुळे आजचा तरुण ज्ञानेश्वरीकडे आकृष्ट झाला.
ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान निवृत्तीचं नाहीच. संपूर्ण ज्ञानेश्वरीत कुठेही जीवनाशी फ़टकून वागण्याचा सल्ला नाही. कुठेही साधू बनून संसाराचा त्याग करण्याचा उपदेश नाही. उलट जीवनाला आनंदाने सामोरे जाण्यासाठी ज्ञानेश्वरीतले असंख्य दाखले देता येतील.
ज्ञानेश्वरीचे मूळ म्हणजे श्री भगवद् गीता. अर्जुनाने युद्धाला सिद्ध व्हावे म्हणून सांगितलेली. कर्माचा उपदेश. तो वयाच्या साठीनंतर वाचणे योग्य की तारुण्याच्या ऐन सुरुवातीला? असे नाही की साठीनंतर सर्वजण निवृत्त होतातच. अनेक जण साठीनंतर दुसरी इनिंग करतात. आयुष्याच्या अंतापर्यंत जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने भोगणारे अनेक जण आहेत. आणि त्यांनाच ज्ञानेश्वरी कळलेली आहे असे म्हणता येईल. पण ज्ञानेश्वरीची खरी गरज आहे ती आयुष्याच्या सुरुवातीलाच हातपाय गाळून बसलेल्या असंख्य तरुणांना. निराशेच्या गर्तेत सापडलेल्या. अभ्यासाच्या आणि स्पर्धेच्या बोज्याखाली दबलेल्या तरुणांना. जीवनाचा आनंद न घेता एखाद्या ओझ्याप्रमाणे आयुष्याचा प्रत्येक क्षण पुढे लोटणार्या तरुणांनी ज्ञानेश्वरी वाचायला हवी.
आज आम्हाला अशा असंख्य तरुणांची पत्रे येतात. ज्ञानेश्वरी वाचल्यामुळे आयुष्यात घडून येणार्या आमुलाग्र बदलाची. दृष्टिकोनात बदल झाल्यामुळे आयुष्याचा आनंद घेणार्या तरुणांची. काळजीचे अभ्र दूर झाल्यामुळे जीवनात प्रकाश पसरलेल्या तरुणांची. परदेशातून. खेड्यापाड्यातून. मुंबई पुण्यातूनही. हैद्राबाद, हरयाणातून.
ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी भेट द्या. आपल्या त्या आप्तांना द्या. ज्यांना काळजीत बघताना आपल्याला दुःख होते अशा तरुणांना द्या. नैराश्याने घेरलेल्या तरुणांना ज्ञानेश्वरी द्या. घरातल्या मोठ्या मंडळींना द्याच, पण लहान मुलांना द्या.
या लेखाच्या लेखकास मनापासुन धन्यवाद.त्यांचे नाव कळविल्यास आभारी राहीन.
No comments:
Post a Comment