Tuesday, August 12, 2014

वडीलांस पत्र.

" वडीलांस पत्र ..........."
प्रिय " बाबा " यांस ,

आज थोडं एकट एकट वाटलं,
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

चालायला लागल्यावर तुम्हीच पहिला हात दिला होतात,
पण मी पुढे गेल्यावर नकळतच कधी दूर गेला होतात,
आज, स्वतःच्या पायावर उभा असलो तरी धडपडल्यासारखं वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

जेवताना काऊ चिऊ शिवाय कधी घास पोटात गेला नाही,
आता तर चिऊ बघायला सुद्धा मिळत नाही,
काऊ चिऊ साठी पुन्हा एकदा रुसवासं वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

लहानपणी तुमच्यासोबत पावसात भिजताना खूप मजा वाटायची,
फाटका रेनकोट , तुटकी छत्री असूनही ती दोघांना पुरायची,
आज , नवी कोरी छत्री असूनही पावसात थोडं भिजावस वाटलं.
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

एकदा घरात एकटा असताना, सर्व घर रडून डोक्यावर घेतलं होत,
पण तुम्ही धावत पळत येउन ' मी आहे 'असं सांगितलं होत,
आज , स्टेशनच्या गर्दीत सुद्धा " एकट एकट " वाटलं .
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

आठवतय… एकदा मी पडलो होतो,मला खूप लागलं होत ,
त्यादिवशी तर पूर्ण आभाळ तुमच्या डोळ्यात दाटलं होत,
आज , उगाचंच अडखळून पडावसं वाटलं…
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

रात्री झोपताना तर तुमची मांडीच माझी " उशी " असायची ,
तुम्ही नसताना आईच्या कुशीतही झोप नसायची,
आज , पुन्हा एकदा तुमच्या जवळ झोपावं वाटलं….
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

तुमचा हात सोडून शाळेत जाणे नकोसे वाटायचे,
पण तोच हात पकडून घरी जाताना मात्र कसलेच भान नसायचे,
आता मोठा झालो तरी " तो " हात पकडून शाळेत जावंसं वाटलं…
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

"तुझे बाबा , देव बाप्पा कडे गेले " अस मला कुणीतरी सांगितलं होत,
मात्र देव बाप्पा कुठे राहतो हेच मला कोणी सांगितला नव्हतं,
लहानपणीच्या त्या प्रश्नावर आज थोडं हसावसं वाटलं ….
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून जरा बोलावसं वाटलं……

जीवनातली तुमची कमी आईने कधीच भासू दिली नाही ,
पण तुमची आठवण मनातून कधीच जाऊ शकली नाही,
आज , भरलेल्या आभाळाबरोबर डोळ्यात पाणी दाटल्यासारखं वाटलं….
बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……

बाकी काही नाही,तुमची आठवण आली म्हणून थोडसं रडावसं वाटलं……

(Advocate jayant Deshmukh यांच्या Timelineवरुन साभार)

No comments:

Post a Comment