Thursday, October 3, 2013



(भय इथले संपत नाही...पुढील भाग..)

मृत्यूचे महानाट्य......(भाग2)

सातत्याने नवोन्मेषशाली असणारी सृष्टी सृजनशील सर्जनशीलतेची मोठी प्रतिभा आहे.परंतू नैसर्गिक प्रलयाचा महासागर जेव्हा तिला आपल्या कवेत घेतो तेव्हा ती बिनबोभाटपणे त्याला सर्वस्वाचं दान देवून टाकते आणि रिती होते पुन्हा नवीन काहीतरी जन्माला घालण्यासाठी....
       उगम आणि विनाश...जन्म आणि मृत्यु...या दोन टोकामध्येच पृथ्वीवरील जीवसृष्टीचा प्रपंच सुरु आहे.मृत्युचा हा सामुहिक उच्छाद पाहाताना ही जाणीन प्रकर्षाने होते..आणि आपण स्तब्ध होउन जातो. त्याने कुणालाच सुटकेची संधी दिली नाही एखाद्या लहरी   ,बेछूट दरोडेखोरासारखा येउन कठोर होउन निरपराधांना मरण देउन गेला..क्षणात होत्याचं नव्हतं करुन गेला..आणि मागे ठेवून गेला हळहळत्या निश्वाःसांसह फाटलेल्या आभाळाखाली गोठून गेलेली माणसं....व्याकुळतेच्या खोल डोहात बुडालेली माणसं...मृत्यूच्या महानाट्याचा जिताजागता प्रपात पाहणारी माणसं...किल्लारीसह बावन्न खेडी उध्वस्त झाली. हजारो संसार बेचिराख झाले. अनेक निष्पाप जीव उमलण्यापूर्वीच खुडले गेले, मागे राहीले फक्त मन हेलावून सोडणारे..आर्त विव्हळणारे स्वर...माझा बाबा गेला sss…..माझं तान्हुलं कुटं हाय...sss…इवल्या इवल्या चिल्यापिल्यांच्या मृतदेहाला कवटाळून,,आयाबायांचा...नातेवाईकांचा अनावर शोक...सगळीकडे हे मन छिन्नविछिन्न करणारे दृष्य काळजाला पीळ पाडत होते..मृत्यूने आपल्या  अक्राळविक्राळ जबड्यात गुलाबाच्या कळ्यांसारख्या...फुलपाखरासारख्या गोजिरवाण्या..निष्पाप..गोंडस जिवांसहीत.....तरण्याताठ्या लेकी-सुनांसहीत...म्हाता-या कोता-या कष्टक-यांना गिळून टाकलं होतं...रात्री झोपेच्या आधीन होण्यापूर्वी आपलं सर्वस्व असलेली आपल्या कुटुंबातली माणसं सकाळी सुर्योदयापूर्वी आपलं आता कुणीच नाही या भावनेने वेडीपिशी झाली होती.......
                                                                      
                                                                       क्रमशः

No comments:

Post a Comment