Friday, December 27, 2013

अंधश्रद्धा नकोच.....शिवराज गोर्ले.

अंधश्रद्धा नकोच ! ! 'परमेश्‍वराला रिटायर करा!' असं डॉ. श्रीराम लागू यांनी जाहीर आवाहन केलं होतं, तेव्हा त्यावर बरीच उलटसुलट चर्चा झाली होती. "लोकांनी देव या कल्पनेचा त्याग करावा' असाच त्यांचा आजही आग्रह असतो. याचं कारण सगळ्या अंधश्रद्धेचं मूळ "देव' या कल्पनेत आहे, असं त्यांना ठामपणे वाटतं. माणसानं तर्कानं, विवेकानं जगावं. भाबड्या, भ्रामक कल्पनांच्या आधारे नव्हे, तर स्वतःच्या बुद्धीच्या आधारानं; वैज्ञानिक दृष्टीनं जगावं, असं त्यांना सुचवायचं आहे आणि त्यात चुकीचं तर काहीच नाही. हे सगळं खरं असलं तरी लोक देवाला रियाटर करायलाच काय, थोडीबहुत रजा द्यायलाही तयार नाहीयेत. त्यातून आपल्याकडे तर तेहतीस कोटी देव. देवांची अगदी रेलचेल आहे. दिवसेंदिवस देवळेही वाढताहेत. देवांचे उत्सवही मोठ्या थाटामाटात केले जाताहेत. त्यांना "धर्माचं' पाठबळ असतं. आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारी मंडळी "आयटी'त करिअर करणारे तरुण-तरुणीही सिद्धिविनायकाच्या दर्शनाला तास न्‌ तास रांगेत उभे राहतात. त्यातून अमिताभ बच्चनसारखा सुपरस्टार पहाटे उठून घरापासून अनवाणी चालत, सिद्धिविनायकाला येतो तेव्हा लोकांच्या श्रद्धेतही "ग्लॅमर'ची भर पडते. एक तर मान्य करावं लागतं, "देव' ही संकल्पना युगानुयुगे चालत आली आहे. देवानं माणूस निर्माण केला की माणसानं देवाला जन्म दिला, यावर चर्चा होत राहतील; पण देव ही माणसाची एक "गरज' आहे असं दिसतंय. अत्यंत कडक नास्तिक मंडळीही आयुष्याच्या अखेरीस "देव असेल का हो?' असा विचार करीत असल्याचीही उदाहरणं आहेत. तात्पर्य काय, "देव आहे की नाही' याचं ठोस उत्तर देता येणार नाही. कुणी दिलं तर ते मान्य केलं जाणार नाही. "देव मानता का?' या प्रश्‍नातच त्याचं खरं उत्तर आहे. "जो मानावा' लागतो, त्याच्या अस्तित्वाचा पुरावा कसा देणार? आता पुढचा प्रश्‍न. देव संकटातून तारतो का? या प्रश्‍नाचं उत्तर असं देता येईल- संकटं दोन प्रकारची असतात. खरी आणि आभासी. भूकंप, त्सुनामी या खऱ्या संकटांतून देव तारू शकत नाही असंच दिसतं. भूकंपात फक्त अश्रद्ध माणसंच गाडली जातात असं होत नाही. मात्र "भुताची भीती' या आभासी संकटातून एखाद्याला "रामनाम' तारून नेऊ शकतं! त्या प्रसंगी आवश्‍यक ते "बळ' देऊ शकतं, अर्थात "भूत वगैरे काही नसतं!' हा विवेक दृढ असेल तर केव्हाही अधिक श्रेयस्कर. खऱ्या संकटातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नच करावे लागतात; पण श्रद्धेमुळे अशा प्रसंगीही मानसिक बळ व शांती मिळते, असा अनेकांचा अनुभव असतो. आता "योगशास्त्र' जगभर अभ्यासलं जातंय. "योग' म्हणजे देवाशी जोडलं जाणं असंच म्हटलं जातं.हा विषय गहन आहे. एका छोट्याशा लेखात "जळी स्थळी' असणाऱ्या "देवा'ला कसं बसवणार? "मजेत जगावं कसं?' या माझ्या पुस्तकात मी हा गहन प्रश्‍न माझ्या पद्धतीनं सोडवून टाकला आहे, कसा ते इथं थोडक्‍यात सांगतो. देव म्हणजे काय, याचं एक सर्वमान्य उत्तर असतं, देव म्हणजे अनादि, अनंत शक्ती. बरं, देवाचा अंश प्रत्येकात असतो असंही म्हटलं जातं. आता आपल्या प्रत्येकात हा अंश कुठल्या स्वरूपात असतो? आपल्या "अंतर्मनाची अमर्याद शक्ती' ही मानसशास्त्रानं स्वीकारलेली संकल्पना आहे. ही अमर्याद शक्ती म्हणजे त्या अनादि, अनंत शक्तीचा अंश असू शकेल, नाही का? आपण "स्वयंसूचना' देऊन अंतर्मनाची शक्ती जागी करू शकतो, वापरू शकतो हेही मानसशास्त्रीय सत्य आहे. देवाची आपण प्रार्थना करतो तेव्हा देव ऐकतो की नाही, माहिती नाही; अंतर्मन नक्की ऐकत असतं. थोडक्‍यात काय, प्रार्थना ही एक स्वयंसूचनाच