Sunday, July 21, 2013

ललीत...माधव गवाणकरांचा एक सुंदर लेख.

हाय, हॅलो'च्या मनोऱ्यावर बसलेला भिंगऱ्या पाखरांचा थवा तर नावानंच "दुर्बळ' आहे, त्याला अधिक दुबळं बनवण्याची शक्ती टॉवरमध्ये आहे का, .....हे मला ठाऊक नाही; पण पक्ष्यांचं एकूण जगात कोण आहे? ज्यांचा बाजार भरतो, सौदे होतात, वापर होतो त्या साऱ्यांचंच दुनियेत कुणी नाही !

आकाश हाती लागत नाही. जितकं वर जावं, तितकं ते अधिक उंचावर जातं. माणसाची माती झाली, तरी "वर गेला' असंच कल्पनेनं म्हटलं जातं. आभाळाला गाठणं सोपं नव्हेच! गगन ठेंगणं होतं ते गर्वामुळे; पण त्या फुग्याला काळच टाचणी लावतो. छाती फुगवून चालणारे अंथरुणाला खिळून त्यांची दैना होते. आकाश असं खरोखर काही असतं का? मला वाटतं, असत नाही ! आभासी आभाळ चकवत राहतं. समूहातसुद्धा त्याचं निळं-जांभळं रूप स्वतःला बघत असतं. अगदी विमानाशी स्पर्धा करत घिरट्या घालणाऱ्या शिकारी घारीलाही आकाशाला स्पर्श करता येत नाही. ढग ढढ्‌ढम पण दंगेखोर मुलांच्या वर्गासारखे एकमेकांना ढकलत-बुकलत असतात. कधी "फुटलेल्या' आवाजात कोकलत असतात. ढगफुटी ती हीच! तरीही, मस्ती करणारं आभाळ निसटतं. आपल्या पकडीत, मुठीत ते कधीच येत नाही. वाट चुकलेले ढग फार उंचावर बांधलेल्या माऊ माऊच्या घरात येऊन जायचं; पण हात लावावा तर केवळ हवा अन्‌ धुकट ! आपलं अस्तित्वही अखेरीस राख व धूर इतकंच आहे. आपण साहित्याच्या, संमेलनांच्या केवढ्या बढाया मारतो; जणू काही लढायाच... पण छे ! आपट्याच्या पानांना सोनं म्हणावं, तसं "मानलं तर धन' इतकंच द्रव्य मराठी लेखनातून सुटतं.

"हाय, हॅलो'च्या मनोऱ्यावर बसलेला भिंगऱ्या पाखरांचा थवा तर नावानंच "दुर्बळ' आहे, त्याला अधिक दुबळं बनवण्याची शक्ती टॉवरमध्ये आहे का, ...हे मला ठाऊक नाही; पण पक्ष्यांचं एकूण जगात कोण आहे? ज्यांचा बाजार भरतो, सौदे होतात, वापर होतो त्या साऱ्यांचंच दुनियेत कुणी नाही !

उद्या एखादं अस्त्र असा "अतिरेक' करेल, की पाताळ, पृथ्वी अन्‌ आभाळ, अवघा आसमंतच जहरी बनेल. जे अखेरचा श्‍वास घेणार नाहीत, त्यांना मोठ्या नगरात, राजधानीत जगण्याचा पश्‍चात्ताप होईल, कारण दहशत दाखवणाऱ्यांना आभाळच नसतं. आपण निदान स्वप्नात नक्षत्रसुंदर आकाश सखीला दाखवतो; पण जगण्याचं ओसाड वाळवंट झाल्यावर लपून-छपून राहिल्यावर वाट चुकलेला फरार, परागंदा तरुण कुठं अन्‌ कसं आकाश शोधणार? माझ्या काळजातलं वात्सल्य त्याचीही काळजी करतं. हा दोष आहे की गुण, ते माझे प्रिय वाचक सांगतील; पण तसं आहे खरं. कदाचित, हे काळजातलं आभाळ माझ्यापुरतं अस्सल असेल, दुसऱ्यासाठी डोळ्यांत पाणी भरणारं जग तुमचं नसेल, माझं आहे ! "माधवा, दुसऱ्याला धीर देण्याइतकं मोलाचं बाकी काही नाही' असं "आकाश'वाणीतच मला ज्येष्ठ सन्मित्र रवींद्र पिंगे म्हणाले होते. खरं आहे पिंगे ! आपलं तेव्हाचं जग सत्त्व, तत्त्व जपणारं होतं. आकाशात वाणी उमटवणाऱ्यांचा परिवार होता.

आम्ही तर तारेवरचे टिटवे. करारी कलाकार. तुम्ही पटावर होता; पण आकाशाच्या छोट्या छोट्या तुकड्यांवर एकमेकांना स्नेहानं आपण किती रसाळ, मधाळ पत्रं लिहायचो नै? "नवा प्रोड्युसर तुला दाद देत नाही? मी सांगतो त्याला' अशी फुंकर मारल्यावर माझं कोवळं वय पुन्हा उमेदीनं कामाला लागायचं. नशेबाज जमान्यात आज इतकी चंगळ आहे; टंगळमंगळही आहे. भोगाचे झुले आहेत. स्वस्त मस्त "भंकसपऱ्या' आहेत, बुवाबाजीची दुकानं आहेत. "जादूगार' महाराज झाले आहेत. अंधविश्‍वासांचं मार्केटिंग आहे. बुडाशी बाइक अन्‌ हाताशी "सेल' आहे. चार वर्षांची आमची सावरी लॅपटॉपशी खेळते. सुविधा आणि आश्वासनांच्या या नंदनवनात श्‍वास दुखरे का? द्वेषाच्या इतक्‍या खुपऱ्या का? कारस्थानांचे कारखाने कशासाठी? लॉबी आणि गॅंग्ज शेवटी कुठे चालल्या आहेत? इतकी पारध करून, इतकं मृगजळ ओलांडून एवढे सोन्याचे रांजण कलंडून, इतकं अत्तर रुमालावर शिंपडून अखेरीस काय गवसतं? किती काय उरतं? शून्य नजरेनं झोपाळ्यावर बसून राहिलेली डोकरी माणसं किंवा डिप्रेशननं ओंडका झालेला हुशार तरुण या दोन्ही टोकांच्या माणसांना आकाश काही लाभत नाही. तुम्हीच सांगा, काय करावं? कसं करावं? बोलाल काही...?

No comments:

Post a Comment