Wednesday, January 14, 2015

स्विकाराचं श्रद्धेय अध्यात्म..

स्विकाराचं श्रध्देय आध्यात्म....
(परमेश्वरावर श्रध्दा असलेल्या प्रत्येकाने वाचावं असं काहीतरी...)
...व्यवहारात अनेकदा आपण इतरांच्या तोंडुन किंवा आपणही कित्येक वेळा, "माझी अमुकतमुक देवावर श्रध्दा आहे" किंवा "अमुकतमुक गुरुंना मी मानतो" वगैरे वक्तव्ये आपण ऐकत असतो, करत असतो....श्रध्दा असणे, किंवा मानणे गैर आहे असं अजिबात नाही. प्रत्येकाची श्रध्दास्थाने ही निरनिराळी असतात (त्यावर कुणीही टिका करण्याचीही गरज नसते, तो प्रत्येकाच्या आत्मानुभूतीचा विषय आहे) काही लोकं गणपतीची उपासना करतात, काहींचा श्रीशंकरांवर निस्सीम विश्वास असतो, कुणी शिर्डीसाईंचे भक्त तर कुणी श्रीगजानन महाराजांचे भक्त...व्यक्ति तितक्या प्रकृती...पण मुळात आपण भक्ती का करतो? किंवा एखाद्या विशिष्ट दैवतावर-गुरुंवर विश्वास का ठेवतो? याची कारणमिमांसा मुळात आपलीच आपण करायला हवीये.....त्याला "श्रध्दा जोखणं" असं मी म्हणतो...
....माझ्या मते बरेचदा आपल्या श्रध्देचा संबंध हा आपल्या व्यवहारीक सुखाशी किंवा यशापयशाची आपण जोडतो आणि तिथेच चुकतो. "मी गणपतीची उपासना केली आणि मला धंद्द्यात यश मिळालं" किंवा "मी विष्णुसहस्त्रनामाची पारायणे केली आणि माझा आजार बरा झाला" किंवा "मी दरवर्षी गुरुचरित्राचे सप्ताह करतो म्हणुन माझं नीट चाललंय"...ही अशी वक्तव्ये आपल्याला श्रध्दावान बनवतायत असं वरवर वाटलं तरी वास्तविक पहाता ही वक्तव्ये म्हणजे तुमच्या कमकुवत भक्तीचेच लक्षण आहे असं मी मानतो. याचं कारण म्हणजे तुम्ही तुमच्या उपासनेचं त्रैराशिक हे तुमच्या व्यवहारीक घटनांशी जोडुन चुक करत आहात. व्यवहारात घटना घडत असतात, त्या काहीवेळा तुमच्या "फेव्हर" मध्ये तर काहीवेळा तुमच्या विरोधात घडत असतात, घडणार असतात (त्याचा पुर्वकर्मार्जित कर्मांशी संबंध असतो किंवा नसतो तो भाग वेगळा विषय आहे) पण जेव्हा तुम्ही व्यवहारात तुमच्या बाजुने घडणाऱ्या घट्नांचे "क्रेडीट" परमेश्वरी उपासनेला देता तेव्हाच तुम्ही विरोधात घडणाऱ्या घटनांनाही त्यालाच जबाबदार धरु लागता...आणि श्रध्दा डळमळीत व्हायला लागते...
..."आयुष्यभर त्या गुरुचरित्राची पारायणे केली पण माझं काही चांगलं झालं नाही", "दरवर्षी मी मार्गशीर्षातले गुरुवार न चुकता करते पण काही केल्या माझी आर्थिक परिस्थिती सुधारत नाही" "शंकरावर नेमाने दर सोमवारी बेल वहातो पण माझी कामे काही होत नाहीत" अशी विधाने मग केली जातात. वास्तविक पहाता भक्ती म्हणजे आनंद असतो, तिथे निरपेक्षता असते, परिस्थितीचा स्विकार असतो, परमेश्वर आहे आणि त्याचं नामस्मरण केल्याने मला आनंद मिळतो म्हणुन मी ते करतो असा भाव अपेक्षित असतो. श्रीमंत व्हावं म्हणुन तुकारामांनी विठ्ठलभक्ती केली नव्हती, कोट्याधिश व्हावं म्हणून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली नाही...तो त्यांचा आनंद होता. व्यवहारिक अपयशाने किंवा संकटांनी जर आपण देवाचा त्याग करणार असु तर तिला भक्ति म्हणता येणार नाही, तो शुध्द व्यवहार झाला. नाही का?
....प्राप्त परिस्थितीचा आनंदाने स्विकार करुन, आलेल्या संकटांविरुध्द लढण्याचे बळ तुम्ही परमेश्वराकडे नक्की मागु शकता पण "अमुक झालं तर तमुक" असा भाव भक्तीत अपेक्षित नाही. जोपर्यंत नीट चाललंय तोपर्यंत परमेश्वरी उपासना, पुजाअर्चा करणारी आणि एक गोष्ट जरी मनाविरुध्द झाली तरी एका क्षणात नास्तिक बनणारी मंडळी मी पाहिली आहेत, त्यांना मी "भक्तिमार्गातले व्यापारी" म्हणतो. "स्विकाराचं श्रध्देय आध्यात्म" जोपर्यंत तुम्ही आत्मसात करणार नाही तोपर्यंत ईश्वरी उपासनेतलं मर्म तुम्हाला कळणार नाही, आनंद काय असतो? ते समजणार नाही. अर्धपोटी उपाशी राहूनही आमच्या तुकोबारायांनी "आनंदाचे डोही आनंद तरंग..." हा अभंग कसा काय लिहिला? ते रहस्य समजायचं नाही. भक्ती ही कायम सघन, बळकट, निर्लेप, शुध्द, अव्याभिचारी आणि ’अ’व्यवहारी(इथे अर्थ निराळा घ्यावा) हवी हे विसरु नये
-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

No comments:

Post a Comment