असते. स्वतःसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपण "इच्छाशक्ती' वापरतो. इतरांसाठी प्रार्थना करतो तेव्हा शुभेच्छांची शक्ती वापरतो! बस्‌, माझ्यापुरता हा तिढा मी असा सोडवला आहे. मग माझ्या घरात देवाचा फोटो नाही, मी देवळात जात नाही, याचा मला काही त्रास होत नाही. लोक पूजा, कर्मकांड करतात, ती त्यांचं मन गुंतण्यासाठी करतात असं मी मानतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा - श्रद्धेचे काही लाभ नक्कीच असतात. श्रद्धा ही एक शक्तिशाली भावना आहे. प्रत्येक भावनेत ताकद असतेच. प्रेम, देशभक्ती यात सकारात्मक ताकद असते, तर रागात नकारात्मक श्रद्धेमुळे बळ लाभू शकतं. श्रद्धा तुम्ही कशावरती ठेवता, हा मुद्दा दुय्यम ठरतो. ती दगडाच्या मूर्तीवर असू शकते, जिवंत व्यक्तीवर असू शकते, तत्त्वावर असू शकते. गांधीजी परमेश्‍वर मानी; पण "सत्य हाच परमेश्‍वर' असंही म्हणत. देवावर श्रद्धा ठेवणारे जर असत्य वागतअसतील तर ते देवाचा विश्‍वासघात करतात, असंच म्हणावं लागेल. देव म्हणजे सर्व सद्‌गुणांचं प्रतीक असेल तर तो सत्य, अहिंसा, प्रेम, सदाचार, चांगुलपणा याचंच प्रतीक असायला हवा. देवावर श्रद्धा ठेवणारे, सत्यावर, प्रेमावर, अहिंसेवर, चांगुलपणा व सदाचारावर श्रद्धा ठेवतात का, हा खरा मुद्दा आहे. वर्षभर भ्रष्टाचार करणारी मंडळी वर्षातून एकदा बालाजीला जाऊन मुंडन करतात आणि स्वतःच्या डोक्‍यावरचं पापाचं ओझं त्याच्या चरणी उतरवतात, हा एक गमतीदार विरोधाभासच आहे. देव काय पापं टांगण्याची खुंटी असतो? अमका देव नवसाला पावतो, ही अंधश्रद्धा असेल नसेल; ती देवादेवात भेदभाव करणारी नक्कीच आहे. बाकीचे देव काय कमी दर्जाचे, कमी पॉवरफुल्ल असतात का? मुळात नवस बोलून देव पावतो, हेही पटत नाही. देव काही शासकीय अधिकारी नसतो, त्याला नवसाची "लालूच' कशाला हवी? तो तर भावाचा भुकेला असतो! देवाकडं काही मागण्यासाठी भक्ती करणं, ही निरपेक्ष भक्तीच नव्हे. देवानं शरीर दिलंय, बुद्धी दिलीय, आणखी काही मागायचं कशाला? शेवटी हे तर खरंच ना, की "गॉड हेल्प्स देम हू हेल्प देम सेल्व्हज्‌!' सचिन तेंडुलकर देव मानत असला तरी तो प्रयत्नांत काहीच कसर ठेवत नाही, हे महत्त्वाचं. "यू डू युवर बेस्ट; गॉड विल डू द रेस्ट!' यातलं "डू युअर बेस्ट' हेच खरं. बाकीचं मग देव, नियती, परिस्थितीवर सोडून द्यावं. "श्रद्धावान लभते ज्ञानम्‌! असंही म्हणतात. गुरूवर श्रद्धा ठेवावी लागते कारण प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी तपासून बघता येत नसते. पण मिळालेल्या ज्ञानाची वेळोवेळी चिकित्सा करावीच लागते. तशीच ती "धर्मा'चीही करावी लागते. प्रत्येक श्रद्धा ही खरं तर अंधश्रद्धाच असते असं म्हणतात. कारण श्रद्धेचा अर्थच "पुराव्या'शिवाय ठेवलेला विश्‍वास'. हे खरं असलं तरी कुणावर आणि कशावर श्रद्धा ठेवावी, हे आपण डोळसपणे ठरवू शकतो! श्रद्धेच्या मर्यादाही माहिती हव्यात. श्रद्धेमुळे मनःशांती मिळू शकते; नोकरी नाही मिळू शकत किंवा परीक्षेत सर्वोत्तम गुणही मिळत नाहीत! अलीकडे बाबा, बापूंचं प्रस्थ वाढतं आहे. काही तर विष्णूचे अवतार मानले जातात. मुळात "विष्णू' होता की नाही यावर वाद आहेत, तर त्याचा "अवतार' कसा मानायचा? ही "डोळस श्रद्धा' म्हणता येईल का? आणि हो आताशा टीव्हीवर "शिवशक्ती कवच', "महालक्ष्मी कवच' या जाहिराती झळकत आहेत. सोन्याचं ते कवच विकत घेतलं की घरात पूर्ण समृद्धी. संकटं सगळी म्हणे गायब! किती छान! सरकारनं ही कवच घेऊन घरटी वाटून टाकावीत म्हणजे दे शात समृद्धी नांदेल. संकटं येणारच नाहीत! आपण सश्रद्ध आहोत की मूर्ख? अभिनव कल्पनाच प्रभावी!

No comments:

Post a Comment